जगभरातील साहित्यप्रेमी ज्याची वर्षभर वाट पाहत असतात असा ‘जयपूर लिटफेस्ट’ ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. नोबेल पुरस्कार विजेते वेंकी रामकृष्णन, बुकर पारितोषिक विजेते जेनी अर्पेनबेक, इतिहासकार अनिरुद्ध कनिसेट्टी, ऑस्ट्रेलियातील लेखिका अॅना फंडर, लेखिका कावेरी माधवन, ब्रिटिश कादंबरीकार डेव्हिड निकोल्स, लेखिका इरा मुखोती, अभिनेते आणि नाटककार मानव कौल अशा देश-विदेशांतील अनेक मान्यवरांचे विचार जाणून घेण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे.

भाषिक वैविध्य हे कायमच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य ठरले आहे. यंदा हिंदी, बंगाली, राजस्थानी, कन्नड, तमिळ, तेलुगू ओडिया, संस्कृत, आसामी, मल्याळम, मराठी, पंजाबी, उर्दू या भाषांतील साहित्यकृती सादर केल्या जाणार असून त्यावर चर्चासत्रेही होतील. हे सत्र महोत्सवातील सर्वसमावेशकतेचे प्रतीक ठरेल. पाच विविध ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वैविध्यपूर्ण चर्चांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.

जयपूर बुकमार्क

जयपूर बुकमार्क हा जयपूर लिटफेस्टला समांतर चालणारा कार्यक्रम जगभरातील अनेक प्रकाशकांना, साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना, लेखक, अनुवादक, पुस्तक विक्रेते यांना एकत्र आणेल. त्यांना परस्परांना भेटण्याची आणि साहित्यविषयक विचारांचे आदानप्रदान करण्याची संधी देईल.

जयपूर म्युझिक स्टेज

साहित्यापलीकडे जाऊन या महोत्सवात कला आणि संस्कृतीचाही उत्सव साजरा केला जाणार आहे. जयपूरच्या ऐतिहासिक वातावरणात संध्याकाळच्या वेळी राजस्थानच्या समृद्ध परंपरेचेही दर्शन घडते. जयपूर म्युझिक स्टेज हा कार्यक्रम साहित्य महोत्सवाच्या समांतर सुरू असतो. त्यात सुप्रसिद्ध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार त्यांची कला सादर करतात आणि महोत्सवात रंग भरतात.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय

विचारवंताचे व्यासपीठ

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलने अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि सर्वसमावेशकतेचा नेहमीच पुरस्कार केला आहे. दरवर्षी, सद्या परिस्थितीला आव्हान देणाऱ्या, नावीन्यास प्रेरणा देणाऱ्या आणि विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात आणि बौद्धिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करतात. यंदा महोत्सवात शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करण्यात येणार आहे. ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २०२५’ हा केवळ एक कार्यक्रम नाही; हा विचारांचा, संस्कृतीचा आणि कथाकथनावरील सार्वत्रिक प्रेमाचा उत्सव आहे. उत्तम वाचक, नवोदित लेखक आणि ज्यांना गप्पा मारणे आवडते, अशा व्यक्तींसाठी हा महोत्सव म्हणजे वार्षिक पर्वणी आहे.

महोत्सवाविषयी अधिक माहिती https://jaipurliteraturefestival.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा

अॅलन गिलख्रिास्ट हे ऐंशीच्या दशकातील अमेरिकी कथाविश्वातील बऱ्यापैकी अग्रगण्य नाव. ‘व्हिक्टरी ओव्हर जापान’ या संग्रहासाठी ‘नॅशनल बुक अॅवॉर्ड’ मिळविणारे. नंतर कित्येक वर्षे कथालेखनातील शिक्षक म्हणून ओळखले गेलेले. त्यांची मुलाखत विशिष्ट प्रश्नांसह घेण्यासाठी एक लेखक पाठपुरावा करीत होता. अल्प शब्दांत लेखिकेविषयी अपार कुतूहल निर्माण करणारा व्यक्तिचित्रापलीकडला लेख.

https://shorturl.at/D6GPa

आपल्याकडे पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर उत्तम मुखपृष्ठांची चर्चा आपण करतो का? म्हणजे आता अनेक प्रयोग मराठीत फक्त मुखपृष्ठांवर आणि ग्रंथनिर्मितीवर होत आहेत. ‘लिट हब’ हे अमेरिकी संकेतस्थळ दरमहा जगभरात प्रकाशित झालेल्या १० उत्तम मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकांना एकत्रित करून त्याबाबत दृक-विचार करण्यास वाव देते. वाचण्याऐवजी ही लिंक वानगीदाखल या महिन्यातील मुखपृष्ठांसह.

https://shorturl.at/4oUzn

‘मॅक्आर्थर फेलोशिप’ ही सर्वोत्तम लेखकांना मिळणारी तब्बल आठ लाख डॉलर इतक्या रकमेची अभ्यासवृत्ती. यंदा निवड झालेले चारही लेखक नाणावलेले. त्यांची वाचनाची, आवडीच्या पुस्तकांची आणि लिहिण्याची ‘बैठक’ कळून येण्यासाठी या लघुमुलाखती.

https://shorturl.at/yR4gq

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी वाचक हा ‘पुनर्वाचनात’ अडकलेला जीव. त्याची आपल्या लहानपणी भावलेल्या वाचनावर, लेखकांवर नितांत श्रद्धा असते. पुनर्वाचन का आणि वयाबरोबर वाचक म्हणून वाढताना कसे व्हावे, याची चर्चा करणारा लेख.

https://shorturl.at/3SW8K

‘एआय’चा वापर करून पुढल्या वर्षभरात लेखक बनू इच्छिणाऱ्या उत्सुकरावांना दीड ते पाच हजार डॉलरमध्ये पुस्तक छापून देण्याची योजना एका कंपनीने आखली आहे. मराठीतदेखील असे झाले तर आपल्याकडच्या प्राध्यापकी साहित्यिकांना ‘एआय’शी स्पर्धा करावी लागेल. तूर्त एवढेच, म्हणजे त्या योजनेचे वृत्त- https://shorturl.at/U5zAO