कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी पती, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी सून, कुणाचा तरी जावई, कुणाची तरी भावजय, कुणाची तरी नणंद, पुतण्या, भाचा, मेहुणा, मेहुणी, नातू.. अशा सगळया कौटुंबिक निवडणूक सोहळयात ‘भटकत्या आत्म्या’ने प्रवेश केला आणि खाडकन निवडणुकीचा रंगच बदलला. त्याला कारणही तसंच घडलं. भाऊ-बहीण, नणंद- भावजय आणि बाकीचीही कंपनी एकमेकांची जाहीर उणीदुणी काढत असताना ‘‘महाराष्ट्रात ४५ वर्षांपूर्वी एका ‘भटकत्या आत्म्या’ने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी सगळं राज्य अस्थिर करण्याचा खेळ सुरू केला’’ असं एक ठेवणीतलं वाक्य आलं आणि या सगळया नातेवाईकांच्या गोतावळयाला समजेना की आपलं काय चुकलं बुवा? एक ‘भटकता आत्मा’ सोडला तर आपण बाकी सगळेजण खरंच वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून त्याच्या पलीकडे जाऊन राज्याच्या हिताचा, विकासाचा व्यापक विचार करतो आहोत की काय? राज्य स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आहोत की काय? कधीपासून? आणि कसा? पण कुणीतरी म्हणतंय म्हणजे तसंच असणार याचा साक्षात्कार त्यांना सगळयांना या एका वाक्यामुळे झाला खरा, पण तो त्यांना काही केला झेपेना.. आणि म्हणूनच त्यांना प्रश्न पडला की आता निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये बोलायचं तरी काय?
हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘आरटीई’ मूळ हेतूसह ‘पुन्हा येईल?’
आणि तिकडे आत्मा, भूत, पिशाच, मुंजा, खवीस, हडळ, वेताळ, समंध, चेटकीण, जाखीण या सगळया मंडळींनी त्या ‘भटकत्या आत्म्या’ला मीटिंगसाठी बोलावून घेतलं. ही सगळी मंडळी ‘भटकत्या आत्म्या’वर भयंकर चिडली होती. एक राज्य अस्थिर करायचं ही आपली वैयक्तिक महत्त्वाकांक्षा त्याने त्या सगळयांना कधीच सांगितली नव्हती आणि एकटयाने आणि तेही गेली ४५ वर्षे आपला हा उद्योग चालवला होता? त्याने सांगितलं नाही, हे तर आहेच, पण आपल्यालाही ते समजू नये, हे काही त्यांना अजिबात आवडलं नव्हतं. शिवाय या एका ‘टार्गेट’साठी एकानेच ४५ वर्षे घालवायची म्हणजे किती वेस्ट ऑफ टाइम आणि एनर्जी? आपण कायमच ओव्हरटाइम करतो, तरीही काम संपत नाही आणि आपल्याला पत्ता लागू न देता ‘भटकता आत्मा’ एकच काम तब्येतीत करतो ही भूत, पिशाच्च, मुंजा, खवीस, वेताळ, समंध, हडळ, चेटकीण, जाखीण या सगळया मंडळींची दुखरी नस ठरली होती. आपल्या ‘बिरादरी’मधली मंडळी आपल्यावर का चिडली आहेत, हे ‘भटकत्या आत्म्या’च्या लगेचच लक्षात आलं. पण भुताने किती जणांना झपाटलं आहे, पिशाच्च किती जणांच्या मानगुटीवर बसलं आहे, खविसाने किती जणांना पछाडलं आहे, वेताळ किती जणांना छळतो आहे, हडळी, चेटकिणी, जाखिणी यांचा ओव्हरटाइम किती जणांना जीवघेणा ठरतो आहे, हे सगळं त्याला माहीत होतं. या सगळयापेक्षा एखादं राज्य अस्थिर करणं हे ‘पाप’ जास्त पुण्याचं असा विचार करून त्याने एक शब्द न बोलता मीटिंगमधून काढता पाय घेतला.