भारतात नावारूपाला आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या कुस्तीत कालांतराने भारताची पीछेहाट झाली. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना व्लादिमिर मेस्त्विरिश्विली हे नाव समोर आले. कुस्तीगीर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळविणाऱ्या मेस्त्विरिश्विलीसाठी कुस्ती म्हणजे श्वास आणि ध्यास होता. कुस्तीगीर म्हणून यशस्वी कारकीर्द घडविल्यानंतर मेस्त्विरिश्विली यांनी प्रशिक्षक या नात्याने कुस्तीशी नाते जोडले. जॉर्जियाच्या या कुस्तीगिराची भारतीय कुस्ती महासंघाने प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.
मेस्त्विरिश्विली यांनी २००३ मध्ये भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा मॅटवरील कुस्तीत भारताचे स्थान नगण्य होते. त्यांनी शून्यातून भारतीय कुस्ती संघ घडविण्याचे आव्हान स्वीकारले. तंत्र, शिस्त आणि लढा देण्याची जिद्द अशा त्रिसूत्रीवर भर देऊन त्यांनी भारतीय कुस्तीला सशक्त केले. मातीतील कुस्तीला मॅटवरही यश मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
त्यांनी सुशीलकुमारपासून बजरंग पुनिया, रवी दहिया यांच्यापर्यंत अनेक पदकविजेते भारतीय मल्ल घडवले. मॅटवर शिस्तीबाबत, तंत्राबरोबरच काटेकोर असणाऱ्या मेस्त्विरिश्विली यांचे बाहेर मात्र खेळाडूंशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे ते मल्लांशी मनानेदेखील जोडले गेले. भारतीय कुस्ती क्षेत्रात ते ‘लाडो’ या टोपणनावाने परिचित होते.
ते तब्बल दोन दशके भारतात वास्तव्यास होते. अनेक परदेशी प्रशिक्षक येत-जात राहिले, पण मुख्य जबाबदारीसाठी मेस्त्विरिश्विली यांच्यावरच कायम राहिली. त्यांच्याच कारकीर्दीत भारताने तब्बल पाच ऑलिंम्पिक पदकांवर नाव कोरले. यामध्ये सुशीलकुमार (बीजिंग, लंडन), योगेश्वर दत्त (लंडन), बजरंग पुनिया (टोकियो) आणि रवी दहिया (टोकियो) यांचा समावेश होता. दीपक पुनियानेदेखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारकीर्द सुरू केली. भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी १९८२ ते १९९२ पर्यंत ते जॉर्जियाचे प्रशिक्षक होते.
अनेक युरोपीय, ऑलिंम्पिक आणि जागतिक विजेते त्यांनी घडविले. पुस्तकी स्वरूपाचे प्रशिक्षण देणाऱ्यांपेक्षा मेस्त्विरिश्विली यांची शैली अधिक नैसर्गिक होती. त्यांच्या अनुभवाचा लाभ अन्य भारतीय प्रशिक्षकांनाही झाला. मॅटवर प्रशिक्षण देत असले, तरी त्यांनी भारताच्या मातीतील कुस्तीच्या पारंपरिक डावांना कधीही नाकारले नाही. त्यांना युरोपीय आधुनिकतेची जोड दिली. शिका आणि पुन:पुन्हा प्रयत्न करा, असा त्यांचा खाक्या होता. ते स्वत: मॅटवर उतरून डाव शिकवत.
हरियाणामध्ये दहा वर्षांहून अधिक काळ राहताना त्यांनी भारतीय संस्कृतीदेखील जाणून घेतली. ते हरियाणवी भाषा बोलू लागले होते. फावल्या वेळात शेतात शेतकऱ्यांबरोबर वेळ घालवत. त्यांच्यासारखा पेहराव आणि भारतीय पद्धतीचा स्वयंपाकदेखील त्यांना आवडू लागला होता. वाढत्या वयाचे कारण देऊन रिओ ऑलिम्पिकनंतर भारतीय कुस्तीगीर महासंघाने मेस्त्विरिश्विली यांचा करार समाप्त केला होता. पण, तोवर त्यांचे नाव भारतीय कुस्ती इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले होते.
केवळ परंपरेत गुरफटून न राहता मेस्त्विरिश्विली यांनी या खेळाला आधुनिक आयाम दिला. त्यामुळेच १९५२मध्ये खाशाबा जाधवांच्या अमूल्य ऑलिम्पिक पदकानंतर नवीन सहस्राकात भारतीय कुस्तीगिरांकडे हमखास पदकविजेते म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यांच्या निधनाने भारतीय कुस्ती क्षेत्रातील एक महत्त्वाचा अध्याय समाप्त झाला.