‘विश्वासामागील वास्तव’ हे संपादकीय (२६ जुलै) वाचले. एखाद्या गोष्टीची जाहिरात का करावी लागते? आपला माल इतरांच्या तुलनेत दर्जेदार नसेल तरच! घातक रसायनांचे प्रमाण जास्त आढळल्याने परदेशात भारताचे मसाले नाकारले गेले. लागलीच दिग्गज सेलिब्रिटींना घेऊन मसाल्यांच्या जाहिराती दूरदर्शनवर अधिक आक्रमकतेने झळकू लागल्या. सत्याला नाटकाची, कथानकाची गरज नसते, ती असत्याला असते. विरोधकांवर नेहमी ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविल्याचा आरोप केला जातो, मात्र भाजप जे म्हणेल तेच खरे आणि ब्रह्मवाक्य; विरोधकांनी काहीही म्हटले तरी ते खोटे कथानक, असा सोयीस्कर अर्थ भाजपने करून ठेवला आहे. हिंदू धर्मातील परंपरेचा एक भाग असलेले शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सरकारवर टीका केली असता या टीकेचाही सन्मान केला गेला नाही. भाजप ठरवेल तेच हिंदुत्व, तोच विकास, तेच देशप्रेम, तोच देशद्रोह, तेच फेक नॅरेटिव्ह; असे कसे चालेल? काय खरे आणि काय ‘फेक’ हे ओळखण्याएवढा विवेक मतदारांत अद्याप शिल्लक आहे, हेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, अयोध्या, बद्रीनाथमध्ये जनतेने दाखवून दिले.

● किशोर बाजीराव थोरातनाशिक

कारण शिंदे, पवारांचे परतीचे मार्ग बंद

विश्वासामागील वास्तव’ हा अग्रलेख (२६ जुलै) वाचला. केंद्रीय अर्थसंकल्पात डावे-उजवे करण्यात आले आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर निधीची खैरात करण्यात आली, महाराष्ट्र डावलला गेला. ही एनडीए सरकारची अपरिहार्यता होती. बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या आधारावर केंद्रातील एनडीए सरकार स्थापन झाले आणि टिकून आहे. त्यामुळे या राज्यांवर एनडीए सरकार मेहरबान आहे हे दिसून आले. महाराष्ट्रात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून फुटून आलेले नेते अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे परतीचे दोर केव्हाच कापले गेले आहेत. त्यामुळे ते ‘महायुती’ सरकार सोडून जाऊ शकत नाहीत, हे भाजपमधील वरिष्ठांना ठाऊक आहे. परिणामी ‘एनडीए’ सरकारच्या स्थिरतेला त्यांच्यामुळे धोका नाही. त्यामुळेच अर्थसंकल्पात महाराष्ट्राला उपेक्षित ठेवण्यात आले. या नाराजीचे प्रतिबिंब राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत उमटून महाविकास आघाडी जिंकण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही.

● डॉ. वि. हे. इनामदारपुणे

आयते कोलीत दिले तर वापरणारच!

विश्वासामागील वास्तव’ हा अग्रलेख (२६ जुलै) वाचला. मुळात विरोधकांना काही नॅरेटिव्ह सेट करण्याची गरजच पडत नाही. नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पासारखे आयते कोलीत विरोधकांच्या हाती देणे आणि त्याचा सत्ताधाऱ्यांविरोधात वापर होणार नाही, याची शाश्वती बाळगणे यात ‘राजकीय शहाणपणा’चा अभाव स्पष्ट दिसतो. वाचाळवीरांना अभय देऊन वाटेल ते बोलू द्यायचे, व्यक्तिगत टीका करायची, महापुरुषांचा अपमान करायचा, घटना बदलण्यासाठी चारसो पारचा नारा दिल्याचे जाहीर वक्तव्य करायचे आणि नंतर फेक नॅरेटिव्ह म्हणून गळे काढायचे, याला काही अर्थ नाही. वरील मुद्दे विरोधकांनी ‘सेट’ केले नव्हते. ते आले सत्ताधाऱ्यांच्या धोरणातून! त्याचा वापर विरोधकांनी अचूक केला.

लोकसभा निवडणुकांच्या निकालातून धडा घेऊन सत्ताधाऱ्यांनी किमान ज्या राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे त्यांचा तरी विचार अर्थसंकल्पात करण्याची आणि तो मांडण्याची आवश्यकता होती. पण साक्षात परमेश्वराचा वावर ज्या पक्षात आहे त्या पक्षाला धडा वगैरे घेण्याची गरज भासत नसावी. महाराष्ट्र कधीच इतर कोणत्याही राज्याच्या विकासाविरोधात जाणार नाही! पण घेताना ओरबाडून घ्यायचे आणि द्यायची वेळ आल्यावर हात आखडता घ्यायचा हे पटण्यासारखे नाही. महाराष्ट्राच्या पदरी नेहमी निराशाच आली आहे.

