गेल्या मंगळवारी ‘बुकर’ पुरस्काराच्या यादीमध्ये किरण देसाई यांच्या ‘द लोन्लीनेस ऑफ सनी अॅण्ड सोनिया’ या कादंबरीचा समावेश झाला. तर या सोमवारी ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकाने ‘अॅन अनअशेम्ड प्रपोजल’ या शीर्षकाने (चित्रासह) नऊ पानांचा त्यातला भाग या आठवड्याची कथा म्हणून सादर केला. या कथाभागाची सुरुवात १९९७ सालातील अमेरिकेत असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेत रात्रपाळी करणाऱ्या सनी भाटिया याला आलेल्या ‘चिठ्ठी’पासून होते.
कृष्णवर्णीयांच्या प्रार्थनास्थळांची नासधूस, ओसामा बिन लादेनने अमेरिकेविरोधात छेडलेले युद्ध, चार्ल्स आणि डायनाचा काडीमोड… अशा वृत्तांची जुळवाजुळव ‘एपी’च्या शैलीपुस्तकाबरहुकूम करीत त्याची पत्रकारितेची उमेदवारी सुरू झालेली असते. वतनातून आलेल्या ‘चिठ्ठी’ची तातडीने ‘मिट्टी’ करण्याच्या आवेशात हा सनी जातो. त्याचे कारण सोनिया नावाच्या अमेरिकी विद्यापीठातच शिकायला अवतरलेल्या मुलीचे ‘स्थळ’ घेऊन छायाचित्रासह जोडलेले ते पत्र असतेे. पत्रानंतर सनीला भारतातून आईचा फोनही येतो.
उला नावाच्या अमेरिकी मुलीसह विवाहवजा आनंदसंबंध जोडलेल्या या सनीची एकुणातच अशा लग्नप्रस्तावांकडे पाहण्याची कटू दृष्टी निवेदनातून स्पष्ट होते. पुढे कथेत सुरू होतात सनीचे जगड्व्याळ वृत्तसंस्थेतले नगण्य अस्तित्व तसेच उला आणि दिल्लीतूनच आलेल्या माला या भारतीय मुलीचे संदर्भ, त्याचे भारतीय नातेवाईकांपासून लपवून चाललेले रोमान्सिक चाळे, उला-माला यांच्या नजरेतून भारतीय पुरुषांची वैशिष्ट्यचर्चा, पत्र-फोनद्वारे भारतात सनीच्या आईचे सनीसाठी चाललेले लग्नजुळवू प्रयत्न आणि भारतात घरकाम करणाऱ्या गुंजा या महिलेच्या विनिता- पुनिता या दोन मुलींचे सनीच्या आईच्या तोंडचे किस्से आदींबाबत बरेच गमतीशीर तपशीलही वाचकाला मिळू लागतात.
किरण देसाई यांची याआधीची कादंबरी २००६ चा ‘बुकर’ पुरस्कार मिळाला म्हणून भारतीय रस्तादालनांतील पुस्तकवाल्यांकडेसुद्धा उपलब्घ होती. दशकभरात जमली तेव्हा विकत घेऊन अनंत कारणांनी वाचता न आल्यामुळे फडताळात शोभेसाठी ठेवणाऱ्यांची संख्या भारतात अधिक असेल. जगभरातील वाचणाऱ्या कथागंभीर वाचकांसाठी (आणि भारतातील केवळ हौशी खरेदीदारांसाठीही) ‘न्यू यॉर्कर’ची ही नऊपानी कथा सातशे पानांच्या कादंबरीकडे जाण्याचे प्रवेशद्वार ठरावी. ‘समर फिक्शन’ची उधळण अमेरिकी-ब्रिटिश मासिकांतून गेल्या महिन्याच्या आरंभापासून जोरदार होत असताना त्यांची किरण देसाई यांच्या कादंबरीचा अंश लगेच उपलब्ध करून वाचकाला जोडण्याची तत्परता नमूद करणे म्हणूनच महत्त्वाचे.
गेल्या दशकभरात न्यू यॉर्करला पुरस्काराची पूर्ण खात्री असलेल्याच बुकर यादीतील लेखक-लेखिकेची गोष्ट त्यांनी न्यू यॉर्करच्या व्यासपीठावरून समोर आणली. पण त्यांच्या द्रष्टेपणालादेखील भारतीय लेखनासंदर्भात एक इतिहास आहे, तोही जाणणे आवश्यक. डेव्हिड रेम्निक संपादकपदी येण्याच्या एक वर्ष आधी वगैरे ‘न्यू यॉर्कर’ने ‘इंडियन फिक्शन’चा खास अंक त्यांच्या उन्हाळी विशेषांकाचा भाग म्हणून दिला. त्यात अनेक दिग्गज आणि उभरत्या-भविष्यातील भारतीय कथाविश्व गाजवू पाहणाऱ्या लोकांचे एकत्रित छायाचित्र काढले.
