एकदा काय झाले, की स्लोअर शहाणे कशाने तरी ‘विक्षुब्ध’ होऊन जुन्या खुणांचा उरलासुरला पसारा वागविणाऱ्या शहराच्या एका भागातून आपल्या मित्राला भेटायला चालला होता. जोमाने पुनर्विकास सुरू असलेल्या या भागातील उरल्यासुरल्या जुन्या इमारती रंग उडून आणि मोडकळीस येऊन कण्हत होत्या. पोक आलेल्या या इमारतींना त्यांचे दुखणे मात्र नीट सांगता येत नव्हते. नवे हवे, की जुनेच भावे, या पेचात असल्यासारख्या त्या दिसत. पण, नव्याकडे पाहून मनात येणारी भावना जुनी होत नसे. अशी वेळ म्हणजे वर्तमानाचे गोठलेपण. त्यात फक्त थिजणे उरते. या इमारतीही अशाच थिजून गेलेल्या. काही इमारती पायाची घडी घालून खांबाला टेकून बेफिकीरपणे सिगारेट शिलगावत उभ्या असलेल्या एखाद्या इसमासारख्या बांबूच्या आधारावर तगलेल्या. ‘बांबू काढला, की उभ्याचे आडवे होऊ हे माहीत असूनही ऐट जपायची आसक्ती किती,’ असा प्रश्न स्लोअरला अशा एका इमारतीसमोरून जाताना पडलाच आणि त्याच्या मनात वाक्य उमटले, ‘एकविसाव्या शतकाची नवी कळा अवकळेला काळाच्या कसोटीवर तोलू पाहते आहे.’

शहराच्या या भागातील नव्या इमारतींबद्दल उरल्यासुरल्या जुन्या इमारतींना काय वाटत असेल, असा विचार करत स्लोअर मित्राला भेटण्याच्या ठिकाणी येऊन पोचला. टोपी काढून त्या खालच्या टकलावर उजवा हात जोरजोरात घासून पुन्हा टोपी घालणारा इसम त्याला भेटीच्या संकेतस्थळी दुरूनच दिसला होता. हाच स्लोअरचा मित्र, क्लेव्हर. धूर्त, चतुर म्हणून नाही, तर सखोल हुशार म्हणून क्लेव्हर! कशाने तरी ‘विक्षुब्ध’ झाल्यावर ज्याला भेटायची वेळ येते, तो नेहमी क्लेव्हर असला पाहिजे, अशी स्लोअरची क्लेव्हरची गाठ घेण्याची रीत होती. ही गाठ क्वचित होई. कारण, स्लोअर मुळात फार शांत, संथ असल्याने ‘विक्षुब्ध’ वगैरे फार अपवादाने होत असे. आज हा अपवाद होता. तर, स्लोअर संकेतस्थळी पोहोचताच, म्हणजे त्याला अगदी समोर पाहताच, क्लेव्हरने त्याचा परिचित प्रश्न केला, ‘चहा घ्यायचा का?’ तार्किकदृष्ट्या उत्तराचे ‘हो’ किंवा ‘नाही’ असे दोन पर्याय संभवत असले, तरी क्लेव्हरला ‘हो’ एवढेच उत्तर अपेक्षित असते, हे माहीत असल्याने दोघांची पावले तिथल्या नव्याने झालेल्या इमारतीखाली टिकून असलेल्या जुनाट चहाच्या टपरीकडे वळली. पहिल्याच घोटाला चहात बुडलेली भारदस्त मिशी जिभेने पुसत क्लेव्हरने स्लोअरकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्याच्या सदऱ्याला येणारा मोगऱ्याच्या अत्तराचा सुगंध श्वासताना आणि खिशाला लावलेले जुन्या वळणाचे शाईपेन डोळेभर नजरताना स्लोअरला क्लेव्हरचा चेहरा प्रश्नार्थक झालेला दिसलाच नव्हता. या दुर्लक्षावर प्रतिक्रिया म्हणून क्लेव्हरने भुरका मारून चहाचा दुसरा घोट रिचवल्यावर स्लोअरला एकदम भान आले. उत्तरण्यासाठी प्रश्न विचारण्याचा उपचार पाळायचा नाही, हा दोघांमधील अलिखित नियम असल्याने बोलण्याची पाळी साहजिकच स्लोअरवर होती.

