गाझात घडत असलेल्या उलथापालथीबाबतचे मौन पॅलेस्टिनी लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. तिथे जे घडते आहे ते पाहता मानवी समाजाची नैतिक अधोगती सुरू आहे. या पद्धतीने, एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होता कामा नयेत, असे एकेकाळी मान्य करणाऱ्या, मानवतावादी संवेदनशील भूमिकेचा आग्रह धरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्याची धार आता हळूहळू कमी होत चालली आहे.
या भयावह प्रकाराला कायदेशीर आणि नैतिक पातळीवर काय म्हणायचे, यावर सध्या चर्चा सुरू आहे. तरीही विरोधाभास असा की, हे अत्याचार प्रत्यक्ष दिसणार नाहीत, याचीही काळजी घेतली जात आहे. यापुढे कधीही युद्धविरामाची घोषणा झाली, तरीही तो उशीरच असेल. मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि विनाश झाल्यानंतरच जगाचा विवेक जागा होईल आणि जे काही उरेल त्याला ‘शांतता’ म्हटले जाईल. पण गाझामधल्या या असल्या शांततेचे सखोल विश्लेषण करण्याची गरज आहे. कदाचित मानवतेकडून नैतिक प्रगतीची अपेक्षा करणे हेच मुळात भोळसटपणाचे असावे.

ब्रूस रॉबिन्सने Atrocity: A Literary History या ग्रंथात मांडले आहे की, इतिहासातही अत्याचारांबाबत नैतिक संताप व्यक्त केला गेलेला नाही. हवामान जसे काहीसे क्रूर, सवयीचे असते आणि नैतिक पातळीवर त्याची नोंद घेतली जात नाही, तसेच मानवी इतिहासात हिंसेकडे बघितले गेले आहे. त्यामुळे इतिहासकाळात निरपराध नागरिकांची हत्या ही सामान्य बाब होती, आणि बरेचदा पीडितांनीही स्वत:कडे अन्याय सहन करणारे म्हणून नाही तर केवळ पराभूत म्हणूनच पाहिले. अनेकदा तर सामूहिक हिंसेकडे मोक्षदायी म्हणूनही बघितले गेले आहे.

हिंसेबाबत नैतिक संकोच असलेल्या शासकांचे संदेहदेखील निवडकच असत. युद्धकाळातील नैतिक जबाबदारीचा सामना करणाऱ्या मोजक्या कादंबऱ्यांपैकी एका – कर्ट वॉनिगट यांच्या Slaughterhouse- Five – मधील एक पात्र म्हणते, ‘‘ So it goes.’’ (‘ते तर घडतच असते.’)

रॉबिन्स यांच्या चिंतनातून मानवजातीने अत्याचारांचा थेट सामना करण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी स्वीकारलेल्या अनेक पळवाटांचा पर्दाफाश केला आहे. नैतिक अपेक्षा क्वचितच सामूहिक अस्मितांवर मात करतात. अत्याचारांवर टीका होते तेव्हा त्या टीकेला अनेक मर्यादा असतात. या टीकेने विद्यामान सत्तारचनेला अस्थिर करू नये, ही अट गृहीत धरलेलीच असते. रूढीवादी लोकांना सामूहिक हिंसेची भीती असते ती मानवहानी होईल म्हणून नाही, तर या हिंसेमुळे सामाजिक सुव्यवस्थेला धक्का बसेल म्हणून. कोणत्याही समाजाला स्वत:चे दोष मान्य करायला फारसे आवडत नाही. कोणत्याही लेखकाच्या साहित्यात कितीही मोठ्या प्रमाणात हिंसाचार असला तरी, त्याला किंवा त्याच्यासारख्या अनेक लेखकांना आपल्या स्वत:च्या समाजाला अत्याचारांबद्दल जाब विचारणे कठीण जाते.

