जो बायडेन आणि कमला हॅरिस या अमेरिकेच्या माजी अध्यक्ष आणि माजी उपाध्यक्षांच्या अनुभवांवर आधारित दोन स्वतंत्र पुस्तके येत्या काळात वाचायला मिळण्याची शक्यता आहे. बायडेन हे आपल्या आगामी पुस्तकात अध्यक्षपदाच्या कालावधीचे सिंहावलोकन करणार असून कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदासाठीच्या झंझावाती प्रचार मोहिमेचा अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे शब्दबद्ध केले आहेत. हॅरिस यांची प्रचारमोहीम ही अमेरिकेच्या नजिकच्या इतिहासातील सर्वांत संक्षिप्त कालावधीची मोहीम ठरली. हॅरिस आणि बायडेन या दोघांनीही आपापल्या कार्यकाळात आणि प्रचारातही सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने उभ्या ठाकलेल्या आव्हानाला तोंड दिले. अमेरिकी अध्यक्षपदाची शर्यत आणि त्या पदावर विराजमान झाल्यानंतरची आव्हाने यासंदर्भातील स्वानुभवाचे बोल या पुस्तकांत असल्यामुळे त्यांच्याविषयी मोठे कुतूहल ग्रंथजगतात निर्माण झाले आहे.
हॅरिस यांचे ‘१०७ डेज’ हे पुस्तक २३ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे, तर बायडेन यांच्या पुस्तकाचे शीर्षक आणि प्रकाशनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अमेरिकेत माजी अध्यक्षांनी आत्मचरित्र लिहिण्याची परंपराच आहे. बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष ठरले. ते या पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे आरोप अनेकदा झाले होते. ते दुसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्यानंतर तर या आरोपांना अधिकच धार आली होती. त्यामुळे आपल्या आरोग्यावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची संधी बायडन यांना या पुस्तकाच्या निमित्ताने मिळू शकते. ते आपली बाजू मांडताना कोणते मुद्दे अधोरेखित करतील, याविषयी उत्सुकता आहे. बायडेन आता ८२ वर्षांचे असून सध्या प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यामुळे पुस्तक लवकरात लवकर लिहून पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे त्यांनी सॅन डिआगो येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले होते.
अमेरिकी अध्यक्षांच्या आत्मचरित्रांची चर्चा जेवढी त्यातील आशयासाठी होते, तेवढीच उत्सुकता त्यांच्या विक्रीच्या आकड्यांविषयीही असते. आठ अंकी आगाऊ नोंदणी होणे आर्थिकदृष्ट्या आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. ओबामा यांचे ‘द प्रॉमिस्ड लँड’ आणि मिशेल ओबामांचे ‘बिकमिंग’ ही आत्मचरित्रे २०१७मध्ये प्रकाशित झाली होती. त्यांनी प्रकाशनपूर्व नोंदणीचा विक्रमी केला होता. दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनपूर्व नोंदणीतून ‘पेंग्विन रँडम हाउस’ने तब्बल सहा कोटी डॉलर्सची कमाई केली होती. बायडेन यांचे पुस्तक ज्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले आहे, ते पाहता विक्रीचे आकडे अधिकच महत्त्वाचे ठरणार आहेत. याच वर्षी प्रकाशित झालेल्या ‘ओरिजिनल सिन’ या जेक टॅपर आणि अॅलेक्स थॉम्पसन यांच्या पुस्तकात बायडेन यांच्या निकटच्या वर्तुळातील व्यक्तींनी त्यांची प्रकृती नाजूक आहे, हे वास्तवच नाकारल्याचे आणि त्यांच्यासह त्यांच्या पक्षालाही संकटात लोटल्याचे दावे करण्यात आले. या पुस्तकाच्या सुमारे एक लाख प्रतींची विक्री झाली. शिवाय उजव्या विचारसरणीच्या प्रकाशकांनी बायडेन विरोधकांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या मुलाच्या गैरव्यवहारांवर आधारित पुस्तकांचे अक्षर
जो बायडेन राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर हाती उरलेल्या अल्पावधीत केलेल्या झंझावाती प्रचाराच्या आठवणींचे वर्णन कमला हॅरिस यांनी ‘१०७ डेज’ या पुस्तकात केले आहे. ‘सायमन अँड शूस्टर प्रकाशन’ हे पुस्तक प्रकाशित करेल. समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट करून हॅरिस यांनी यासंदर्भातील घोषणा केली. प्रचार मोहिमेतील ठळक घडामोडी हॅरिस यांनी नोंदवून ठेवल्या होत्या. त्याआधारे हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. ‘उपअध्यक्ष पदाचा कालावधी संपल्यानंतर मी प्रचारकाळातील घडामोडींवर सखोल विचार केला. त्या काळात काय पाहिले, त्यातून काय शिकता आले आणि पुढे जाण्यासाठी आणखी काय करावे लागेल, असे आपल्याला वाटते, हे लोकांना सांगावे, म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे,’ त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी विराजमान होणारी पहिली महिला, हे पद संपादन करणारी पहिली गौरेतर महिला आणि अमेरिकेतील प्रमुख पक्षाच्या वतीने अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेली पहिली गौरेतर महिला अशा अनेक बाबतींतील पहिलेपण स्वत:च्या नावे असलेल्या हॅरिस यांच्याविषयी जाणून घेण्याची संधी या पुस्तकातून मिळेल. हॅरिस यांनी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित कादंबरीकार जेराल्डिन ब्रूक्
कमला हॅरिस पुढील वर्षी होणारी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठीची निवडणूक लढवतील की नाही, याविषयी अनेक तर्क लढवले जात होते. त्यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर काही महिन्यांतच या पुस्तकाची घोषणा करण्यात आली. पुस्तकात त्यांच्या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या कालावधीविषयीची माहिती नसेल. पुस्तक पूर्णपणे प्रचारमोहिमेवर आधारित असणार आहे. हॅरिस यांनी त्यांच्या २०१९मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द ट्रूथ्स वुई होल्ड- अॅन अमेरिकन जर्नी’ या पुस्तकात आपले बालपण, राजकीय क्षेत्रातील कारकीर्दीचा सुरुवातीचा काळ, कॅलिफोर्नियाच्या सेनेटर आणि अॅटर्नी जनरल पदाचा काळ याविषयीच्या आठवणी लिहिल्या होत्या.
थोडक्यात अमेरिकेच्या राजकारणातील सर्वोच्च पदे नुकतीच भूषविलेल्या दोन महत्त्वपूर्ण नेत्यांच्या या अनुभवकथनातून अमेरिकी नागरिकांना आपल्या देशाच्या राजकारणातील ‘अंदर की बात’ जाणून घेण्याची संधी मिळेल, तर इतरांना महासत्तेच्या राजकीय पटलावरील घडामोडींविषयी आणखी माहिती मिळवता येईल.