k Liberalism is characterized by the principle: There is too much of government.l- Michel Foucault
स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या मूल्यत्रयीवर आधारित पाश्चात्त्य लोकशाहीचा उल्लेख ‘उदारमतवादी लोकशाही’ असासुद्धा केला जातो. प्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ पिएर रोझाँवालों नमूद करतो की लिबरॅलिझम अर्थात उदारमतवाद आधुनिक लोकशाहीच्या मूल्यव्यवस्थेतील फक्त एक मूल्य नसून लोकशाहीच्या आविष्काराची पूर्वअटच आहे. अन्यथा लोकशाही फक्त कागदोपत्रीच उरते आणि वास्तवात निरंकुश अधिकारशाही ठरते, जिथे स्वतंत्र, स्वायत्त, समान व्यक्तींच्या उत्कर्षासाठी अवकाश नसतो. पण बदलत्या संदर्भांनुसार उदारमतवादानं वेगवेगळ्या वाटांनी मार्गक्रमण केलं. त्यामुळे उदारमतवादांतर्गत अंतर्विरोध निर्माण होऊन उदारमतवाद या शब्दाचे अर्थ विशेषत: भांडवलवादाच्या निर्णायक विजयानंतर बदलत गेले.
आजच्या घडीला लिबरॅलिझम या शब्दाभोवती विविध आणि परस्परविरोधी अर्थांचं इतकं दाट जाळं निर्माण झालं आहे की, या शब्दाचा संदर्भहीन वापर अर्थहीन ठरतो. उदा.- अमेरिकेत डाव्या विचारसरणीच्या बाजूनं असणाऱ्यांना लिबरल म्हटलं जातं, तर फ्रान्समधले लिबरल उजव्या विचारसरणीच्या बाजूचे ठरतात. इंग्लंडमध्ये लिबरल शब्दाचा अर्थ तर इतका गुळगुळीत झाला आहे की ‘लेफ्टविंग लिबरल’ आणि ‘क्लासिकल लिबरल’ (अर्थात मुक्त व्यापाराचा पुरस्कार करणारा) असा भेद करावा लागतो. अमेरिकेतले धार्मिक परंपरावादी एका बाजूला गर्भपाताशी संबंधित सुधारणांचा पुरस्कार करणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक लिबरॅलिझमचा विरोध करतात. पण दुसऱ्या बाजूला आर्थिक उदारमतवादाचा हिरिरीने पुरस्कार करतात. त्याचप्रमाणे नवउदारमतवादाच्या विरोधात निशाण फडकवणारे मुक्त बाजारपेठेला अर्थात उदारमतवादाच्या आर्थिक पैलूला लक्ष्य करतात. पण ही पर्यायी जगवादी छावणी सामाजिक, सांस्कृतिक उदारमतवादाचा आग्रह धरून नैतिक उदारमतवादी बनते. भारतात तर लिबरलचं ‘लिब्रांडू’ करून हा शब्द पुरोगामी विचारसरणीच्या लोकांसाठी शिवीसारखा वापरला जातो. पण दुसऱ्या बाजूला, हीच प्रतिगामी छावणी आर्थिक क्षेत्रात ‘पैशाला धर्म नसतो. पैसाच खरा धर्म असतो’, या टोकाच्या लिबरॅलिझमचा अंगीकार करताना दिसते.
थोडक्यात, उदारमतवादाचा इथवरचा अंतर्विरोधात्मक प्रवास पाश्चात्त्य आधुनिकतेची विजयी घोडदौड अधोरेखित करणारा आहे, तसंच त्यामुळे निर्माण झालेली अरिष्टंसुद्धा त्यातून अधोरेखित होतात. उदारमतवादाचं हे गुंतागुंतीचं चरित्र समजून घेण्यासाठी त्याचा मुळापासून विचार करणं आवश्यक आहे. त्यासाठी उदारमतवादाची निकड, उगम, त्याचं बदलतं स्वरूप आणि आधुनिकतेच्या इतर मूल्यांशी येणारा गुंतागुंतीचा संबंध समजून घेऊ. त्यासाठी सर्वप्रथम प्रस्तुत लेखात उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा प्रणेता जॉन लॉक (१६३२- १७०४) या इंग्लिश विचारवंताकडे वळावं लागेल.