विक्रम चंद्रा, रोहिंटन मिस्त्री, सलमान रश्दी, अनिता व किरण देसाई, अमित चौधरी, विक्रम सेठ, आर्देशीर वकील, श्रीलंकेचे रोमेश गुनसेकरा आणि एका चित्रपटात पटकथालेखिकेसह नायिकेची भूमिका वठवून मग तिरीमिरीत कादंबरी लिहिणाऱ्या अरुंधती रॉय नामक तरुणीदेखील या छायाचित्रात दिसते. जून १९९७ च्या अंकात हे छायाचित्र न्यू यॉर्करने जगासाठी उपलब्ध करून दिले. त्या वर्षाच्या अखेरीस अरुंधती रॉय या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’साठी बुकरच्या पारितोषिक विजेत्या बनल्या होत्या.
न्यू यॉर्करच्या कथा सगळ्याच खंडात गांभीर्याने वाचल्या जातात आणि तिथे छापला गेलेला कुठल्याही देशातला ‘लोकल’ लेखक ‘ग्लोकल’ होतो, त्याचा हा अगदी छोटा मासला. मराठीत साठ सालाच्या आधीबिधी कधीतरी लिहिली गेलेली ‘नवकथा’ नंतरच्या काही दशकांत ‘जुनी’ झाली, हे मानायला तयार नसणाऱ्या वाचनालयधार्जिण्या साधारण वाचकांना आणि क्ष-किरणकार टोळीकडून ‘कथा’ प्रकाराला गौणतेची लावली गेलेली लेबले खरी मानणाऱ्या प्राध्यापकधार्जिण्या घडत्या वाचकांना कथा आणि कथनसाहित्याचा हा वार्षिक व्यवहार म्हणूनच जाणून घेण्याची गरज अधिक.
‘प्रेरित’ कथांची दिवाळी!
…तर दर आठवड्याला एकच कथा छापणाऱ्या या साप्ताहिकाचा ‘फिक्शन इश्यू’ हा अमेरिकी उन्हाळसुट्टी वाचनाची वर्दी घेऊन येतो. आपल्या मराठीत महत्त्वाच्या किंवा परमोच्च ‘लिटररी’ ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी अंकासारखे याचे स्वरूप. शताब्दीनिमित्ताने दरवर्षीपेक्षा यंदा वेगळे असणार, याची शाश्वती असताना त्यांनी खासच कथाजामानिमा खणून काढला. न्यू यॉर्करच्या शंभर वर्षांच्या इतिहासात आवडलेल्या कथेवरून प्रेरित अशी स्वतंत्र कथा रचण्यास आजच्या लिहित्या कथाकारांना सांगण्यात आले. त्यातून झेडी स्मिथ, झुुंपा लाहिरी आणि ओटेसा मॉशफेग या तीन लेखिकांच्या गोष्टी त्यांनी यंदाच्या ‘समर फिक्शन इश्यू’मध्ये आणल्या.
मेव्हिस गलांट यांच्या १९७६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘व्हॉइस इन द स्नो’ या कथेची प्रेरणा घेऊन झुंपा लाहिरी यांनी ‘ज्युबिली’ ही कथा लिहिली. मेव्हिस गलांट या कॅनडात जन्मल्या. आयुष्याचा उत्तरार्ध त्यांनी गाजवला मात्र पॅरिस शहरात. आरंभीचा काळ त्यांनी पत्रकारिता केली. १९५१ पासूून न्यू यॉर्करमध्ये त्यांच्या कथा झळकल्या. फ्रान्समधून न्यू यॉर्करसाठी पत्रकारिता आणि साहित्यकारिता दोन्ही सुरू राहिले.
विशेषत: १९६८ सालातील फ्रान्समधील विद्यार्थांचा उठाव त्यांनी या साप्ताहिकासाठी खास वृत्तबद्ध केला. वेस अॅण्डरसन या चित्रपट दिग्दर्शकाने जो ‘फ्रेन्च डिस्पॅच’ नामक चित्रपट ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिक समोर ठेवून केला, त्यात मेव्हिस गलांट यांच्यावर बेतलेली व्यक्तिरेखा ही फ्रान्सिस मॅकडरमाँड यांनी साकारली, (केवळ या अतिरिक्त संदर्भासाठी हा चित्रपट पाहा.) झुंपा लाहिरी यांनी कथेसह दिलेल्या टिपणात म्हटले आहे की, ‘होम ट्रूथ’ या गलांट यांच्या आज अनुपलब्ध असलेल्या संग्रहात ही कथा नव्वदच्या दशकात कधीतरी वाचनात आलेली. झुंपा लाहिरी लंडनमध्ये जन्मल्या, अमेरिकेत वाढल्या आणि कथांमध्ये भारतीय मूळ सातत्याने उगाळत राहिल्या.
