केरळमधील कोची येथील ‘नॅन्सेन एन्व्हायरॉनमेंटल रिसर्च’ (‘नर्सी’) ही संस्था १९९९ मध्ये नॉर्वे आणि भारत यांच्या संयुक्त सहकार्याने स्थापन झाली. संस्थेचे ‘नॅन्सेन’ हे नाव १९२२ चे प्रख्यात नोबेल विजेते नॉर्वेजियन संशोधक, फ्रिजॉफ नॅन्सेन यांच्या नावावरून ठेवण्यात आले. नॅन्सेन साहसवीर, दर्यावर्दी आणि चाकोरीबाहेरचा विचार करणारे होते. १८९३ मध्ये खास बनवून घेतलेली ‘फ्रॅम’ ही पोलादाच्छादित दणकट बोट त्यांनी हेतुपुरस्सर बर्फात अडकू दिली आणि आक्र्टिक खंडातील प्राणीजीवन, समुद्रप्रवाह, समुद्रीबर्फ, हिमनग अभ्यासले.

नर्सी मूलभूत तसेच उपयोजित संशोधन करते. नफा कमावणे हे संस्थेचे उद्दिष्ट नाही. उपयोजित संशोधन हे एक अंग असल्यामुळे औद्योगिक आस्थापना नर्सीच्या प्रकल्पांत सहभागी असतात. शासनाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाकडे (डीएसआयआर) नोंदणीकृत असलेली ही संस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय, विशेषत: युरोपीय देशांच्या सहकार्याने महासागर आणि भौगोलिक पर्यावरणीय अभ्यास व प्रामुख्याने मान्सून आणि शाश्वत विकासासाठी सागर किनाऱ्यांचा अभ्यास करते.

उपग्रहांच्या मदतीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्याने दूरस्थ संवेदना या अचूक आणि प्रभावी तंत्रज्ञानाने विदा (डेटा) मिळवून त्याचे संकलन आणि सांख्यिकी विश्लेषण करून माहितीत विश्वसनीयता, एकात्मता आणली जाते. हवामानाच्या अंदाजाची, सागरप्रवाहाची प्रारूपे मांडण्यासाठी या विदेचा वापर केला जातो.

नॅन्सेन एन्व्हायरॉनमेंटल रिसर्च सेंटरच्या प्रकल्पांमुळे नॉर्वे आणि भारत यांच्याखेरीज नेदरलँड्स, फ्रान्स, यूके (ग्रेट ब्रिटन), इटली, स्वीडन, बेल्जियम या देशांतील केंद्रीय, राज्य सरकारी आस्थापना, कंपन्या, विद्यापीठे यात समन्वय साधून सहकार्य प्राप्त करण्यात आले आहे. त्याचा लाभ या देशांतील पर्यावरण, शिक्षण, सागरी विज्ञानाचा प्रसार, मासेमारी आणि समुद्री उत्पादनांची निर्यात, अशा गोष्टींत होत आहे.

नर्सीचा एक प्रकल्प केरळमधील वेम्बनाड या विशाल सरोवरासाठी राबवला गेला. आसपासच्या कारखान्यांचे उत्सर्ग मिसळून वेम्बनाडचे पाणी अतिप्रदूषित झाले होते. रासायनिक प्रदूषकांप्रमाणेच या पाण्यात व्हिब्रियो कॉलरे हे अतिसाराचे जीवाणू आढळले. बंगालचा उपसागर आणि हिंदूी महासागरातही हे जीवाणू आढळतात. दूरस्थ संवेदनाने हे जीवाणू शोधून नष्ट करता येतात. जगाला २०३० सालापर्यंत कॉलरामुक्त करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे. नर्सी त्यात मोलाची मदत करत आहे. शैवालांची अतिप्रचंड संख्यावाढ, मासे आणि कोलंबीच्या महासमूहांच्या समुद्रातील हालचाली, समुद्रपृष्ठालगत ‘हरितद्रव्य-ए’च्या प्रमाणावरून ऑक्सिजन आणि कबरेदकनिर्मितीचा अंदाज घेणे असे नर्सीचे किती तरी प्रकल्प सर्वभूतांच्या कल्याणार्थच आहेत.

नारायण वाडदेकर,मराठी विज्ञान परिषद