‘आझादांची गुलामी!’ (२९ ऑगस्ट) हा अग्रलेख वाचला. गुलाम नबी आझाद यांच्यासारखे राजकारणी हे समाजात काळोखी पेरत आहेत. आझाद यांनी स्वत:च्या अंतर्मनाला विचारावे त्यांनी आयुष्यभर किती प्रामाणिक होतकरू तरुण पक्षात आणले? किती कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण केले? किती जनसंपर्क वाढवला? उत्तर शून्यच येईल. कारण, जी व्यक्ती सध्या तिच्या पक्षाचे जहाज बुडत असताना आणि त्या जहाजाची स्थिती सांभाळण्याची कुवत असलेली पदे भूषविली असूनही आता राजकीय लालसेपोटी दुसऱ्या पक्षाकडे वळण घेत आहे अथवा नवीन पक्ष काढण्याचा विचार करीत आहे तिने पक्षात असताना आपले पक्षांतर्गत स्थान बळकट करण्यासाठीही अशाच मार्गाचा अवलंब केला असेल हे वेगळे सांगणे नको.

आपण आपले संस्थान उभे करायचे आणि त्याला कोणतीही झळ पोहोचू द्यायची नाही. त्यास झळ लागायला लागली की पक्ष, विचारधारा, कार्यकर्ते, जनता इत्यादींना वाटाण्याच्या अक्षता लावून ओक्केमध्ये मार्गक्रमण करायचे अशी मनोवृत्ती सध्या आझाद यांसारख्या राजकारण्यांमध्ये बोकाळू लागली आहे. जे जनतेला समजते ते आज विरोधी पक्षांनीही समजून घ्यावे की आझादसारखे पळपुटे राजकारणी केवळ काँग्रेस पक्षात आहेत असे नाही तर ते सर्व पक्षांत आहेत. त्यामुळे पुढील राजकीय मार्गक्रमण करताना अशा पळपुटय़ा राजकारण्यांच्या हातात जबाबदाऱ्या देऊ नयेत हेच विरोधी पक्षांसाठी योग्य ठरेल.

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

– अ‍ॅड. किशोर र. सामंत,  भाईंदर पूर्व (जि. ठाणे)

घराबरोबर वासे फिरणारच!

 ‘आझादांची गुलामी!’ हा अग्रलेख ( २९ ऑगस्ट ) वाचला. गुलाम नबी आझाद यांच्याआधी, जोतिरादित्य शिंदे यांनी तर राहुल गांधींच्या विश्वासातील असूनही काँग्रेस सोडली. अशा वेळी आपले, परके कोण याची कल्पना कदाचित राहुल गांधी असोत किंवा सोनिया गांधी यांनी आता अनुभवली असेलच! पूर्वी काँग्रेसने एखाद्या मतदारसंघात दगड जरी उभा केला तरी काँग्रेसच्या प्रेमापोटी लाखो मतांनी निवडून येत असे मग आझाद यांच्यासारखे नेते तर काश्मीरऐवजी महाराष्ट्रातून विजयी होत. याचाच अर्थ म्हणजे लोक उमेदवाराला नाही तर काँग्रेसला विजयी करत. पण घर फिरले की वासेही फिरतात! आज एक एक नेते काँग्रेस सोडत आहेत ते फक्त आपली ताकद दाखवावी म्हणून, पण भाजपनेही भविष्यात अशा स्वार्थी लोकांना त्यांची ताकद ओळखून त्यांची जागा दाखवली तर आश्चर्य वाटायला नको.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>