‘ज्युबिली’ कथेत कोलकात्यामधल्या आजीच्या मृत्यूच्या निमित्ताने पुन्हा अल्पकाळासाठी भारतात जाण्याआधी लंडनमध्ये कराव्या लागलेल्या वास्तव्याचे तपशील आहेत. भारतीय कुटुंबांचे ब्रिटनमध्ये एकमेकांच्या जवळपास वास्तव्य, अमेरिकी-ब्रिटिश इंग्रजी उच्चारणांमधील फरक, दोन्ही देशांमधील अंतर्वस्त्रांच्या दर्जाचीदेखील सूक्ष्मात चर्चा घडवणारी ही कथा. इटलीतील घरोबा, त्या भाषेतील लेखन आणि अनुवाद अशी सगळी साहित्यिक हौस करून झाल्यानंतर न्यू यॉर्करमधील ही कथारूपी उपस्थिती दोन कारणांसाठी महत्त्वाची. मेव्हिस गलांट यांच्या मूळ कथेपर्यंत पोहोचून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी आणि गलांट यांची ग्रॅण्टामध्ये लाहिरी यांनीच (२००९ साली) घेतलेली प्रदीर्घ मुलाखत वाचायचा मोह यामुळे होऊ शकेल. ‘कथा’ या प्रकाराकडे किती गांभीर्याने पाहायला हवे, याची बैठक पक्की करणारा या मुलाखतीमधील संवाद आहे.
झेडी स्मिथ ब्रिटिश लेखिका. ‘माय फादर अॅड्रेस्ड मी ऑन द फॅक्ट्स ऑफ ओल्ड एज’ या ग्रेस पेली यांच्या २००२मध्ये प्रकाशित झालेल्या कथेच्या संकल्पनेवर बेतलेली तिची ‘द सायलेन्स’ ही तृतीयपुरुषी निवेदनातील कथा या फिक्शन विशेषांकात आहे. रुग्णालयातील प्रसवोत्तर मानसिक आजाराच्या विभागातून अकाली निवृत्तीच्या दिवशी अंतर्गत शांतता गवसलेल्या बाईची कथा. वृृद्धत्वाची जाणीव आणि आयुष्यात भरपूर काही करायचे राहून गेल्याची संवेदना घेऊन ही व्यक्तिरेखा रुग्णालयातून बाहेर पडते. घरी आपल्या बेरोजगार मुली आणि पती यांच्यापाशी पोहोचण्याऐवजी थेट पोलंडमधील एका शहरात जाते. या प्रवासात दिसणाऱ्या दृश्यांची नोंद हा कथेचा ऐवज. अमेरिकी शहरांमधील दैनंदिन जगणे पेली यांच्या कथाविश्वाचा गाभा. उतारवयापर्यंत त्यांच्या कथा न्यू यॉर्करमधून सातत्याने येत राहिल्या. झेडी स्मिथ यांनी हीच कथा आपल्या स्वतंत्र कथेची प्रेरणा म्हणून का पाहिली, याचे टिपण न्यू यॉर्करमध्ये वाचणे इष्ट.
या साप्ताहिकाच्या १९५४ सालातील अंकात हेरॉल्ड ब्रॉडकी यांच्या छापून आलेल्या ‘द स्टेट ऑफ ग्रेस’ या कथेची संकल्पना कोरून काढत ओटेसा मॉशफेग यांची ‘ द कॉमेडियन’ ही थोर कथा तयार झालीय. गरीब वस्त्यांतील लोकांचे जगणे मांडणाऱ्या शहराने उजवून टाकलेल्या भागातील वस्तीत राहणारा एक लहान मुलगा आपल्या वडिलांची माहिती या कथेतून देतो. निवेदकाचे वडील दिवसा तो शिकत असलेल्या शाळेत मास्तरकी करतात, पण रात्रपाळीचे काम एका हलक्या रेस्तराँमधील स्वागतकक्षात करून कमाई वाढवतात. त्याच्या घरात दृष्टी अधू झालेली त्याची आई आणि आठवड्याला विशिष्ट दिवशी घराची देखभाल करण्यासाठी येणारी तरुण मुलगी इतका स्त्री-वावर.
दिवसा झोपणे टाळण्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे वडिलांच्या शरीरावर होणारा परिणाम आणि संध्याकाळी कधीतरी मद्यामुळे होणारे दुष्परिणाम यांच्या धावत्या नोंदी कथेत येतात. सफाई करण्यासाठी येणाऱ्या तरुणीकडून मिळणारे भलतेच शिक्षण, भवतालच्या हलक्या रेस्तराँमध्ये दारुडे-वेश्या आणि इतर भणंगांसह वडिलांकडून मिळणारे जगण्याचे सहजधडे हा कथेचा विषय.