खरंतर तत्त्वज्ञानाला सामान्यांच्या पातळीवर आणण्याचं श्रेय जॉन लॉकला दिलं जातं. त्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मध्यवर्ती स्थान दिलंच, पण त्यानं सर्वसामान्यांची भाषा, शैली आणि सामान्यबुद्धीला (कॉमन सेन्स) त्याच्या ज्ञानशास्त्रीय दृष्टिकोनाचं साधन बनवलं. त्यामुळे बर्ट्रांड रसेल त्याचं वर्णन ‘रटाळ पण उपयुक्त आणि परिणामकारक विचारवंत’ म्हणून करतो. प्रस्तुत लेखाचा विषय जॉन लॉकचं उदारमतवादी राजकीय तत्त्वज्ञान हा असला तरी त्याच्या ज्ञानशास्त्राचा आणि तत्कालीन परिस्थितीचा परामर्श घेणं आवश्यक आहे. कारण या तीन पैलूंमध्ये आंतरिक संबंध आहे. उदा.- रक्ताचा थेंबही न सांडता १६८८ मध्ये घडलेल्या इंग्लंडच्या मध्यममार्गी उदारमतवादी राजकीय क्रांतीच्या (ग्लोरियस रिव्होल्यूशन) मुळाशी जॉन लॉकचे विचार असल्यानं तो या यशस्वी क्रांतीचा प्रेषित म्हणूनही ओळखला जातो. खरंतर या क्रांतीच्या दरम्यानच ‘अॅन एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टॅण्डिंग’, ‘टू ट्रीटायझेस ऑन गव्हर्न्मेंट’, ‘अ लेटर कन्सर्निंग टॉलरेशन’, ‘सम थॉट्स कन्सर्निंग एज्युकेशन’ हे लॉकचं मूलभूत लिखाण झालं. याआधी आपण पाहिलं की १६४० ते १६८८ या काळात इंग्लंडमध्ये धार्मिक, राजकीय आणि आर्थिक पातळींवरील अंतर्विरोधांची परिणती राजेशाही आणि पार्लमेंट यांच्यामध्ये रक्तरंजित सत्ता संघर्षात झाली. एका बाजूला, रॉबर्ट फिलमरच्या ‘पॅट्रिआर्का या ग्रंथातलं धार्मिक तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करणारी ईश्वरदत्त राजेशाही अधिकाधिक ताठर आणि निरंकुश होत होती; तर दुसऱ्या बाजूला प्रोटेस्टंट तत्त्वज्ञानासोबतच उगवत्या मध्यमवर्गाच्या आशा आकांक्षांना प्रतिबिंबित करणाऱ्या पार्लमेंटमध्ये अस्वस्थता वाढत होती. शेवटी या ऐतिहासिक द्वंद्वाचा स्फोट होऊन गृहयुद्धाला तोंड फुटलं. पहिल्या चार्ल्सचा शिरच्छेद होऊन कर्मठ स्वभावाच्या ऑलिव्हर क्रॉमवेलची प्युरिटन राजवट आली. त्याच्या मृत्यूनंतर परत राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याच कालखंडात जन्मलेल्या जॉन लॉकचे वडील क्रॉमवेलच्या बाजूनं अर्थात राजेशाहीच्या विरोधात लढले. लॉकला मात्र निरंकुश राजेशाहीसोबतच क्रॉमवेलच्या प्युरिटन राजवटीतील अतिरेकसुद्धा अमान्य होता. दोन्ही राजवटी कर्मठ ज्ञानाचा दावा करणाऱ्या होत्या. लॉकच्या ज्ञानशास्त्रीय विश्लेषणात कर्मठ ज्ञान हा अज्ञानाचा समानार्थी शब्द ठरतो म्हणून तो अनुभववादी ज्ञानशास्त्राचा सम्यक, विनम्र, मध्यममार्ग पत्करतो.
लॉकचा अनुभववाद
आधुनिकतेच्या प्रक्रियेत उदयास आलेल्या ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’च्या सदस्यांना जोडणारा मध्यवर्ती धागा म्हणजे त्यांनी मध्ययुगीन धार्मिक, स्कलॅस्टिक आणि अॅरिस्टॉटलच्या चौकटीला दिलेला नकार. सर्वप्रथम हा नकार ज्ञानशास्त्रीय आहे. सतराव्या शतकातील विचारवंतांनी मध्ययुगीन सामाजिक, आर्थिक, राजकीय इमारतीचा ज्ञानात्मक पाया उद्ध्वस्त करण्याची एका प्रकारे चळवळच छेडली होती. त्यांनी प्रतिपादित केलेल्या आधुनिक अधिष्ठानांमध्ये विविधता असली तरी मध्ययुगीन अधिष्ठानांना नाकारण्याच्या बाबतीत किमान एकवाक्यता होती.
जॉन लॉकवर सुरुवातीच्या काळात देकार्त, हॉब्ज, गॅसन्डि, गॅलिलिओ इत्यादींचा प्रभाव होता. ‘ Incomparable’ न्यूटनशी तर त्याची मैत्रीच होती. देकार्तद्वारा झालेलं अॅरिस्टॉटलचं खंडन त्याला महत्त्वाचं वाटतं. पण लॉकचा ज्ञानशास्त्रीय सिद्धांत आणि कार्टेशियन सिद्धांत यांत मूलभूत फरक आहे. देकार्त भौतिकतेला संशयास्पद ठरवून बौद्धिकतेत संशयातीत ज्ञानाचा आधार शोधतो. लॉक मात्र भौतिकता आणि बौद्धिकता या दोन्ही तत्त्वांच्या ‘अंतिम सत्’ स्वरूपाविषयीच्या शोधाच्या ऐवजी भौतिक वस्तूंचा शारीर इंद्रियांवर होणारा परिणाम आणि त्यांच्यावर ज्ञानेंद्रियांनी केलेल्या प्रक्रियेलाच त्याच्या अनुभववादात जागा देतो.