आजच्या काळात आपण अशा जगात जगत आहोत जिथे एखादा नैतिक पातळीवर चिंता व्यक्त करत असेल तर त्याच्या या भूमिकेवरच शंका घेतली जाते. या भूमिकेचे विकृतीकरण केले जाते. अत्याचारांविषयी बोलणाऱ्या लोकांकडे सजग नागरिक म्हणून न पाहता स्वत:ला नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ समजणारे, दुसऱ्यांना अपराधी ठरवणारे लोक म्हणून पाहिले जाते. अशा चर्चेचा उद्देश इतरांवर नैतिक दडपण आणणे, आपलीच श्रेष्ठता दाखवणे, असा असतो असे गृहीत धरले जाते. लोक आपल्या समूहाच्या, धर्माच्या, जातीच्या, राष्ट्राच्या किंवा इतर सामूहिक अस्मितांच्या निष्ठेत अडकतात, तेव्हा व्यापक नैतिकतेसाठी जागा उरत नाही. तो पाया संकुचित होत जातो.

गाझामध्ये जे काही होते आहे, त्याला सक्रिय विरोध करून शांततेची मागणी करणाऱ्या एका तरी देशाचे उदाहरण आहे का? अमेरिका केवळ आपल्या देशातच नाही, तर जागतिक पातळीवरही गाझाविषयीच्या वक्तव्यांवर बंदी घालू पाहते. संयुक्त राष्ट्रातील अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, आणि जागतिक समुदायाकडून याबाबत फारसा विरोधही दिसून येत नाही. भारतात तर आता इस्रायलवर टीका करणे म्हणजे तुम्ही ‘चुकीच्या बाजूला’ आहात असे समजले जाते. पश्चिम आशियातील देशही इस्रायलवर टीका होऊ देत नाहीत. झालीच तर ती नियंत्रित करतात. ऑस्ट्रेलिया सध्या ज्यूविरोधाची (अँटी-सेंमिटिझम) अशी व्याख्या स्वीकारण्याच्या विचारात आहे, जी ‘द एज’ या वर्तमानपत्रात रिचर्ड फ्लॅनगन यांनी नमूद केलं आहे त्याप्रमाणे जोसेफ रोथ, टोनी जड्ट, ओमर बार्टोव्ह अशा काही सर्वांत नैतिक आणि धैर्यशील ज्यू मते मांडणाऱ्या विचारवंतांनाही ज्यूविरोधी ठरवू शकते.

युरोपमधील बरेचसे देश इस्रायलबरोबरचे संबंध त्यांच्या ‘राष्ट्रहिता’चे (reason of state) मानू लागले आहेत. काही देश आपल्या कृतीतून किंवा निष्क्रिय राहूनही गाझामधील अत्याचारांवर प्रतिक्रिया देऊ शकतात. पण तसे करण्यात ते अपयशी ठरले आहेत आणि त्यामुळे ते त्या गुन्ह्यांमध्ये सहभागीच ठरतात. पण आता असे वाटू लागले आहे की संपूर्ण जगच या अत्याचारांवर मौनाचा पडदा टाकण्यात सहभागी होत चालले आहे.

‘‘पुन्हा कधीच नाही’’ ही संकल्पना सार्वत्रिक असली पाहिजे, हा होलोकॉस्टमधून मिळालेला सर्वांत महत्त्वाचा नैतिक धडा आता विसरला जात आहे. या इतिहासाचा उपयोग राज्यसंघटित हिंसाचाराच्या समर्थनासाठी केला गेला, तर ती या स्मृतींशी केलेली गद्दारी ठरेल. ज्यूविरोध ही एक खरी आणि तातडीची समस्या आहे. पण तिचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला गेल्यामुळे त्या संकल्पनेतील नैतिक आशयच संपण्याच्या मार्गावर आहे. प्रतिक्रियावादी शक्ती आता ज्यूविरोधाचा उल्लेख द्वेषाविरुद्ध लढण्यासाठी नव्हे, तर टीका दाबून टाकण्यासाठी, चिंतन रोखण्यासाठी, आणि जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी करतात.