‘समर फिक्शन’च्या अंकासह न्यू यॉर्कर जुलै ते सप्टेंबर सलग ऑनलाइन ‘फ्लॅश फिक्शन’चा मेवा वाचकांना उपलब्ध करून देते. ३ जुलैपासून तो सुरू झालाय. यंदा त्यातले खास आकर्षण एफ. स्कॉट फित्झगेराल्ड यांच्या एका लघुतम कथेचे प्रकाशन. १९४० साली लिहिली गेलेल्या या कथेचे हस्तलिखित प्रिन्स्टन विद्यापीठात ठेवण्यात आलेल्या फित्झगेराल्ड यांच्या कागदपत्रांतून एका संशोधक, लेखिकेने हुडकून काढले. कागदपत्रांत शीर्षक नसलेली ही कथा ‘डबल टाइम फॉर पॅट हॉबी’ शीर्षकाने न्यू यॉर्करच्या संकेतस्थळावर वाचायला मिळेल. इतर लघुतमकथांचीही आकर्षणे आहेत.
आणखी कथाविशेषांक…
‘पॅरिस रिव्ह्यू’च्या समर फिक्शन अंकामध्ये यंदा श्रीलंकी लेखक अनुक अरुदप्रगासम यांची ‘द व्हिजिट’ ही कथा आलीय. श्रीलंकेमध्ये घडणारी अरुदप्रगासम यांची नवी दु:खकहाणी. त्याबरोबर जॉय विल्यम्स यांची ‘आफ्टर द हायकू पीरियड’ हीदेखील वाचनीय गोष्ट. ‘व्हीक्यूआर’ या नियतकालिकाचा शताब्दी अंक ‘स्प्रगिं २०२५’ असला, तरी तो येतायेता ‘समर’ उजाडला. सोवांखम थामावोंग्सा या कॅनडातील लेखिकेची ‘ए प्लेस टू प्रे’ ही कथा यात वाचायला मिळते. लाओसमधून स्थलांतरित व्यक्तींची ही कथा. त्यांच्या धर्म आणि कर्मधारणांचा तपशील या कथेमधून उलगडतो. धर्माच्या नावावर ढोंग किंवा दुटप्पीपणा जगातल्या सगळ्याच भागात सारखाच असू शकतो, याची खात्री ही कथा करून देऊ शकेल.
यंदा आफ्रिकेच्या ‘केन’ पारितोषिकाची लघुयादी यायला दिरंगाई झालीय. तरी ‘कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरीज’च्या लघुयादीत असलेल्या सर्वच कथा देशोदेशीच्या नवकथाकारांतील सर्वोत्तमाचा शोध असतो.
‘प्लाऊशेअर’ने आपल्या समर फिक्शन अंकातल्या तीन कथा आत्तापर्यंत वाचनासाठी उपलब्ध केल्यात. शोधाल तितक्या मोफत कथांची चंगळ आपल्या वेळऐपतीनुसार या कालावधीत करता येतो. कथा सादर करण्याच्या प्रयोगांत न्यू यॉर्करच्या जवळपासदेखील कुणीच नसते. संपादक डेव्हिड रेम्निक यांनी एका मुलाखतीतच म्हटले होते की, ‘मी लिहीत जरी नॉनफिक्शन असलो, तरी माझ्या वाचनाचा सर्वाधिक भाग फिक्शनच असतो.’
आपल्याकडे कथांवर प्रेम करण्याची वृत्ती दिवाळी अंकापलीकडे किती नियतकालिकांच्या संपादकांकडे दोन हजारोत्तर काळात राहिली? साठोत्तरीत भाऊ पाध्येंनी, ढसाळांनी आणलेल्या गोलपिठ्याआधी नवकथेत गाजणाऱ्या अरविंद गोखले यांनी लिहिलेल्या वेश्यालयांवरील कथा ‘अजुनी जुनेच वेचणाऱ्या आणि वाचणाऱ्या’ किती वाचकांच्या आठवणींत आहेत? राम कोलारकरांनी रचून ठेवलेल्या सर्वोत्कृष्ट मराठी कथांच्या विविधप्रकारी खंडांवरील वाचनालयांतील धुळीची पातळी का वाढत चालली आहे? कथा हा ‘एम.ए.’ पातळीपर्यंतच्या शिकवण्याचा-शिकण्याचा भागच नष्ट करण्याचा प्रयत्न झालेल्या आपल्या भवतालात कथानिराशेची पुटे चढतच जाण्याची शक्यता अधिक असताना आंग्ल भाषेत ‘समर फिक्शन’चा आधारच वाचनगंभीरांसाठी राहील.
पंकज भोसले / pankaj.bhosale@expressindia.com