चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेने सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वाढदरात ७.८ टक्के असे अलीकडच्या काळातील विक्रमी प्रमाण गाठले आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफराज’च्या धास्तावलेल्या वातावरणात आशांकुर फुलले. हे अतिशय स्वाभाविक. कारण ट्रम्प यांनी झाडून सगळे देश सोडून अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्काची धोंड भारताच्याच गळ्यात बांधल्यामुळे सरकार आणि उद्याोगजगत हतबल आणि हतबुद्ध झाले आहेत. रशियाकडून तेल खरीदणारे देश अनेक. स्वत:च्या बाजारपेठा व शेतकऱ्यांच्या संरक्षणार्थ बाहेरील वस्तुमालाला अटकाव करण्यासाठी आयात शुल्काची भिंत उभारणारे देशही बरेच. पण या दोन्हींबद्दल कठोर शिक्षा झालेला देश मात्र एक. आपला भारत. अमेरिकेच्या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या देशातील अनेक लघु आणि मध्यम उद्याोगांसमोर संभाव्य मागणी घट आणि रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. अमेरिकेचे पहिल्या टप्प्यातील २५ टक्के शुल्क ऑगस्टच्या सुरुवातीस लागू झाले, दुसऱ्या टप्प्यातील शिक्षा शुल्क लागू झाले ऑगस्टच्या अखेरीस. केंद्र सरकारच्या पहिल्या तिमाहीतला ताळेबंद असतो एप्रिल-मे-जून अशा तीन महिन्यांचा. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्वाधिक सुदृढ तिमाहींपैकी ही एक मानली जाते. त्यामुळे इतर तिमाहींच्या तुलनेत या तिमाहीतील आकडे अनेकदा आश्वासक असतात. तरीदेखील अनेक अर्थ विश्लेषक आणि रिझर्व्ह बँकेचे अंदाज चुकवत असाधारण वाढ नोंदवलेल्या ताज्या तिमाहीची दखल घ्यावीच लागेल.
या आकडेवारीविषयी सरकारदरबारी व्यक्त होत असलेले समाधान आणि संतोष योग्यच. ट्रम्प यांच्या जाचक टॅरिफची चाहूल लागल्यामुळे निर्यातदारांनी अधिकाधिक माल अमेरिकेला पोहोचवण्याची व्यवस्था केली. ही वाढ २२ टक्के इतकी घसघशीत होती. तिचेही प्रतिबिंब अर्थव्यवस्थेचा विकासदर मानला जाणाऱ्या ‘जीडीपी’ वाढदरात उमटलेच. ही त्वरा-निर्यात (फ्रंट लोडिंग) अपेक्षित होती. रिझर्व्ह बँकेने ६.५ टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त केलला होता. स्टेट बँक आणि इतर काही विश्लेषकांनी त्यापेक्षा थोडा अधिक म्हणजे ६.६ ते ६.८ टक्के विकासदर अंदाजला होता. सरकार आणि रिझर्व्ह बँकेची प्रतिक्रिया पाहता त्यांना इतक्या अधिक विकासदराची अपेक्षा नव्हती असे दिसते. गतवर्षी निवडणुकांमुळे पहिल्या तिमाहीत सरकारी खर्चावर मर्यादा होती. या वेळी ती नसल्यामुळे जवळपास ५२ टक्के वाढ नोंदवली गेली, त्याचाही फायदा झाला. सेवा क्षेत्राने सर्वाधिक ९.२ टक्क्यांची वाढ नोंदवली. पर्यटन, वाहतूक, दळणवळण, वित्तीय क्षेत्र, बांधकाम क्षेत्र अशी ही वाढ सर्वांगीण होती. उत्पादन आणि कृषी क्षेत्रातही जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत भरीव वृद्धी दिसून आली. कृषी क्षेत्रात ती दुपटीहून अधिक होती, तर उत्पादन क्षेत्रात दुपटीच्या जवळपास जाणारी होती. या काळात देशातील अनेक खाणींच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी खनिकर्म क्षेत्रातील वाढ मंदावली. अन्यथा उत्पादन क्षेत्राचे आकडे अधिक उत्साहवर्धक दिसून आले असते.
या वृद्धी लघुपर्वाची दखल घेत असताना, त्याचा अतिरंजित उत्सवी श्लेष काढणे टाळलेलेच बरे. त्याची कारणे दोन. त्यातील एक तांत्रिक नि दुसरे परिस्थितीजन्य. विकासदराचे गणन करताना एका महत्त्वाच्या घटकाची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. विशिष्ट तिमाहीतील तयार वस्तुमाल, अन्नधान्य, सेवा उत्पादनास नाममात्र उत्पादन (नॉमिनल जीडीपी) असे संबोधले जाते. त्यातून चलनवाढ उणे केल्यानंतर मिळते, ते वास्तव उत्पादन (रीअल जीडीपी). यंदा किरकोळ चलनवाढ तीन टक्क्यांच्या खाली आली असून, घाऊक चलनवाढ तर एक टक्काही नाही. परिणामी पहिल्या तिमाहीत नोंदवल्या गेलेल्या ८.८ टक्के नाममात्र उत्पादन वृद्धिदरात चलनवाढ फारशी उणे झालीच नाही आणि ७.८ टक्के इतकी घसघशीत वाढ दिसून आली. पण बँक पतपुरवठा आणि ग्राहकोपयोगी वस्तू या अर्थव्यवस्थेच्या थेट निर्देशकांतील हालचाल उदासीन आहे. यासाठीच रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने प्रोत्साहनपर व्याजदर कपात केली जात आहे आणि मध्यवर्ती बँक तसेच सरकार अशा दोहोंना ७ टक्क्यांपेक्षा अधिक विकासदराची अपेक्षा नव्हती! ऑगस्ट महिना सरताना ५० टक्के अमेरिकी टॅरिफ लागू झाले आहे. तो धक्का दुसऱ्या तिमाहीत प्रतिबिंबित होणार हे निश्चित. टॅरिफची झळ पोहोचणाऱ्या क्षेत्रांसाठी काय करणार हे निश्चित नाही. दिवाळीच्या आसपास वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) सुसूत्रीकरणातून उपभोग्यता वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. पण त्यापूर्वी विद्यामान परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. विक्रमी वृद्धीतून दिसलेले आश्वासक चित्र पाहाताना या आव्हानाचे भान राखणे श्रेयस्कर.