भारत काँग्रेसमुक्त होणे परवडणार नाही

‘राहुल गांधींची लिटमस टेस्ट?’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील लेख (२९ ऑगस्ट) वाचला. लोकशाही देशात भक्कम विरोधी पक्ष हवाच. ‘गांधीमुक्त’ भारत परवडेल, पण ‘काँग्रेसमुक्त’ भारत नको. स्मृती इराणी यांनी अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव केला तेव्हाच गांधीमुक्त भारताच्या दिशेने पहिले पाऊल पडले होते, असे म्हणायला हरकत नाही. नरसिंह राव यांनी गांधीमुक्त काँग्रेस सरकार पाच वर्षे उत्तम चालवलेच ना? सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. त्यांनी नेटाने मिश्र सरकार चालवत महत्त्वाचे निर्णय घेतलेच. तसेच राहुल गांधी यांनी अनुभवी आणि मुरब्बी अशोक गेहलोत यांना स्वत: पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष केल्यास आणि त्यांच्यासमवेत ‘भारत जोडो’ यात्रा काढल्यास जनतेत चांगला संदेश जाईल. शिवाय गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष राहावे, ही भाजपची इच्छाही धुळीला मिळेल.

– श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

न्याय मिळतो, तरीही असुरक्षितता.. 

‘गोध्रा कारागृहातून सुटल्यानंतरचे आरोपींचे वर्तन अत्यंत घृणास्पद’ ही न्या. यू. डी. साळवी यांची मुलाखत आणि पी. चिदम्बरम यांच्या सदरातील लेख, दोन्ही (रविवार विशेष- २८ ऑगस्ट) वाचले. गुजरातमध्ये किती दहशत होती याची माहिती मिळाली. निकालासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) आधिकाऱ्यांनी त्या वेळी घेतलेली मेहनत, फक्त एक साक्षीदार फितूर होणे आणि ११ आरोपींना जन्मठेप हा न्यायदानाचा सकारात्मक प्रवासही न्या. साळवी यांच्या मुलाखतीतून उलगडतो खरा! अनेक खटाटोप करूनही या बलात्कारी-खुन्यांना वाचवण्यात यश न मिळाल्यामुळे शेवटी १४ वर्षांनंतर गुजरात शासनाने एका शासन निर्णयाचा फायदा देऊन शिक्षा माफ केली.  हे कायदेशीरदृष्टय़ा योग्य की अयोग्य, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात ठरेल. पण सामाजिक न्यायाच्या भावनेसाठी हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. न्याय मिळाला, तरी आजही बिल्किस बानो असुरक्षित आहे..अशा व्यक्तींना सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे.

– कुंजबिहारी रावत, भुसावळ

केजरीवाल यांच्या आरोपाची चौकशी होईल?

भाजपने देशभरातील राज्य सरकार पाडण्यासाठी तब्बल ६,३०० कोटी रुपयांचा खर्च केल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. विरोधी पक्षातील आमदार विकत घेऊन राज्यात सरकार अस्थिर करण्यासाठी हा पैसा वापरला जात आहे, असे त्यांचे म्हणणे. ते जर खरे असेल तर हा पैसा कुठला आहे? सत्ताधारी राजकारणासाठी जनतेचा पैसा वापरत आहेत का? सत्तेसाठी जनतेचा पैसा वापरणे ही कोणती लोकशाही? बंडखोरी ही पैशाशिवाय होऊच शकत नाही, असे आजचे चित्र आहे. देशातील तपास यंत्रणा या आरोपाची दखल घेऊन चौकशी करतील का?  या अशा सत्तांतरांवर न्यायलय नियंत्रण आणू शकेल का? गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारणात जे पडसाद उमटले त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा व्हायला हवी.

– विवेक तवटे, कळवा (ठाणे)

देवांना ‘नावे ठेवणारे’ भक्त!

‘सांगलीत चोर गणपतीचे आगमन’ ही बातमी (२९ ऑगस्ट) वाचली आणि गंमत वाटली. आपल्या देवाला चोर म्हणणारे भक्त अजबच. पण धांडोळा घेतला असता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी अजब नावे असल्याचे आढळले. पुण्यामध्ये असंख्य देवालये आहेत. त्यांचा आकार एखाद्या खोक्यापासून ते विशाल मंदिरांपर्यंत आहे. इतरत्र फारशी न आढळणारी गोष्ट म्हणजे इथल्या देवळांची विचित्र, गमतीशीर नावे. पुणेरी तिरकसपणाने देवांचीसुद्धा गय केलेली नाही. हल्ली जर नव्याने असे नाव दिले तर मोठय़ाच वादाचे प्रसंग उद्भवतील. पुरोगाम्यांनी असे काही केले, तर त्यांच्यावर हेच आस्तिक(?) तुटून पडतील.

