‘‘साहित्यनिर्मितीला आवश्यक असलेल्या मोकळ्या वातावरणाला सध्याच्या संशयास्पद परिस्थितीत धोका निर्माण झाला आहे व तो म्हणजे लेखनस्वातंत्र्यावरील निर्बंध होय. हा निर्बंध आपद्धर्म म्हणून आला आहे. सर्वसामान्य परिस्थिती उत्पन्न झाली, अडचणी कमी झाल्या, वातावरण निवळले म्हणजे लेखनस्वातंत्र्य पूर्ववत राहील, अशी आशा बाळगून राष्ट्रपतींना हे नम्र निवेदन दिले आहे. कित्येक वेळा उपायच दुरुपाय ठरतो, आपत्काल तात्कालिक न ठरता कायमचा मुळे रोवून बसतो. लोकशाहीचा धोका दूर करण्याकरिता जे उपाय योजले जातात, तेच उपाय कित्येकदा लोकशाहीलाच दूर ठेवू शकतात, हे काही लोकशाही ध्येयाची निष्ठा असलेल्या सत्ताधाऱ्यांना सांगावयास नको. कारण, त्यांना ते स्पष्टच दिसत असते. आपले सध्याचे सत्ताधारी लोकशाहीचे अनन्य भक्त आहेत, अशी श्रद्धा आपण बाळगूनच हे मन उदास करणारे गढूळ हवामान बाजूला जाईल आणि लेखनस्वातंत्र्याच्या निर्मळ आकाशाच्या वातावरणात आपण पुन्हा सारस्वत संसाराचा व्यवहार चालवू शकू, अशी आशा बाळगतो.’’

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कराडमध्ये संपन्न ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणाचा हा समारोपीय अंश आहे. हे संमेलन ६, ७ व ८ डिसेंबर १९७५ रोजी संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या दुर्गाबाई भागवत, तर स्वागताध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. नुकताच भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार वि. स. खांडेकरांना जाहीर झालेला होता. त्यांचेही प्रसंगोचित भाषण झाले. ही चारही भाषणे त्या वेळी गाजली; पण तत्कालीन प्रसिद्धी विभागाने तर्कतीर्थांच्या भाषण प्रसिद्धीवर निर्बंध घातल्याने त्यास प्रसिद्धी लाभली नाही. त्याचे कारण, वरील परिच्छेद आक्षेपार्ह ठरवला गेला होता, हे होते. दुसरीकडे मात्र तर्कतीर्थांची आणीबाणीसंदर्भातील ही संयत भूमिका मवाळ मानली गेली होती. तर्कतीर्थ भूषवीत असलेली सरकारी पदे, त्यांचे स्नेही तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांची संमेलनातील स्वागताध्यक्ष म्हणून राहिलेली भूमिका यांची पार्श्वभूमी या मवाळ भूमिकेवरील टीकेमागे होती.

प्रस्तुत भाषणात तर्कतीर्थांनी १९०९ पासून झालेल्या अध्यक्षीय भाषणांचा आढावा घेत आपले विचार व्यक्त केले होते. विद्यापीठीय शिक्षणात मराठी, शास्त्र व कला शिक्षणासह सर्व आधुनिक ज्ञान-विज्ञानांचे शिक्षण मराठीतून मिळावे, यावर भर दिला होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे अशा संमेलनातील योगदान अधोरेखित करत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहाय्याने बडोदा येथे संपन्न १९०९च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा कीर्तिकर यांच्या विचारांचा पुनरुच्चार केला होता. तो करत त्यांनी मराठी मातृभाषेत शिक्षण देण्या-मिळण्याचे महत्त्व विशद केले होते.

कराड येथे संपन्न या साहित्य संमेलनाचे औचित्य सांगत कराडचे सांस्कृतिक महत्त्व रेखांकित करत म्हटले होते की, ‘‘कराड हे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील, एवढेच नव्हे तर इतिहासपूर्व कालातील अत्यंत महत्त्वाचे एक सांस्कृतिक केंद्र आहे. प्राचीनकालीन अनेक राजांची ही राजधानी होती असेही म्हणतात. स्कंदपुराणात याला आदितीर्थ म्हटले आहे. दोन नद्यांच्या संगमालाही धर्मशास्त्राच्या परिभाषेप्रमाणे ‘तीर्थ’ ही संज्ञा येते. साहित्यिकांना आनंद वाटावा, असे हे कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाचे तीर्थस्थान आहे. तीर्थस्थानी पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धापूर्वक आदरांजली अर्पण करायची असते. साहित्य संमेलनाचे दिवंगत असे अनेक माजी अध्यक्ष येथे मला आठवतात. ज्यांचा ज्यांचा मी येथे निर्देश केला आहे, त्यांनी त्यांनी मराठी वाङ्मयगंगेला सुंदर असे साहित्याचे घाट बांधले आहेत व तिच्या तीरावर नवनवीन मंदिरे उभारली आहेत.’’

तर्कतीर्थांचे हे भाषण अनेक अंगांनी महत्त्वाचे ठरते. विशेषत: आज सर्वत्र दिवाळीच्या दीपमाळा उजळल्या असतानाच्या उत्सवी वातावरणात हे भाषण अंधारयुगाचे तिमिर छेदत प्रकाशयुगाची आराधना समजावते. ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’ सांगणारा हिमांशू कुलकर्णी यांच्यासारखा कवी असो अथवा ‘अक्षरांचा श्रम केला’ म्हणणारे संत तुकाराम महाराज असोत, हे सर्वच आपल्या काव्यातून लक्ष लक्ष दीप उजळत अज्ञान, अंधकार व अंधश्रद्धांचे साम्राज्य मिटावे म्हणून विचारांचा अक्षय व अक्षर उत्सव साजरा करीत राहतात.

 डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com