भौतिक जग मुळात ‘काय’ आहे, ही अगम्य बाब असली तरी ते कसं काम करतं ही गोष्ट गम्य आहे. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अनुभववाद. लॉकसाठी अनुभव दोन प्रकारचे असतात. एका बाजूला बाह्य वस्तूंच्या शारीर इंद्रियांवर होणाऱ्या परिणामांमुळे निर्माण होणाऱ्या संवेदनांचा अनुभव आणि त्या बहुजिनसी संवेदनांवर होणाऱ्या मानसिक प्रक्रियांचा आंतरिक अनुभव. लॉक बुद्धीकडे सारतत्त्व ( substance) म्हणून न पाहता निष्कर्ष काढण्याचं साधन म्हणून पाहतो.
अर्थात इंद्रियगोचर जगाचा मानवी इंद्रियांवर होणाऱ्या आघाताचं शिस्तबद्ध पद्धतीनं विश्लेषण केल्यावर त्याविषयी सापेक्ष आणि अपूर्ण पण परिणामकारक आणि उपयुक्त ज्ञान अवगत करता येतं. देकार्तनुसार भौतिक जग म्हणजे साक्षात गणितीय समीकरण आणि भूमितीय आकारांनी युक्त यंत्र. लॉकसाठी मात्र जग म्हणजे जगाचं गणितीय भूमितीय मोजमाप नाही. लॉक मानवी मनाला कोरी पाटी (tabula rasa) समजतो तर देकार्त मनुष्याच्या अंगभूत, स्वयंभू (innatism) कल्पनांचा पुरस्कार करतो. लॉकनुसार मनुष्याच्या कल्पना अंगभूत स्वयंभू नसून अनुभवजन्य असतात. लॉकच्या तत्त्वज्ञानात आयडिया या संकल्पनेला विशेष अर्थ आहे. अनुभवजन्य आयडिया म्हणजे वास्तवाची प्रतिमा (image) नसून परिणाम ( effect) आहे. त्यामुळे, आयडिया म्हणजे जगातील वस्तूंचं प्रतिबिंब किंवा प्रतिमा नसून मनुष्यानं संवेदनांवर मानसिक प्रक्रियेनं निर्माण केलेलं रचित. लॉकनुसार मानवी ज्ञान रचित (construct) असतं. लॉकच्या अनुभववादी ज्ञानशास्त्रानंतर कॉन्टिनेन्टल परंपरा आणि इंग्लिश परंपरा यातील फरक अधिक गडद झाला.
थोडक्यात, लॉकचा अनुभववाद ज्ञानाचा उगम, आधार आहे. देकार्त, स्पिनोचा, लाय्बनिचसारख्या कॉन्टिनेन्टल तत्त्वज्ञांसारखं लॉक समग्रलक्ष्यी ज्ञानाची मांडणी करत नाही. तो अनुभवजन्य ज्ञानाला सापेक्ष मानतो. पण अनुभववादी ज्ञान सापेक्ष आणि ‘प्रॉबेबल’ असलं तरी त्याचं महत्त्व कमी होत नाही. लॉक लिहितो, ‘ It is of great use to the sailor to know the length of his line, though he cannot with it fathom all the depths of the ocean.’
खरंतर, लॉकचे उदारमतवादी राजकीय विचार त्याच्या ज्ञानशास्त्रीय विनम्रतेचं फलित आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अवगत केलेलं ज्ञान मर्यादित असून कधीही प्रश्नातीत नसतं. त्यामुळे कर्मठपणा शहाणपणाचं द्याोतक ठरत नाही. त्यामुळे हिंसेच्या मार्गानं इतरांवर विचार लादणं अनैतिक ठरतं. प्रत्येकानं तथ्यांचा तार्किक उलगडा करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यासाठी प्रत्येकाला फुरसतीचे क्षण मिळणं गरजेचं आहे.
थोडक्यात, लॉकचा उदारमतवादी ज्ञानशास्त्रीय दृष्टिकोन व्यक्तिवाद या आधुनिक मूल्याकडे नेतो. लॉक अॅरिस्टॉटल, रॉबर्ट फिलमर आणि थॉमस हॉब्ज यांच्या तत्त्वज्ञानातल्या ‘निसर्गावस्थेतील व्यक्ती’च्या संकल्पनांपेक्षा भिन्न संकल्पना मांडतो. लॉकच्या ‘निसर्गावस्थेतील व्यक्ती’ला समान नैसर्गिक अधिकार आहेत जे तत्कालीन निरंकुश राज्यसंस्थेनं नाकारल्यामुळे व्यक्तीच्या उत्कर्षाच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाचं प्रमुख प्रयोजन राज्यसंस्थेला मर्यादित करून नागरिकांच्या उत्कर्षासाठी वाट करून देणं हे आहे.
भांडवलवादापूर्वी जॉन लॉकनं मांडलेल्या उदारमतवादाचं स्वरूप अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी पुढील लेखांकात त्याच्या लिखाणातल्या व्यक्तिवादाची चर्चा करण्यात येईल.