या तिघी पत्रकार. तिघीही इराणमधल्या. तिघीही एकाच तुरुंगात, पण एकमेकींना भेटू शकणार नाहीत इतकी कडक कैद त्यांना झाली आहे. इराणी महिलांच्या स्वातंत्र्याची मशाल धगधगत ठेवणाऱ्या या तिघींना संयुक्तपणे, संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे (युनेस्को) दिला जाणारा ‘जिलेर्मो कानो पुरस्कार’ दिला जाणार आहे. २ मे या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनी हे पुरस्कार घोषित होतात.

माशा अमीनी हिचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या ज्या बातमीने इराणमध्ये आंदोलन सुरू झाले, ती बातमी निलूफर हमेदी यांनी दिली होती. निलूफर ‘शार्घ’ या इराणमधील सुधारणावादी दैनिकासाठी लिहितात. या दैनिकाची छापील आवृत्ती फारसीत असली, तरी संकेतस्थळावर ते इंग्रजीतही उपलब्ध आहे. १६ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस कोठडीत मह्शा अमीनीच्या मृत्यूची बातमी निलूफर यांनी दिल्यानंतर लगोलग त्यांना अटक झाली. सध्या इराणच्या एव्हिन तुरुंगात त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले आहे.

मग याच माशा अमीनीच्या अंत्यसंस्कारांची बातमी आली.. ती इलाही मोहम्मदी यांनी दिली होती. ‘हम-मिहान’ हे इराणमधील दुसरे सुधारणावादी वृत्तपत्र, त्यामध्ये सामाजिक समस्या आणि लैंगिक समानता यांविषयीच्या बातम्या व लेख इलाही मोहम्मदी देतात. निलूफरप्रमाणेच इलाही यांनाही पकडून एव्हिन तुरुंगात डांबण्याचे ‘कर्तव्य’ इराणच्या ‘कायदा-सुव्यवस्था रक्षकां’नी बजावले. यापूर्वी २०२० मध्ये इलाही यांच्या लिखाणामुळे त्यांच्यावर इराणच्या धर्मसत्तेची खप्पामर्जी झाली होती. त्या वेळी,  वर्षभर त्यांना कोणतेही लिखाण प्रकाशित करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते.

या दोघींपेक्षा अनुभवाने नर्गेस मोहम्मदी मोठय़ा. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी पत्रकार म्हणून काम केले आहे आणि तेहरानमधील ‘डिफेंडर्स ऑफ मून राइट्स सेंटर’ (डीएचआरसी) च्या उपसंचालक म्हणून त्या समाजकार्य करतात. इराणी महिलांसाठीच्या एव्हिन तुरुंगातच त्या १६ वर्षांच्या कैदेची शिक्षा भोगत आहेत. मात्र तुरुंगातही त्यांनी लिखाण सुरू ठेवले. इतर महिला कैद्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या, त्यावर आधारित पुस्तक आधी फारसीत आणि २०२२ च्या नोव्हेंबरमध्ये इंग्रजीतही ‘व्हाइट टॉर्चर’ (अनुवाद : अमीर रेझानेझाद) प्रकाशित झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा ‘धैर्य पुरस्कार’ नर्गेस मोहम्मदी यांना गेल्या वर्षी (२०२२) मिळाला होता. तर निलूफर हमेदी आणि इलाही मोहम्मदी या दोघींना ‘कॅनेडियन जर्नालिस्ट फॉर फ्री एक्स्प्रेशन’ (सीजेएफई)तर्फे २०२३ चा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र-स्वातंत्र्य पुरस्कार, आणि हार्वर्ड विद्यापीठातर्फे पत्रकारितेतील विवेक आणि सचोटीसाठी दिला जाणारा ‘लुईस एम. लियॉन्स पुरस्कार’ २०२३ साठी मिळाला आहे (हार्वर्डचा हा पुरस्कार २०२१ मध्ये भारतातील ‘कॅराव्हान’ नियतकालिकास मिळाला होता). या दोघीही संयुक्तपणे, ‘टाइम’ नियतकालिकाच्या १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये अलीकडेच समाविष्ट झाल्या होत्या. हे आंतरराष्ट्रीय मानमरातब अर्थातच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.