अतिविषम पर्यावरणात टिकणारे आदिजिवाणू (मरीन आर्किया) अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्क आणि अन्यत्र गरम पाण्याच्या झऱ्या-कुंडांत १९७७ मध्ये सापडले. अमेरिकन जैवभौतिकतज्ज्ञ कार्ल वूस आणि खगोलजैवशास्त्रज्ञ जॉर्ज फॉक्स यांनी त्यांना इंग्रजीत ‘एक्स्ट्रीमोफाइल्स’ नाव दिले. एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणजे ‘टोकाच्या तीव्र पर्यावरणातही तगणारे जीव’.
१९७०च्या पूर्वी लहान, मोठे, एकपेशीय, बहुपेशीय, दृश्यकेंद्रकी, आभासीकेंद्रकी, असे सारे ज्ञात जीव भोवतालचे तापमान उणे १० अंश ते अधिक ४० अंश सेल्सिअस या मर्यादेतच सचेत, सक्रिय असलेले आढळले होते. १९७७ पासून अतिउच्च तापमानात ८० अंश सेल्सिअसला जिवंत राहू शकणारे जिवाणू आढळले. नंतर उकळत्या पाण्याच्या म्हणजे १०० अंश सेल्सिअस आरामात जगणारे- एवढेच नाही तर पेशी विभाजन करू शकणारे- जिवाणू मिळाले आहेत. उदाहरणार्थ, पायरोलोबस फूमारी अगदी १२२ अंश सेल्सिअसपर्यंत जगतात. जे अतिउच्च तापमानाबाबत तेच अतिआम्लतेच्या, अतिआम्लारी गुणधर्माच्या, अतिक्षारतेबाबत. क्षारांच्या कोरडय़ा खड्डय़ात, अतितीव्र आम्ल द्रावणात राहू शकणारे ‘परम सीमा सजीव’ आता माहीत आहेत. विविध परस्परपूरक जातींच्या आदिजिवाणू आणि जिवाणू पेशींच्या चारशे कोटी वर्षांपेक्षाही पुराण्या, जाड गालिचांसारख्या प्रचंड वसाहती वा त्यांचे अवशेष समुद्रतळाशी सापडले आहेत.
आदिजिवाणू आणि जिवाणू दोन्हीत डीएनए असते, पण पेशीकेंद्रक नसते. आदिजिवाणू आणि जिवाणू यांच्या पेशीभित्तिका आणि पेशीपटल रासायनिक घटनेत भिन्न असतात. शिवाय आदिजिवाणूतील अनेक जनुकांचे आणि चयापचय क्रियांचे जास्त साम्य दृश्यकेंद्रकी पेशींशी असते.समुद्रातील अतिउष्ण झरे, सागरतळाच्या अतिखोल घळी, गंधकाचा धूर ओकणाऱ्या ज्वालामुखीची तोंडे अशा भीषण प्रतिकूल परिस्थितीतच अनॉक्सी वातावरणात आदिजिवाणू असतात असे पूर्वी वाटे. पण आता अन्य सागरांशी संबंध तुटल्याने ‘मृत’ झालेल्या समुद्रसपाटीखाली १२०० फूट खालच्या अतिखाऱ्या समुद्रात उदाहरणार्थ, डेड सीमध्येही तेरा जातींचे आदिजिवाणू सापडले आहेत. शिवाय समुद्रपृष्ठावरच्या माशांच्या, खेकडय़ांच्या, झिंग्यांच्या अळय़ा, यांच्या अन्नमार्गात अल्प प्रमाणात आणि पाण्यात सुटे स्वतंत्र मिथेनजनक आर्किआही मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. काही समुद्री स्पंजमध्येही विशिष्ट आदिजिवाणू सहजीवी म्हणून राहतात असे दिसले आहे. त्यातून आदिजिवाणूंचा जगभरच्या सागरांत सर्वदूर मोठय़ा प्रमाणात आढळ आहे हे आरएनए पृथक्करणाअंती स्पष्ट झाले आहे.- नारायण वाडदेकर,मराठी विज्ञान परिषद
