बेगमजान या नावाची एक गृहिणी. भरजरी रेशमी कुर्त्यांमध्ये असलेली, दागिन्यांनी सजलेली पण आतून खूप एकटी. नवाब साहेबांशी तिचं लग्न झालेलं. त्यात केवळ एक औपचारिकता, नात्याची ओलच नाही. याच बेगमजानच्या आयुष्यात रब्बू नावाची आणखी एक स्त्री येते. दोघींच्या नात्याला कोणतेच नाव देता येणार नाही पण रब्बूच्या येण्याने बेगमजानच्या आयुष्यातल्या उदास एकटेपणाची पोकळी भरून निघालेली आहे. काही दिवसांसाठी आलेली नात्यातलीच एक छोटी मुलगी बेगमजानचं हे जग आपल्या निरागस नजरेतून पाहते. बेगमजानच्याच खोलीत ती एका कोपऱ्यात झोपत असते. रात्री भिंतीवर विचित्र अशा सावल्या तिला दिसू लागतात. ती घाबरते. कुतूहलासोबत भयही आहे. इस्मत चुगताई यांची ‘लिहाफ’ या नावाची कथा १९४२ साली प्रसिद्ध झाली तेव्हा या कथेने प्रचंड खळबळ उडवून दिली होती. ‘लिहाफ’ म्हणजे उबदार पांघरूण… रजई. ही केवळ काही पानांची कथा नव्हती तर त्या रजईखाली दडपलेल्या इच्छा- आकांक्षा आणि घुसमटीचा हुंकार होता. जेव्हा या कथेवर १९९६ साली ‘फायर’ सिनेमा आला तेव्हा वादंग निर्माण झालं पण त्याआधी ५० वर्षांपूर्वी असं काही लिहिणाऱ्या बाईचं धैर्य अफाटच मानलं पाहिजे.
अनेक कथा, सौदाई, दिल की दुनिया यांसारख्या कादंबऱ्या, काही चित्रपटांसाठीचं लेखन या सगळ्यांमधून या लेखिकेचा बंधमुक्त असा स्वर उमटताना दिसतो. १९४०- ५० या दशकात जीर्ण आणि रूढीबाज बुरुजांना धक्के देणं ही गोष्ट सोपी नव्हती. सआदत हसन मंटो आणि इस्मत चुगताई या दोघांचं लेखन एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटाव्यात इतकं अभिन्न आहे. खुद्द मंटोनं म्हटलंय, जर मी स्त्री असतो तर इस्मत असतो आणि इस्मत जर पुरुष असती तर ती मंटो असती. मंटो यांनी ‘इस्मत चुगताई’ या नावाचाच एक निबंध लिहिला आहे, त्यातून इस्मत यांचं नेमकं व्यक्तित्व उभं राहतं.
मी मुंबईत असताना हैदराबादहून एक पोस्टकार्ड आलं होतं… ही काय गोष्ट आहे की इस्मत चुगताई यांनी तुमच्याशी विवाह केला नाही. मंटो आणि इस्मत या दोन हस्ती जर एकत्र आल्या असत्या तर किती चांगलं झालं असतं… अशी या निबंधाची सुरुवात होते. त्यानंतर मंटोची इस्मत यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण. अगदी साध्या वेशातील इस्मत. बारीक किनार असलेली साडी, काळ्या उभ्या रेषा असलेलं ब्लाऊज, हातात छोटी पर्स, पायात ब्राऊन चपला, बारीक पण आरपार वेध घेणारे डोळे, या डोळ्यांवर मोठमोठ्या भिंगाचा चष्मा, छोटे पण कुरळे केस. मी तिच्यावर भाळलो नाही पण माझी बायको मात्र तिच्या प्रेमात जेरबंद झाली. समजा माझ्या बायकोनं याचा उच्चार केला असता तर इस्मत म्हणाली असती, ‘आली मोठी माझ्या प्रेमात अडकणारी… तुझ्या वयाच्या मुलींचे बापसुद्धा माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात.’