पश्चिमेकडील बहुतांश लोकशाही देश आता आपल्या लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्याशी ज्यू लोकांसाठी नाही तर इस्रायलच्या धोरणांसाठी तडजोड करत आहेत. पश्चिम आशियातही पॅलेस्टाईनविषयीची चर्चा, विवाद सरकारी दडपशाहीमुळे संकुचित झाला आहे. ‘चुकीच्या बाजूला’ ठरवले जाण्याची, सुडाची भीती, सार्वजनिक चर्चेचा परीघ गोठवते. अगदी सामाजिक चळवळीदेखील कोणालाही त्यांच्या अस्मितेमुळे लक्ष्य केले जाऊ नये; आणि लढाईत सहभागी नसलेल्या सामान्य नागरिकांची सामूहिक हत्या कधीच न्याय्य ठरू शकत नाही या सार्वत्रिक तत्त्वाची मांडणी करण्यात अपयशी ठरत आहेत. आपण सध्या एका नीतिहीन काळात अडकलेलो आहोत, जिथे ‘सत्तेच्या मर्यादा काय असाव्यात? कोणती तत्त्वे सर्व राष्ट्रांना आणि घटकांना बांधून ठेवायला हवीत?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरत नाही तर ‘तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

ही समूहनिष्ठा (tribalism) नवीन नाही; आणि ढोंगी ( hypocrisy) तर अजिबातच नाही. पण अलीकडच्या काळात नैतिक चिंतनावरचा असा इतका मोठा टाच याआधी कधी दिसला नव्हता. मानवतेचा आधार घेऊन नाही, तर सत्ता कोणत्याही स्वरूपात असो, तिला पूर्णत: मोकळे सोडून, तिचा मनमानी वापर होऊ देण्यातच आपला विजय आहे, असे जणू काही आपल्याला वाटू लागले आहे.

गाझातील भयावहता इतकी उघड आहे की त्याचे वेगळे स्पष्टीकरण करणे किंवा संदर्भ देणेही बीभत्स ठरावे. ही आता एखाद्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकण्याची नाही तर टाळाटाळ करण्याची साधने आहेत. टाळाटाळ आणि मौन लोकशाहीच्या व्यापक नागरी अपयशांशी जोडलेले आहेत. ‘हार्पर्स मॅगझिन’मधील प्रभावी निबंधात -‘Speaking Reassurance to Power’ लेखक पंकज मिश्रा यांनी गाझावरील मौन आणि लोकशाही संस्थांमधील नागरी धैर्याचा ऱ्हास यातील नाते ठळकपणे अधोरेखित केले आहे. या निबंधात ते लिहितात: ‘‘उच्च नैतिकतेचा दावा करणाऱ्या अमेरिकन बुद्धिजीवींमध्ये, फारशा सुदैवी नसलेल्या समाजांच्या तुलनेत धैर्य आणि आत्मसन्मानाचा अगदीच अभाव दिसून येतो.’’

मिश्रा या अपयशाचे मूळ सहभागात (Complicity) पाहतात: अमेरिकेतील बुद्धिजीवी वर्ग हा साम्राज्यवादी सत्ताव्यवस्थेच्या खूप जवळचा असून, त्याच्या उदार अनुदानांवर अवलंबून असतो. त्यामुळे, तो अनेकदा सत्य बोलण्यास असमर्थ ठरला आहे. त्याने समाजाला दिलासा देणे किंवा निदान ज्यासाठी एक पै द्यावी लागत नाही, अशी टीका करणे अपेक्षित होते. गाझाबाबतचे हे जाणीवपूर्वक मौन आणि सत्तावादाविरोधात तुलनेने अगदी तोकडा प्रतिकार या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत का, असा एक अस्वस्थ करणारा मुद्दा मिश्रा मांडतात. दोन्ही गोष्टी सत्ता वास्तवाशी सहज जुळवून घेण्याची प्रवृत्ती दर्शवतात. पण हा प्रश्न फक्त अमेरिकेपुरता नाही. लोकशाही राष्ट्रांमध्येही सामूहिक मृत्यू ही गोष्ट नागरी चर्चेतून किती सहज अदृश्य केली जाते हे आपण पाहतो आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या सदसद्विवेकबुद्धीतून गाझामधील प्रेते नाहीशी होऊ शकतात, तर आपल्या स्वत:च्या राज्यसत्तेचे गुप्त, सावध अतिक्रमण नजरेआड करणे सहज शक्य आहे. मुख्य म्हणजे ही राज्यसत्ता आता तिला वाटेल त्याला लक्ष्य करत आहे. गाझावरच्या मौन आणि निष्क्रियतेचा अर्थ एवढाच की फक्त क्रौर्यच सत्ता गाजवते. ‘तसेच तर घडत असते…’ असे Slaughterhouse- Five मध्ये वॉनिगट म्हणालाच होता.