प्रशांत महासागर (पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व खोल महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ १६ कोटी ६० लाख चौरस किलोमीटर आहे. या महासागराच्या पश्चिमेस आशिया खंड, पूर्वेस उत्तर आणि दक्षिण अमेरिका हे दोन खंड, उत्तरेस बेरिंगची सामुद्रधुनी व दक्षिणेस अंटाक्र्टिका खंड आहे. या महासागराने पृथ्वीचा ३२ टक्के भाग व्यापला असून जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी या महासागरात आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे अनेक अरुंद समुद्र आहेत. पूर्व भागातील समुद्रात प्रामुख्याने कॅलिफोर्नियाचे आखात आणि ब्रिटिश कोलंबिया समुद्र यांचा समावेश होतो. १० हजार ९११ मीटर इतकी खोली असलेली मेरीयाना गर्ता ही प्रशांत महासागरातील सर्वात खोल घळ आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरातील सर्वात मोठे बेट आहे.
पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक ‘फर्डिनांड मेजेलन’ याने आपल्या विश्व सफरीदरम्यान दिले. पोर्तुगीज भाषेतील ‘मार पॅसिफिको’ (शांत समुद्र) या शब्दावरून हे नाव देण्यात आले. विषुववृत्तावर प्रशांत महासागराची विभागणी उत्तर व दक्षिण पॅसिफिक महासागरात होते. या समुद्राचे पृष्ठीय सरासरी तापमान १७ अंश सेल्सियस आहे. या महासागरात दोन प्रवाह म्हणजे उत्तर पॅसिफिक व दक्षिण पॅसिफिक प्रवाह आहेत. तसेच खोल सागरी प्रवाहही आढळतात. काही ठिकाणी दिवसातून एकदाच भरती व एकदाच ओहोटी येते. तर ताहीती बेटाजवळ भरती-ओहोटी चंद्राबरोबर न येता सूर्याबरोबर येत असल्याचे आढळते. या महासागरात क्षारतेचे प्रमाण विषुववृत्तावर ३४.८५ टक्के (पी.पी.टी., प्रति हजार भाग) असते. उत्तर पॅसिफिकमध्ये ३५ टक्के तर दक्षिण पॅसिफिकमध्ये ३६ टक्के असते. मात्र ध्रुव प्रदेशाकडे ही क्षारता कमी होत जाते. वाढत्या खोलीबरोबर क्षारतेचे प्रमाण घटत जाते.
हिवाळय़ातील हवामानावर या महासागराचा परिणाम होतो. तसेच जलचक्रात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. दळणवळण सुलभ करण्याच्या दृष्टीने पनामा कालव्याने अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडले गेले. या सागरामुळे अनेक मत्स्य क्षेत्रे निर्माण झाली असून दरवर्षी लाखो टन मत्स्योत्पादन मिळते. सोडियम, ब्रोमिन, मॅग्नेशियम ही खनिजे त्यातून मिळतात. तसेच सागरतळाशी मँगनीजचे साठे गाठीच्या स्वरूपात आढळतात. या महासागरालादेखील प्लास्टिक प्रदूषणाने वेढले आहे. जवळपास ८० हजार मॅट्रिक टन प्लास्टिक त्यात सामावले आहे. या समुद्रात उपग्रह निकामी केले जातात. तसेच आण्विक कचरा, अनेक आण्विक अस्त्रे आणि बॉम्ब हेदेखील नष्ट केले जातात. एवढय़ा विशाल जलधीचा वापर मानव कसाही करत आहे.
प्राचार्य डॉ. किशोर पवार, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org