तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे शिक्षण ज्या प्राज्ञपाठशाळा, वाई गुरुकुलात नारायणशास्त्री मराठे तथा स्वामी केवलानंद सरस्वती यांच्याकडे झाले, तिथेच आचार्य विनोबा भावे १९१७ मध्ये ‘शांकरभाष्य’ शिकण्यासाठी काही काळ आले होते. त्या काळात तर्कतीर्थ त्यांचे सहाध्यायी होते. आचार्य विनोबांचा जन्म ११ सप्टेंबर, १८९५ ला झाला. त्यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ १९५५-५६ मध्ये व्हायचा होता. गौरवग्रंथ नियोजित होता. त्यासाठी तर्कतीर्थांनी ‘गुरुवर्य श्री विनोबा यांच्यासंबंधी काही स्मृतिशेष’ शीर्षक लेख लिहिला होता.

त्यानुसार, विनोबा प्राज्ञपाठशाळेत येऊ लागले. तत्पूर्वी त्यांनी महात्मा गांधींच्या साबरमती येथील सत्याग्रह आश्रमात महाव्रत दीक्षा घेतली होती. पाठशाळेतील विनोबांची धारणाशक्ती पाहून अन्य व्युत्पन्न बुद्धीचे विद्यार्थी नम्र होत. विनोबांच्या विलक्षण प्रज्ञेची जाणीव प्रत्येकाच्या प्रत्ययास आली. सहा महिन्यांतच विनोबांनी ‘शांकरभाष्य’चे अध्ययन पूर्ण केल्याचे महात्मा गांधींना पत्राने कळविले. तेव्हा उत्तरात महात्मा गांधींनी म्हटले होते, ‘ऐ गोरख तूने मच्छिंद्र को भी जीता है।’

याच सुमारास वाईस प्लेगने ग्रासले. पाठशाळा गावाबाहेरील पर्णकुटीत भरू लागली. इकडे गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत, तिकडे विनोबांचा प्रगट वाचनाचा स्वाध्याय चालत असे. तो आवाज कांस्यपात्राच्या घंटारवाप्रमाणे पाठशाळेपर्यंत पोहोचायचा. गुरुजी मराठे म्हणायचे, ‘‘गीर्वाणवाणीचे इतके सुंदर उच्चरण ऐकले म्हणजे ही देववाणी आहे, असे प्रत्ययास येते. आद्याशंकराचार्यांची ही वाणी आहे, अशी ओळख पटते.’’ अन् तर्कतीर्थांना बजावत, ‘‘विनोबांसारखे पठन करता आले पाहिजे. तू वाचताना फार घाई करतोस. विनोबांची वाक्शक्ती अलौकिक आहे; त्यांचे अनुकरण कर.’’

प्राज्ञपाठशाळेजवळच संस्थापक प्रज्ञानंद सरस्वतींची समाधी आहे. तिथे दर सोमवारी धर्मसभा होत असे. सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित असत. एका विद्यार्थ्यावर विषयविवेचनाची जबाबदारी असे. एका सोमवारी तर्कतीर्थांनी ‘राज्यसंस्था व धर्मसंस्था’ विषयावर विवेचन केले. ते पाश्चात्त्य संदर्भांनी भरलेले होते. विवेचनानंतर खंडनास कोणीच धजेना हे पाहून विनोबा उठले. त्यांनी आपल्या खंडनाने तर्कतीर्थांचे भाषण खोडून टाकले. तर्कतीर्थांच्या भाषणात दंडशक्तीचे समर्थन होते. त्याचे खंडन करत विनोबांनी स्पष्ट केले की, ‘‘अहिंसेचे शौर्य हीच मानवी समाजाची खरी धारणाशक्ती; शस्त्रसामर्थ्य मानव्यास दुर्बल बनविते व समाजाच्या विनाशाची बीजे रोवते.’’ पाठशाळेत अनेक ‘रणावीण स्वातंत्र्य कोणासही मिळणार नाही,’ अशा सशस्त्र क्रांतीचे समर्थक होते; पण कोणासही विनोबांचा प्रतिवाद करण्याचे धाडस झाले नाही.

अध्यापक म्हणून विनोबांची ठाम मते होती. ‘‘जो कमीत कमी शिकवतो, तो खरा शिक्षक. शिकलेले आचरणारा तो आचार्य. ज्ञान देता येत नाही, ते फक्त मिळविता येते. आचार्य मार्गदर्शक असतो.’’ विनोबांनी तर्कतीर्थांना बडोद्यास परत गेल्यानंतर इंग्रजी शिकवलं. त्यासाठी तर्कतीर्थ वाईहून न सांगता बडोद्याला पळून गेले होते. तिथे ते विनोबांच्या घरीच राहात. व्युत्पत्ती पद्धतीने विनोबांनी तर्कतीर्थांना तर्खडकर भाषांतरमाला शिकविली. तीन भाग तीन महिन्यांत पूर्ण झाले. ‘टिचिंग ऑफ ख्राईस्ट’, ‘सॅन्फर्ड अँड मर्टन’चे वाचन शिकविले. मग तर्कतीर्थ स्वतंत्रपणे इंग्रजी वाचू लागले.

विनोबा पाठशाळेतील काळात तपस्वी दिनक्रम पाळत. अध्ययनही समाधीवत करीत. ‘ज्ञानेश्वरी’, ‘गीतारहस्य’, ‘दासबोध’ची पारायणे चालू असत. विनोबांच्या अभ्यासाचे अनेक ग्रंथ, वह्या, पोथ्या तर्कतीर्थांकडे होत्या. मित्रांनी त्या पाहायला म्हणून नेल्या, त्या परत दिल्याच नाहीत. दुर्मीळ खासगी ग्रंथसंग्रहातील वाचायला नेलेल्या पुस्तकांना परतीचे पाय नसतात, हेच खरे! पाठशाळा काळातील विनोबांचा आहार केळी, दूध व भाकरी हा त्रिफळाच असे. वेश खादीचा होता. टोपी, सदरा, धोतर असा पोशाख. तर्कतीर्थ व गुरुजी मराठे हे शिवलेले कपडे वापरत नसत. विनोबा साबण वापरत नसत. त्यांच्या प्रार्थना श्रवणीय असत. स्पष्ट वर्णोच्चार, लयदार वृत्तसंगती, स्वरांची सुस्वर आळवणी असे. संत साहित्य मुखोद्गत होते. कायदेभंग चळवळीत तर्कतीर्थ व विनोबा धुळे तुरुंगात एकत्र होते. विनोबांची साने गुरुजींनी लिहिलेली ‘गीता प्रवचने’ तर्कतीर्थ नियमित ऐकत. उभयतांत पत्रव्यवहार होता. तो गहाळ आहे. विनोबांना दूरदृष्टी होती. गांधीजींच्या नेतृत्वाचे विनोबांचे भाष्य खरे निघाले.