अश्लीलतेच्या आरोपावरून मंटो आणि इस्मत या दोघांनाही अटक झाली होती. मंटो यांना यापूर्वी दोन वेळचा अनुभव होता पण इस्मत यांची ही पहिलीच वेळ होती. सुदैवाने ही अटक बेकायदेशीर ठरवली गेली कारण पंजाब पोलिसांनी या दोघांनाही बिनावॉरंटचं पकडलं होतं. इस्मत आनंदल्या पण शेवटी त्यांना लाहोरच्या न्यायालयात पेश व्हावं लागलं. मुंबई ते लाहोर हा खूप लांबचा प्रवास. मंटो आणि त्यांची पत्नी साफिया, इस्मत आणि त्यांचा नवरा शाहिद असे चौघेजण या प्रवासात सोबत होते. प्रवासात सगळी धमाल चाललेली. शाहिद आणि साफिया हे दोघेजण एका बाजूला झाले. मंटो आणि इस्मत यांची गमतीत टर उडवायला लागले. अटक झाल्यानंतर कसे हाल असतात, तुरुंगात काय काय असतं असं सांगून या दोघांचाही त्यांनी प्रवासात छळ सुरू केला. सगळं ऐकून शेवटी इस्मत म्हणाल्या, ‘मला सुळावर जरी चढवलं तरी माझ्या मुखातून सत्यच बाहेर पडेल.’
या खटल्यात मंटो आणि इस्मत हे दोन वेळा लाहोरला जाऊन आले. त्यांना पाहण्यासाठी तिथल्या विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी न्यायालयात यायच्या. इस्मत म्हणाल्या, आपल्याला पाहण्यासाठी तिकीट तरी लावायला पाहिजे. म्हणजे इथं येण्या-जाण्याचा खर्च तरी वसूल होईल. दोन वेळा लाहोरला गेल्यानंतर तिथून वेगवेगळ्या प्रकारचे सँडल आणि बुटांचे दहा- दहा, बारा – बारा जोड त्यांनी आणले. मुंबईत कोणीतरी इस्मत यांना विचारलं, लाहोरला तुम्ही खटल्याच्या गेला होता ना? इस्मत यांनी उत्तर दिलं, ‘जी नही. जुते खरीदने के लिए गये थे.’
मंटो म्हणतात, लिहायला सुरुवात केल्यानंतर अनेकदा तिच्या डोक्यातले विचार बेबंद धावत असतात आणि त्यामागोमाग पाठलाग करताना अक्षरांची मात्र दमछाक होते. पण या घाईच्या तुलनेत किती तरी शांतचित्ताने आपल्या मुलीसाठी झबला शिवताना मी तिला पाहिलंय. वेगाने लिहिताना तिच्या हातून चुकाही होतील पण चिमुरडीसाठी झबले शिवताना तिच्या हातची सुई जराही विचलित होत नाही. इतके मोजून मापून टाके असतात की काय मजाल कुठे घडी पडेल. इस्मत प्रचंड जिद्दी आहे. लहान मुलासारखी हट्टी आहे. कष्ट झेलेले, असंख्य यातना सहन करील पण जिद्दीपासून जराही बाजूला सरकणार नाही. मला वाटतं जीवनातल्या घटना प्रसंगांशी दोन हात करताना, लढताना ती समजून घेण्याचा प्रयत्न करते. ही तिची स्वत:ची एक पद्धत आहे. तिची प्रत्येक कथा निराळी आहे. तिच्या पुरुष आणि स्त्री व्यक्तिरेखांमध्येही ही अनोखी जिद्द आणि नकार पाहायला मिळतो. ही पात्रं प्रेमात आकंठ बुडालेली असतात तरीही प्रसंगी द्वेष प्रकट करतात.
