Every man has within himself the entire human condition. – Montaign
मानवतावादाची संकल्पना हा आधुनिकतेच्या मूल्यव्यवस्थेचा गाभा आहे. पण ज्या मध्ययुगीन धर्मसत्तेच्या विरोधात ही संकल्पना आकाराला आली, तीही मानवतावादाचेच दावे करत होती. मानवतावादाच्या नावानेच आधुनिकतेच्या विरोधकांनीसुद्धा आधुनिकतेचा विरोध केला. दैनंदिन जीवनात पावलोपावली माणसाचं माणूसपण नाकारणारे समाजघटकही धार्मिक, आध्यात्मिक वा तात्त्विक पातळीवर मानवतावादाचे दावे करताना दिसतात. त्यामुळे पाश्चात्त्य आधुनिकतेतल्या मानवतावादाचं नेमकं स्वरूप समजून घेण्यासाठी आधुनिक मूल्यव्यवस्थेचा समग्रपणे विचार करणं गरजेचं आहे.
सर्वप्रथम, आधुनिकतेचे आद्या प्रवर्तक ‘निर्मिक वंदनीय तर निर्मिती निंदनीय कशी असू शकते!’ या तर्काने प्राचीन ज्ञान परंपरेच्या आधारे इहवादाला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. त्यामुळे आधुनिक मानवतावाद प्रामुख्याने इहवादी ठरतो. फ्रेंच विचारवंत मिशेल द मोन्तेन्य लिहितो, ‘प्रत्येक माणसात समग्र मानवी अवस्था निवास करते’. या वाक्यात ‘मानवता’ ( Humanity) या शब्दाऐवजी ‘मानवी अवस्था’ ( Human condition) हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. कारण ‘मानवी अवस्था’ म्हणजे फक्त दिक्कालातीत अमूर्त मानवता नसून मूर्त/अमूर्त असा समग्र मानवी व्यवहार अभिप्रेत आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक हस्तक्षेप ठरतो आणि त्यातून इहवादी मानवतावाद प्रस्थापित करण्याचं पद्धतीशास्त्र हाती लागतं. इहवादी मानवतावादाचं प्रमुख उद्दिष्ट मनुष्याचं सुख असल्यामुळे, आधुनिक मूल्यव्यवस्थेत सुखवाद हे मूल्य आपोआप जोडलं जातं.
मानवी स्वातंत्र्य
पण मनुष्याचं अंतिम सुख कशात आहे, या प्रश्नाचं उत्तर आधुनिकता ‘मानवी स्वातंत्र्य’ या संकल्पनेनं देते. स्वातंत्र्याला आधुनिक मनुष्याचं सारतत्त्व ठरवून त्याअनुषंगाने ‘स्व’च्या गतिशील संकल्पनेचा उदय आणि विस्तार केला जातो. मध्ययुगीन चौकटीत ‘स्व’चा संकोच ‘आत्मा’ या स्थितिशील धार्मिक संकल्पनेत करून मानवी ‘स्व’च्या इहवादी पैलूंना नाकारण्यात आलं होतं. मात्र आधुनिकतेतली ‘स्व’ची संकल्पना मानवी स्वातंत्र्याचं द्याोतक असल्यानं तिला हेराक्लिटियन गतिशीलता आणि बहुजिनसीपणा आपोआप प्राप्त होतो. ‘स्व’च्या बहुविध पैलूंचा शोधाची परिणती एका बाजूला व्यक्तिवादाकडे नेणाऱ्या विचारशीलतेत आणि दुसऱ्या बाजूला उदारमतवादी समाजशीलतेत होते. त्यामुळे स्थितिशील ‘आत्म’कथनाची जागा गतिशील ‘स्व’कथन घेतं. फ्रेंच लेखक मोन्तेन्य आधुनिक ‘स्व’कथनाचा जनक समजला जातो. थोडक्यात, आधुनिकतेची मूल्यव्यवस्था इहवादी मानवतावादाभोवती आकार घेते; तिच्या केंद्रस्थानी समग्र मानवी अवस्थेला कवेत घेऊ पाहणाऱ्या वैश्विक, बुद्धिवादी, विचारशील, समाजशील, वस्तुनिष्ठ, उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, स्वायत्त ‘स्व’ ची संकल्पना आहे.