स्लोअर : आपल्यामध्ये एक असं काही तरी असतं, की त्यामुळे काही तरी घडल्यावर काही काही वेळा काही तरीच होत राहतं…

क्लेव्हर : म्हणजे कोडं!

स्लोअर : हो! आणि ते सुटत नाहीये…

क्लेव्हर : ठीक आहे. आडवा शब्द?

स्लोअर : दुसऱ्याचे काही तरी ऐकून, पाहून, हे आपल्याकडे का नाही, अशा विचाराने मनावर येणारा झाकोळ.

क्लेव्हर : हं. आणि उभा शब्द?

स्लोअर : हे आपल्याकडे असते, तर आपण अधिक सुखी झालो असतो, असे वाटताना, आपल्याकडे ते नाही, मग ते ज्याच्याकडे आहे, अशाकडे ते का आहे, असे परत परत वाटणे.

क्लेव्हर : हं, उत्तरशब्द एकच आहे, अगदी आडवा-उभा आहे! तरी पर्यायांचा विचार करू.

स्लोअर : म्हणजे थेट उत्तर नाहीच मिळणार?

क्लेव्हर : अशा प्रश्नांची थेट, सरळसोट उत्तरे नसतातच. आणि, तशी ती देऊही नयेत. कारण, त्याने तयार होणारा बायस तुम्हाला उत्तराच्या एकाच पर्यायावर अडवतो.

स्लोअर : पण, म्हणून जे एक थेट उत्तर देऊ शकता येते, ते टाळायचे कशासाठी?

क्लेव्हर : टाळायचे नाहीच. तेही द्यायचेच, फक्त एक पर्याय म्हणून. तुझ्या प्रश्नाचे एकच एक थेट उत्तर दिले, तर मूळ प्रश्नांत दडलेल्या इतर काही प्रश्नांच्या उत्तरांच्या शक्यतांपासून दूर जाण्याची शक्यता असल्याने मी तसे म्हणतो आहे.

स्लोअर : म्हणजे कोडं! बोला, आडवा शब्द.

क्लेव्हर : तू आडव्या शब्दासाठी दिलेल्या क्लूमध्ये दडलेला पहिला प्रश्न नैतिक. दुसऱ्याबद्दल नेहमी चांगले चिंतावे, या मध्यमवर्गीय संस्कारामुळे दुसऱ्याकडे आपल्यापेक्षा काही तरी वेगळे किंवा जास्त असल्याचा हेवा वाटण्याची भावना शुद्धपणे व्यक्त करता येत नसल्याने आतल्या आत धुमसते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या काजळीचा मनावर झाकोळ येतो. तो तसा येऊ न देता हेवा वाटणे ही नॉर्मल गोष्ट असते, याचा स्वीकार करणे हा उत्तराचा पहिला पर्याय. आता या हेव्याचे रूपांतर पुढे जाऊन द्वेष, मत्सरात झाले, तर मात्र ते नैतिक अध:पतन या वर्गात घालावे लागते, शिवाय त्याचा – ज्याच्याबद्दल हे वाटते आहे, त्यालाही – त्रास होतो. त्यामुळे द्वेष, मत्सर इतरांसाठीच काय, स्वत:साठीही स्खलनशीलच, हा उत्तराचा दुसरा पर्याय. आणि, दुसऱ्याचे पाहून, ऐकून हे आपल्याकडे का नाही, असे न वाटणारा माणूस जगात असतो का, तर त्याचे उत्तर नाही, कारण असा माणूस केवळ कोणत्या तरी गोष्टीत असतो, प्रत्यक्षात नाही, हा उत्तराचा तिसरा पर्याय.

स्लोअर : आता उभा शब्द.