खुन्या मुरलीधर, माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, चिमण्या गणपती, उंबऱ्या गणपती, निवडुंग्या विठोबा, दाढीवाला दत्त, उपाशी विठोबा, बायक्या विष्णू, भिकारदास मारुती, जिलब्या मारुती, डुल्या मारुती, सोन्या मारुती, बटाटय़ा मारुती, शकुनी मारुती, कसब्यातील गुंडाचा गणपती (हा खरोखरच एका गुंडाने बसवलाय म्हणे!) बुधवार पेठेत पासोडय़ा विठोबा, बिजवऱ्या विष्णू अशी अनेक अजब नावे आढळतात. पुण्यातला ‘पत्र्या मारुती’ नारायण पेठेत आहे. त्याच रस्त्यावरून खाली गेलो की ‘मोदी गणपती’ आहे. बाकी नावं ठेवणारे फक्त पुण्यातच नाहीत. बेळगावला ‘मिल्ट्री महादेव’, ‘बिस्किट महादेव’ पण आहे. वाईला ‘ढोल्या गणपती’ आहे. धुळय़ात ‘मिच्र्या मारुती’ अन् ‘भांग्या मारुती’ असे दोन मारुती आहेत.

– जगदीश काबरे, सांगली

आजच्या काळाचे प्रतिबिंब मंडपांत हवे

‘गणेशोत्सव ‘न्यू नॉर्मल’ करता येईल?’ हा डॉ. अजित कानिटकर यांचा लेख (रविवार विशेष- २८ ऑगस्ट) वाचला. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांच्या अन्यायाविरोधात लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रतेज निर्माण करण्यासाठी सन १८९२ ते १८९४ च्या सुमारास पुण्यात भाऊसाहेब रंगारी व लोकमान्य टिळक आदींनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा उद्देश बऱ्याच अंशी सफलही झाला.

मात्र स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे अविरतपणे सुरू असलेला सार्वजनिक गणेशोत्सव तोच असला तरी त्याचे संदर्भ बदलले आहेत. सध्या सत्ताधाऱ्यांनी जनतेचा अपेक्षाभंग केला आहे आणि विरोधक मात्र निष्क्रिय व अगतिक झाले आहेत. महागाई, इंधन दरवाढ, भ्रष्टाचार, सामाजिक व आर्थिक विषमता, बेरोजगारी, भांडवलशाहीकडे झुकणारी अर्थव्यवस्था, राज्यावर व केंद्रावर वाढलेले कर्ज, रुपयाचे अवमूल्यन, निर्गुतवणुकीच्या नावाखाली लोकोपयोगी सार्वजनिक उद्योगांचे व प्रकल्पांचे खासगीकरण, रस्त्यांची दुरवस्था, शिक्षणाचे बाजारीकरण, शहरातील वाढत्या बकाल वस्त्या, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वसामान्य जनतेवरील करांचा वाढता बोजा, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला जाणारा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, राजकारणातील घराणेशाही व एकाधिकारशाही यांसारख्या बाबींसंदर्भात प्रबोधन व जनमत तयार करण्याची भूमिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या देखाव्यातून व उपक्रमांतून मांडायला हवी.

 किंबहुना या सर्व बाबींचे प्रतिबिंब सध्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात पडायला हवे, तरच हा सार्वजनिक गणेशोत्सव कालसुसंगत ठरेल! अन्यथा तो हळदीकुंकू, वह्यावाटप, नवसाला पावणारा ‘राजा’, सेलिब्रेटींची उपस्थिती.. यांसारख्या संकुचित बाबींपुरता ठरेल आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा व्यापक उद्देशच आपसूक बाजूला पडेल!

– टिळक उमाजी खाडे, नागोठणे (ता. रोहा, जि. रायगड)