इस्मत यांच्या जिद्दी आणि हट्टी स्वभावाचं एक उदाहरण मंटो यांनी सांगितलंय. एकदा इस्मत यांच्याच निमंत्रणावरून मंटो पती, पत्नी त्यांच्या घरी गेले. हे दोघे नवरा बायको आणि ते दोघे असे चौघेजण रात्रीच्या जेवणानंतर गप्पा मारत बसलेले. शाहिद म्हणाला, मंटो अजूनही तुमच्याकडून भाषेच्या चुका होतात. रात्रीचा दीड वाजला, मंटो काही कबूल करत नव्हते. रात्री दोननंतर इस्मत यांनी नवऱ्याची बाजू घेतली. तरीही मंटो हे काही ऐकायला तयार होईनात. बोलता बोलता अचानक इस्मतच्या तोंडून शब्द निघाला ‘दस्तदराजी’. मंटो म्हणाले, खरा शब्द दराजदस्ती असा आहे. पहाटेचे तीन वाजले. इस्मत चूक मानायला तयार नाही. वाद मिटवण्यासाठी शेजारच्या खोलीतून शाहिद यांनी शब्दकोश आणला. त्यात पाहिलं. द या आद्याक्षरांपासून सुरू होणारा दस्तदराजी हा शब्दच नव्हता. शाहिद म्हणाला इस्मत आता तुला चूक कबूल करावी लागेल. मग दोघा नवरा-बायकोत बराच झगडा चालला. पहाटे कोंबडा आरवण्याचा आवाज यायला लागला. इस्मतने शब्दकोश उचलला, एका कोपऱ्यात फेकून दिला आणि म्हणाली, ‘जेव्हा मी शब्दकोश तयार करील तेव्हा त्यात दस्तदराजी हा शब्द असेल. हे काय लावलंय दराजदस्ती… दराजदस्ती.’ मंटो म्हणतात, एकदाची आमची ही वादावादी संपली पण त्यानंतर पुन्हा अशी वेळ कधी आली नाही. गप्पा मारताना असं धोकादायक वळण आलंच तर कधी इस्मतने दिशा बदलली किंवा कधी मी रस्त्यातून बाजूला झालो. इस्मत मला आवडते, मीसुद्धा तिला आवडतो पण कोणी अचानक विचारलं की तुम्हा दोघांना एकदुसऱ्याची कोणती गोष्ट आवडते तर माझा पूर्ण विश्वास आहे की आम्ही दोघेही काही वेळासाठी भ्रमित किंवा नि:शब्द होऊन जाऊ. काहीच सांगता येणार नाही.
इस्मत यांची ‘लिहाफ’ ही गोष्ट तशी खूप चर्चित पण मंटोला या गोष्टीचा शेवट काही आवडला नव्हता. त्यांच्या मते गोष्टीचं शेवटचं वाक्य अजिबात कलात्मक नव्हतं. सुरुवातीच्या भेटीत ते म्हणाले, ‘‘मला तुमची ‘लिहाफ’ ही गोष्ट खूप आवडली पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की कथेच्या शेवटचं वाक्य तुम्ही एवढं वाईट का लिहिलंय.’’ इस्मत म्हणाल्या, ‘‘यात वाईट वाटावं असं काय आहे?’’ त्यांच्या या प्रश्नावर मंटो उत्तरही देणार होते पण इस्मत यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट अशी नाराजी आणि संकोच दिसला. तो पाहिल्यानंतर मंटोही उदासले. खरंतर या कथेच्या अनेक पैलूंवर त्यांना बोलायचं होतं. जेव्हा इस्मत तिथून बाहेर पडल्या तेव्हा मंटो मनातल्या मनात म्हणाले, ‘‘ये तो कंबख्त औरत निकली.’’… पण याच वाक्याबद्दल त्यांनी पुढे खेदही प्रकट केलाय. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘‘मी विचार केला, बाईनं युद्धाच्या मैदानात पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून लढाईचा डोंगर पार करू देत किंवा गोष्ट सांगता सांगता ती इस्मत चुगताई बनू दे पण तिच्या हातावर कधी कधी मेहंदीही रेखली गेली पाहिजे आणि तिच्या हातातल्या बांगड्यांचा किनकिनाटही आला पाहिजे. मला दु:ख वाटलं की त्या वेळी मी मनातल्या मनात का होईना पण ‘ये तो कंबख्त औरत निकली’. म्हटलं होतं. इस्मत जर बाई नसती तर कदाचित भूलभुलैया, तील, लिहाफ यांसारख्या कोमल भाव असणाऱ्या तरल कथा कागदावर उतरल्याच नसत्या.’’ मंटो यांनी इस्मत यांच्यावर लिहिलेल्या याच लेखातलं एक वाक्य लखलखत्या पात्यासारखं चकाकणारं आहे. ते म्हणतात, ‘‘इस्मत तलवार की धार पर चलती है’’. तसंच या लेखिकेचं लेखन म्हणजे अगदी अग्नीची पात… दाहक तरीही तरल!
– आसाराम लोमटे, लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.
aasaramlomte@gmail.com