क्लेव्हर : अंथरूण पाहून पाय पसरावे, हे काही अगदीच चूक नाही. पण, म्हणून दुसऱ्याकडे असलेले एखादे आपल्याकडे असते, तर आपणही सुखी झालो असतो, हा विचारही करणे अनैतिक, हाही खास मध्यमवर्गीय संस्कार. मुळात सुखी राहणे ही माणसाची सार्वकालिक इच्छा. त्याला मोडता घालणारे काहीही स्वीकारणे ही नैसर्गिक भावनेशी प्रतारणा असल्याने, हेवा वाटणे ही नॉर्मल गोष्ट असते, हाच पुन्हा याही वेळी उत्तराचा पहिला पर्याय आहे. आपल्याकडे जे नाही, ते दुसऱ्याकडे का आहे, असा प्रश्न तुला पुढे पडतो आहे, तो मात्र मला अचंबित करतो. तो अनैसर्गिक नाही, पण कृत्रिमही नाही. फक्त तो निसरड्या वाटेवरचा आहे. कारण, त्याचे उत्तर असूया असे आहे. यात चांगले इतकेच, की हा प्रश्न पडला आहे, हे मान्य करून त्याचा पडताळा करून घेण्याची गरज अजून तुला वाटते आहे. तो करत राहणे, हा उभ्या शब्दासाठीच्या क्लूसाठीच्या उत्तराचा दुसरा, पण महत्त्वाचा पर्याय. आणि, असे सगळे वाटणारी माणसे कायम प्रत्यक्षातच असतात, गोष्टीत नाही, हा उत्तराचा तिसरा पर्याय.

क्लेव्हरच्या या बिनतोड विश्लेषणावर अचंबित व्हायची पाळी आता स्लोअरवर होती. त्याने काहीही न बोलता गार झालेला चहा संपवला आणि क्लेव्हरच्या, ‘बाकी कसं चाललंय?’ या नेहमीच्या निरोपाच्या, तुटक, पण पुन्हा भेटीची शक्यता खुली ठेवणाऱ्या ओपनएंडेड प्रश्नाला ‘ठीक’ हे बरेही नाही, पण वाईटही नाही, असे सांगणारे तितकेच ओपनएंडेड उत्तर देऊन संवाद आणि भेटीला विराम दिला.

मघाशी येताना वाटेत लागलेली पिसाच्या मनोऱ्यासारखी झुकलेली आणि बांबूच्या आधारावर तगलेली जुनी इमारत त्याला पुन्हा दिसली. या वेळी मात्र स्लोअरला वाटले, की या इमारतीला समोर नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतीबद्दल फक्त हेवा नाही, तर असूया वाटत असल्याने ती वाकडी झाली आहे आणि वाकडी असली, तरी पूर्णपणे कोसळतही नाहीये. ती तगत आहे, पण जगत नाहीये. या वेळी त्याच्या मनात वाक्य न उमटता प्रश्न उमटला, ‘प्रत्येक पुनर्विकास असा मोडक्या पायावर होतो?’… प्रश्न मनात घोळवत तो परत फिरून चहाच्या टपरीकडे आला, तेव्हा क्लेव्हर अजूनही त्याचा तिसरा चहा मिशांवर पसरलेले थेंब जिभेने पुसत रिचवत होता. स्लोअरचा चेहरा पाहूनच क्लेव्हरला समजले, की आता प्रश्न विचारायची पाळी आपली आहे. क्लेव्हरने प्रश्न केला, ‘उत्तराचा कोणता पर्याय बरा वाटतो आहे?’ स्लोअर उत्तरला, ‘तुझ्या सदऱ्याला येत असलेला मोगऱ्याच्या अत्तराचा सुगंध अजून टिकून आहे आणि खिशाला लावलेले ते जुने शाईपेन नवी कविता लिहायला उत्सुक दिसते आहे…’ दोघे हसले आणि त्या जुनाट टपरीवाल्याला आणखी एका चहाची ऑर्डर देते झाले.

siddharth.kelkar@expressindia.com