● ऋत्विज चिलवंत, धाराशिव

टोळ्यांविरुद्ध लढा देणारे धर्मगुरू

पर्यावरणप्रेमी फादर’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. संकटकाळी मानवाला धीर देणारे धर्मगुरू म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. वसईमध्ये ज्यावेळी भूखंड बळकावणाऱ्या टोळ्या तयार झाल्या, तेव्हा त्यांच्याविरुद्ध जनमत जागृत करून त्यांनी जो लढा दिला, तो सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. २६ जानेवारी १९९३ रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली काढलेला मोर्चा हा इतिहासात नमूद करण्यासारखा होता. त्यांनी टँकर लॉबी विरुद्ध लढा देऊन सामान्य माणसाला मदत केली. ठाकूर टोळीची दहशत असताना त्यांनी शांततापूर्ण मार्गाने दिलेला लढाही उल्लेखनीय होता. त्यांनी धर्मप्रसारासाठी मराठीतून पुस्तके लिहिली आणि मराठी भाषा समृद्ध केली. इतर धर्मांच्या धर्मगुरूंसाठी आदर्श निर्माण केला.

● युगानंद गुलाबराव साळवेपुणे

तरुणांना लिहिते करणारे संपादक

पर्यावरणप्रेमी फादर’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. विरारजवळील नंदाखाल या निसर्गरम्य भागातील जेलादि या गावात साध्या शेतकरी कुटुंबात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर ते कॅथॉलिक धर्मगुरू होण्यासाठी गोरेगावमधील सेमिनारीत दाखल झाले. २३ डिसेंबर १९७२ रोजी त्यांना धर्मगुरुपदाची शपथ देण्यात आली. त्यांनी युरोपात धार्मिक शिक्षण घेतले. मराठी भाषेत प्रावीण्य मिळवत अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी दीर्घकाळ वसईतील प्रसिद्ध कॅथॉलिक मासिक ‘सुवार्ता’चे संपादक म्हणून काम केले. या मासिकाला त्यांनी राज्यात ओळख मिळवून दिली. वसईतील कॅथॉलिक समाजातील अनेक तरुण- तरुणींना लिहिते केले. त्यांच्या संपादकीय काळात वार्षिक वाचक मेळावे भरू लागले. त्या माध्यमातून नामवंत मराठी लेखक वसईत पोहोचले. हरित वसई चळवळ राबविली. वसई पश्चिमेकडील ग्रामीण भाग आजही मोठ्या प्रमाणात वृक्ष- वेलींनी बहरलेला आहे, त्याचे प्रमुख कारण हरित वसईचा लढा आहे.

● मार्कुस डाबरेवसई

पावसाची दोन्ही रूपे चिंता वाढविणारी

पश्चिम महाराष्ट्रात पूरवार’ तर ‘उत्तर महाराष्ट्रात टँकर राज कायम’ ही वृत्ते (लोकसत्ता २६ जुलै) वाचली. पुण्यात विक्रमी पाऊस होऊन अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात नद्या पात्राबाहेर जाऊन दुथडी भरून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, कोकणात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे, मात्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा कोरडाच असून उत्तर महाराष्ट्रात तर ७४९ गावे आणि वाड्यांना आजही २२४ टँकरमधून पाणी पुरवावे लागत आहे हे वाचून निसर्गाच्या लहरीपणाचीच प्रचीती आली! कुठे नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरायला लावणारी अतिवृष्टी तर कुठे पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करायला लावणारे, घशाला कोरड पाडणारे भयंकर अवर्षण, सारेच चिंता वाढविणारे आहे. पावसाळा नेमेची आला खरा परंतु मध्येच काहीशी ओढ दिल्याने चिंता निर्माण झाली होती. तथापि त्याची अतिवृष्टी आणि अवर्षण ही दोन्ही रूपे मनात काळजीचे ढग निर्माण करणारी आहेत.

● श्रीकांत मा. जाधवअतीत (सातारा)

वर्षभराचे पाणी साठविण्याची हीच संधी

सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस कोसळतो आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कित्येकांना पुराचा फटका बसला आहे. दरवर्षी कमी-अधिक तीव्रतेने हीच परिस्थिती उद्भवते. म्हणजे राज्याच्या अनेक भागांत पुरेशा प्रमाणात पाऊस पडतो, मात्र मोसमी पाऊस आपला निरोप घेतो ना घेतो तोच पाण्याची टंचाई भेडसावू लागते. शहरांना याची फारशी झळ पोहोचत नाही, मात्र खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्यांची पाण्यासाठी ससेहोलपट सुरू होते. ही विसंगती उद्भवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जलसाक्षरतेचा अभाव आणि जलनियोजनाविषयीची सर्वस्तरीय अनास्था. पावसाळयात धो- धो कोसळणारे पाणी ठिकठिकाणी बांध घालून आडवावे असे फार कमी जणांना वाटते. पाणी जाणीवपूर्वक अडवावे लागेल, जमिनीत जिरवावे लागेल. तरच भूजलाच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल. जमिनीतील अंतर्गत प्रवाह जोडले जाऊन आड, विहिरी, तळी, पाझर तलाव यांच्या जलसंचयातही वाढ होईल. जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होईल. लक्षात कोण घेतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● अशोक आफळेकोल्हापूर