मल्याळी सिनेमा, त्यातले विविध विषय, विविध प्रयोग, दमदार अभिनेते आणि अभिनेत्री या सगळ्यांनी प्रेक्षकांचे लक्ष अलीकडच्या काळात विशेषत: ओटीटीवरील उपलब्धतेमुळे जास्त ठळकपणे वेधून घेतले असले तरी त्याआधीही मल्याळी सिनेमाची पताका आपल्या खांद्यावरून समर्थपणे मिरवणारी अनेक नावे आहेत. त्यातले एक महत्त्वाचे नाव अभिनेते मोहनलाल यांचे. त्यांना आज (२३ सप्टेंबर) प्रदान करण्यात आलेल्या २०२३ साठीच्या दादासाहेब फाळके पुरस्कारामुळे यावर पुन्हा एकदा सरकारी शिक्कामोर्तब झाले इतकेच.

पुन्हा एकदा असे म्हणण्याचे कारण म्हणजे जेमतेम पासष्टीच्या या अभिनेत्याला आत्तापर्यंत अभिनयासाठी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नऊ वेळा राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय पद्माश्री, पद्माभूषण हे पुरस्कारही त्यांच्या खाती जमा आहेत. त्यांच्या रूपाने मल्याळम सिनेमाला मात्र पहिल्यांदाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. अगदी शालेय जीवनापासून अभिनयाची कारकीर्द सुरू करून मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले.

अॅक्शन, कॉमेडी, रोमँटिक, सामाजिक अशा सर्व जॉनरच्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मुख्य म्हणजे त्यांनी मल्याळमबरोबरच तमिळ, तेलुगु, कन्नड या दक्षिण भारतीय चित्रपटांत आणि हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. ‘प्रणवम कला’ नावाची त्यांची स्वत:ची चित्रपटनिर्मिती करणारी कंपनीदेखील आहे. या सगळ्याच्या जोडीने सामाजिक कामांसाठीदेखील मोहनलाल ओळखले जातात.

त्यांचे पूर्ण नाव मोहनलाल विष्णुनाथन नायर. जन्म १९६० चा. अर्थातच केरळमधला. त्यांचे वडील केरळ राज्य सरकारमध्ये कायदे विभागाचे सचिव होते. सहाव्या इयत्तेत असताना ‘कॉम्प्युटर बॉय’ नावाच्या नाटकात त्यांनी साकारलेल्या नव्वदीच्या वृद्धाच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून थिरनोत्तम नावाचा पहिलावहिला सिनेमा केला. त्यात त्यांनी एका गतिमंद नोकराची भूमिका केली होती. तो सिनेमा त्या वेळी प्रदर्शित होऊ शकला नाही, (त्यासाठी २५ वर्षे जावी लागली) पण त्यामुळे मोहनलाल यांचे काहीच अडले नाही.

तिथून त्यांची अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधली कारकीर्द झळाळतच राहिली. त्यामुळे ‘मंजिल विरिंजा पूक्कल’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र त्यांना सुपरस्टार केले ते ‘राजविन्ते माकन’ या चित्रपटाने. ‘किरीदम’, ‘मणिचित्रताजु’, ‘दृश्यम’, ‘पुलिमुरुगन’, ‘इरुवर’, ‘कंपनी’ आणि ‘जनता गॅरेज’ असे त्यांचे अनेक चित्रपट मल्याळम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोहनलाल यांच्या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आहेत, हे केरळमधले नेहमीचे चित्र आहे, असे सांगितले जाते.

राजविन्ते माकन या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेचा प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पडला होता. तर ‘चित्रम’ या सिनेमातील त्यांचे विनोदी पात्र तेवढेच लोकप्रिय झाले. ‘भारतम’मध्ये त्यांनी एका संगीतकाराच्या भावनात्मक संघर्षाचे परिपूर्ण दर्शन घडवले होते. ‘कीरीदम’ या चित्रपटात तरुणाच्या जीवनातील कठीण निर्णयांचे वास्तव त्यांनी प्रेक्षकांसमोर उभे केले.

‘देवासूरम स्पाडिकम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत दर्जेदार अभिनय केला. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबासाठी पाय रोवून उभ्या राहणाऱ्या एका सामान्य माणसाचे दर्शन घडवले. १९८६ या एका वर्षात तर मोहनलाल यांचे ३४ चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्या वेळी त्यांचे वय होते, २६ वर्षे. या ३४ पैकी २५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरले होते. या वर्षी दर १५ दिवसांनी मोहनलाल यांचा एक चित्रपट प्रदर्शित होत होता. या सगळ्यामुळे मोहनलाल हे केरळी सिनेमाचा चेहरा आहेत.