पण अनेकदा पाश्चात्त्य आधुनिकतेचा संकोच पुस्तकी सैद्धान्तिक चर्चेत केला जातो. खरंतर, आधुनिकता हा समग्र मानवी व्यवहाराला ढवळून काढणारा आणि जगाचा चेहरामोहरा बदलणारा दीर्घ प्रकल्प आहे. त्यामुळे आधुनिकता ही संकल्पना तीन पैलूंचा निर्देश करते : (१) आधुनिक मूल्यव्यवस्था, (२) त्याआधारे प्रस्थापित चौकटीची चिकित्सा आणि (३) आधुनिकतेच्या मूल्यव्यवस्थेला उत्क्रांत करण्याचं व अस्तित्वात आणण्याचं पद्धतीशास्त्र.
तर, आधुनिकतेच्या ऐतिहासिक प्रवासाचे तीन टप्पे ओळखता येतात : (१) आधुनिकतेची पहाट अर्थात रनेसॉन्स, (२) आधुनिकतेची मध्यान्ह अर्थात प्रबोधन युग आणि (३) आधुनिकतेचा अस्त अर्थात अपूर्ण आधुनिकता. या तीन टप्प्यांमध्येसुद्धा खंडितपणा आणि चढउतार आहेत.
रनेसॉन्सची प्रक्रिया आधुनिकतेचा पहिला टप्पा असल्यानं रनेसॉन्सचं मूल्यांकन करताना आधुनिकतेच्या चौकटीतील उपरोक्त तीन पैलूंचा आधार घेणं क्रमप्राप्त आहे. रनेसॉन्सच्या प्रक्रियेत आधुनिक मूल्यव्यवस्था कितपत उत्क्रांत झाली? प्रस्थापित मध्ययुगीन चौकटीच्या चिकित्सेच्या बाबतीत रनेसॉन्सचा पवित्रा काय होता? सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात रनेसॉन्सचा शेवट होऊन आधुनिकतेच्या सूर्याला ग्रहण का लागलं? त्यानंतर कार्टेशियन कोऑर्डिनेटस् हाती लागेपर्यंत आधुनिकतेच्या प्रकल्पानं कोणती दिशा घेतली? या प्रश्नांच्या मदतीनं प्रस्तुत लेखात रनेसॉन्सच्या दीर्घ प्रक्रियेच्या समारोपासोबतच कार्टेशियन क्रांतीपूर्व निर्माण झालेल्या बारोक (Baroque) सौंदर्यशास्त्राची संक्षिप्त चर्चा करू.
रनेसॉन्सचं मूल्यांकन
रनेसॉन्सच्या मुळाशी सुधारणावादी प्रक्रिया असल्याने रनेसॉन्सप्रणीत आधुनिकतेनं परलोकवाद न नाकारता इहवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यादृष्टीनं रनेसॉन्सची प्रक्रिया धर्मविरोधी नसून कालसुसंगत ‘खऱ्या’ धर्मश्रद्धा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच, रनेसॉन्सची चळवळ धर्मव्यवहार आणि लौकिक व्यवहार यांत फारकत घडवून राज्यसंस्था, कला, साहित्य आणि ज्ञान व्यवहाराचं धर्मनिरपेक्षीकरण घडवून आणते. पुढे आपण पाहणार आहोत की अठराव्या शतकातली प्रबोधन चळवळ रनेसॉन्सच्या सुधारणावादापेक्षा क्रांतिकारक परिवर्तनवादाला प्राधान्य देते.
पंधराव्या शतकापासून सतत उत्क्रांत होत गेलेल्या आधुनिक मूल्यव्यवस्थेनुसार मूल्यांचा प्राधान्यक्रम सतत बदलत गेला. रनेसॉन्सचा इहवाद प्रबोधन काळातल्या इहवादासारखा निखळ भौतिकवादी नसून अध्यात्मवादाशी संवादी होता. रनेसॉन्सचा माणूस ‘स्व’च्या सर्व पैलूंचा शोध, जडणघडण आणि आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. मोन्तेन्य म्हणतो त्याप्रमाणे ओतप्रोत भरलेल्या मडक्यापेक्षा चांगलं घडलेलं मडकं नेहमी बरं असतं आणि पुढे जाण्यापेक्षा सूर गवसणं जास्त महत्त्वाचं असतं ही रनेसॉन्सची शिकवण होती. त्यामुळे रनेसॉन्सच्या माणसासाठी उपयुक्ततावाद आणि प्रगतीवाद ही मूल्यं गौण ठरतात. एकोणिसाव्या शतकातल्या पुढारलेल्या आधुनिकतेत मात्र प्रगतीवाद आणि उपयुक्ततावादाला महत्त्व प्राप्त होतं.
खरंतर, रनेसॉन्सला आधुनिकतेची सुरुवात म्हटलं जात असलं तरी रनेसॉन्सप्रणीत आधुनिकतेचं अधिष्ठान प्राचीन ज्ञान परंपरा होत्या. त्यामुळे बर्ट्रांड रसेल नमूद करतो की पंधराव्या शतकापासून रनेसॉन्सच्या माणसांनी मध्ययुगीन चौकट नाकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असली तरी त्याजागी आधुनिक अधिष्ठान असलेली मूल्यव्यवस्था अस्तित्वात निर्माण करू शकले नव्हते. ‘प्राचीन काळी मनुष्य सुखी होता. मूळ संहितांमधील धर्म मानवतावादी होता’- ही भावना रनेसॉन्सच्या मुळाशी असल्यानं धर्मपरंपरांना बाजूला सारून सरळ प्राचीन मूळ धर्मग्रंथांचा आधार घेतला गेला. पण समजा मूळ संहिता किंवा प्राचीन परंपरा आधुनिकतेला परवानगी देत नसतील, तर सुधारणावादाला मुरड घालावी का? प्रबोधन युगातल्या प्रखर मानवतावादानं स्वातंत्र्याधिष्ठित मनुष्य हाच अंतिम आधार आणि प्रयोजन ठरवून मानवतावादाला स्वयंभूत्व आणि सार्वभौमत्व प्राप्त करून दिलं. त्यामुळे परंपरा प्राचीन असोत वा मध्ययुगीन, त्यांना पावित्र्य आणि कायदेकानू बनविण्याचा अधिकार नाकारण्यात आला.
थोडक्यात, प्राचीन जगाविषयी कितीही ममत्व वाटत असलं तरी आधुनिकतेची चाहूल लागलेल्या माणसाला मागे जाणं शक्य नव्हतं. पण नव्या जगाची चाहूल लागली असली तरी त्याची भाषा विकसित व्हायला प्रबोधन युगाची वाट पाहावी लागणार होती. एवढं मात्र निश्चित की रनेसॉन्सच्या प्रक्रियेने मध्ययुगीन चौकट अनाठायी ठरवून विज्ञानयुग आणि प्रबोधन युगासाठी मशागत केली.
बारोक सौंदर्यशास्त्र
पंधराव्या शतकात इटलीतील क्वॉत्रोचेन्तोच्या वातावरणात गतिशील झालेली रनेसॉन्सची प्रक्रिया फ्लॉरेन्स, विटेनबर्ग, पॅरिसनंतर सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमधील एलिझाबेथन काळात लंडनपर्यंत पोहोचते. मायकेलअॅन्जेलोचा ‘डेव्हिड’ आणि राब्लेचा ‘गारगॉन्तुआ’ रनेसॉन्सचा उत्तुंग आशावाद सूचित करतात; तर मिशेल द मोन्तेन्य (१५३३-१५९२) आणि विल्यम शेक्सपियरच्या (१५६४-१६१६) लिखाणात शेवटच्या टप्प्यातल्या परिपक्व रनेसॉन्सचं दर्शन घडतं. निखळपणे ‘ Be not afraid of greatness.’ म्हणण्याऐवजी परिपक्व रनेसॉन्सचा माणूस ‘ To be or not to be ’ या द्विधा मन:स्थितीत दिसतो. जीवन म्हणजे आशावाद आणि निराशावाद यांच्यातील उनसावलीचा खेळ आहे, हे बारोककडे जाणारं तत्त्वज्ञान स्वीकारतो.
‘बारोक’ या पोर्तुगीजमधून आलेल्या शब्दाचा अर्थ ‘पैलू न पाडलेला मोती’ असा आहे. पण बारोक या संकल्पनेचा वापर रनेसॉन्सच्या शेवटी निर्माण झालेल्या अराजक, अनिश्चित, संकटग्रस्त परिस्थितीचा निर्देश करण्यासाठी केला जातो. बारोक सौंदर्यशास्त्र समजून घेण्यासाठी हेराक्लिटस् आणि पार्मेनिडिज यांच्या वास्तवाविषयीच्या परस्परविरोधी भूमिकांचा परामर्श घेणं गरजेचं आहे.
‘वास्तव स्थितिशील ( stasis) असून गतिशीलता भ्रामक आहे,’ ही पार्मेनिडियन भूमिका आणि‘‘वास्तव गतिशील ( kinesis) असून स्थितिशीलता ही मनुष्याची कल्पना आहे,’ ही हेराक्लिटियन भूमिका प्लेटोच्या लिखाणात दोन जगांचा निर्देश करतात. एका बाजूला, सत्, शाश्वत, स्थितिशील जग. तर दुसऱ्या बाजूला, असत्, क्षणभंगुर, गतिशील जग. प्लेटो गतिशील जगाला शाश्वत जगाचं धूसर प्रतिबिंब मानतो. मध्ययुगीन जगाचं नियमन करणाऱ्या धार्मिक चौकटीच्या मुळाशीसुद्धा वास्तवाविषयीचं हे द्वंद्व होतं. सत्, शाश्वत परलोक विरुद्ध असत्, क्षणभंगुर, गतिशील इहलोक. रनेसॉन्सच्या प्रक्रियेत मात्र ईहवादाला प्रस्थापित करून हेराक्लिटसची भूमिका स्वीकारण्यात आली; कारण त्याशिवाय स्वातंत्र्याची कल्पना करता आली नसती.
हे खरं आहे की मध्ययुगीन चौकटीनं बांधून ठेवलं होतं. पण त्या बांधून ठेवण्यातही एका प्रकारचा आधार होता. त्या चौकटीतून सुटका झाल्यावर स्वातंत्र्याचं ओझं पेलणं अधिक कठीण वाटलं. कारण गतिशील जगाचा अर्थ लावण्यासाठी तोवर देकार्त, गॅलिलिओ, न्यूटन यांच्या इहवादानुकूल प्रतिपादनांचा आधार मिळालेला नव्हता. त्यामुळे बारोक कालखंड म्हणजे निराधार, दिशाहीन मन:स्थितीतचा काळ. भूतकाळ मार्गदर्शक म्हणून निरुपयोगी ठरतो आणि भविष्य अनिश्चित वाटतं तेव्हा अस्तित्वात असणं यातच आश्चर्य, आनंद आणि नशा वाटते. जीवन कधीही न सुटणारा गुंता. माणूस म्हणजे अंतर्विरोधांचा पुतळा. उद्याचा भरवसा नसल्यानं बारोक सौदर्यशास्त्रातल्या नियोजन, शिस्त, प्रयोजन, स्थैर्य या साऱ्याच आग्रहांना निरर्थक ठरवतं. कलाकृतींमध्ये सरळ रेषांऐवजी असमान गतिशील वळणं, भडक रंगांचा उत्सव आणि उत्कट भावनांचा अतिरेक दिसतो.
sharadcrosshuma@gmail.com