‘नव्या देशाचा जन्म?’ हा अग्रलेख (६ फेब्रुवारी) वाचला. वर्षअखेपर्यंत जर पॅलेस्टाइन हा नवा देश तयार होत असेल तर पश्चिम आशियातील जे वाद आहेत ते तात्पुरते थांबण्याची चिन्हे दिसतात. कारण या भागात कायमच बंडखोरांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. मुस्लीम ब्रदरहुड, हूथी, हमास, हेजबोल्ला, आयसिस यासारखे विशिष्ट विचारसरणीचे दहशतवादी गट येथूनच जगभरात अशांतता निर्माण करण्यासाठी पाठविले जातात.

वास्तविक हा प्रदेश अशांत राहण्यामागची कारणे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील साम्राज्यशाहीच्या विस्तारात आढळतात. १९४५ पर्यंत जो देश अस्तित्वात नव्हता त्याला मित्र राष्ट्रांनी मान्यता देऊन मोठे केले. आता त्याच्या शेजारी पॅलेस्टाइन हा नवीन देश तयार होत असेल, तर वरकरणी ही स्वागतार्ह बाब आहे, परंतु ही नव्या अशांततेची नांदीही ठरू शकते, कारण या क्षेत्रात कोणत्याही देशाला इस्रायलचे अस्तित्व मान्य नाही. इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांत यावर्षी निवडणुका असल्याने निवडून येण्यासाठी राष्ट्रभक्ती, आक्रमकता, देशहित इत्यादी पराक्रम दाखवावे लागतील. ते या देशातील नेते दाखवत आहेतच, मात्र दीर्घकालीन परिणाम पाहिल्यास हा भाग कायम अशांतच राहणार आहे.  दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारे काही मोजक्याच देशांनी जगाची पुनस्र्थापना केल्याचे दिसते, मात्र हे करताना स्वत:च्या राष्ट्रहितास प्राधान्य देऊन बाकीचे आपापसात कसे लढत राहतील, याकडेच लक्ष देण्यात आले. त्यामुळे आजही दक्षिण कोरिया-उत्तर कोरिया, भारत-पाकिस्तान-बांगलादेश, इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये अशांतता राहिलेली आहे. -सुदर्शन गुलाबचंद मिहद्रकर, अक्कलकोट रोड (सोलापूर)

हा पॅलेस्टिनींसाठी मानसिक आधार

‘नव्या देशाचा जन्म?’ हा अग्रलेख वाचला. निमित्त निवडणुकीचे असो की आणखी काही, पण अमेरिका व इंग्लंडच्या सत्ताधाऱ्यांना शांततेची आवश्यकता वाटली हेही नसे थोडके. शेवटी या वाटण्यातून काही चांगले घडत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. चहुबाजूंनी शत्रूंनी वेढलेल्या प्रदेशात इस्रायलने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले पण ते करताना कित्येकांचे प्राण गेले. पॅलेस्टिनींची शोकांतिका ही की, आपल्याच भूमीवर आपल्यालाच राहायला मिळावे यासाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनच्या भूमिकेमुळे- आपलाही विचार कोणीतरी केला- ही फक्त भावना पॅलेस्टिनींत निर्माण होऊ शकेल. वर्षांनुवर्ष निर्वासितांसारखे जीवन जगलेल्या व स्थलांतर करून थकलेल्या पॅलेस्टिनींना हीच भावना मानसिकदृष्टय़ा भक्कम करेल. दोस्त राष्ट्रे या मुद्दय़ावर सहानुभूतिपूर्वक आणि कालानुरूप विचार करत असतील तर त्यातून आखातात स्थैर्य येण्यास मदत होईल. याचा फायदा अमेरिका व ब्रिटनला राजकीय दृष्टिकोनातून होणार असला तरी वैश्विक शांततेच्या चष्म्यातून पाहिल्यास याचे महत्त्व लक्षात येईल. शिवाय या निर्णयाला भारतासह अनेक देश पाठिंबा देतील. -संकेत रामराव पांडे, असर्जन (नांदेड)

‘भविष्याची मुहूर्तमेढ’ नव्हे गरिबांची दिशाभूल

पहिली बाजू सदरातील भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ‘अर्थसंकल्पातून भविष्याची मुहूर्तमेढ’ हा लेख (६ फेब्रुवारी) वाचला. वरिष्ठांचे आणि सरकारचे गोडवे गाण्यात काहींना धन्यता वाटत असते. प्रथेप्रमाणे दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यात दरवेळी गरिबांच्या कल्याणासाठी हजारो कोटींची तरतूद होत असतेच. या तरतुदींमधील प्रत्यक्षात किती योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहचतो, हा एक संशोधनाचा विषय आहे. अर्थसंकल्पात गरिबांच्या कल्याणासाठी दरवर्षी हजारो कोटींची तरतूद होत असेल तर ‘गरीब’ हा शब्दच समाजातून नाहीसा व्हायला हवा. किमान गरिबीची तीव्रता तरी कमी व्हायला हवी, मात्र तसे घडताना दिसत  नाही. कागदावरचे हे आकडे कागदावरच पडून राहतात का? आजही शहरी आणि ग्रामीण भागांतील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक कुटुंबे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याची वाट पहात असतात. केंद्राच्या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ किती कुटुंबांनी घेतला? आणि या योजनेतील गॅस सिलिंडर प्रत्यक्षात किती कुटुंबे घेतात? याची आकडेवारीदेखील समोर येणे अपेक्षित आहे. भविष्याची मुहूर्तमेढ म्हणून संबोधण्यात येणाऱ्या अशा अर्थसंकल्पांतून गरिबांच्या कल्याणापेक्षा त्यांची दिशाभूलच अधिक होत आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल.   -संदीप जाधव, महाड 

हे जनतेला आळशी बनवणे नाही काय?

‘नेहरूंनी देशाला आळशी ठरवले!’ ही बातमी (लोकसत्ता- ६ फेब्रुवारी) वाचली. नेहरूंना जाऊन ६० वर्षे होत आली. तरी आजही त्यांचे नाव घेतल्याशिवाय मोदींचे एकही भाषण पूर्ण होत नाही. नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीत तब्बल दहा वर्षे तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला विज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानाची दिशा दाखविली. अनेक शासकीय, प्रशासकीय व औद्योगिक संस्था उभारल्या. शून्यातून या देशाची उभारणी केली, म्हणूनच जग त्यांना ‘नवभारताचे शिल्पकार’ म्हणून ओळखते. ‘आराम हराम है!’ असा संदेश भारतीयांना दिला. त्यांनी घातलेल्या पायामुळेच आज १०४ कृत्रिम उप्रग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रम फक्त भारताच्या नावे आहे. नेहरूंमुळेच देशाला अल्पावधीत आंतरराष्ट्रीय राजकारणात मानाचे स्थान प्राप्त झाले. अशा नेहरूंनी देशाला आळशी ठरवले हा दावा स्वीकारणे शक्य नाही.

याउलट नेहरूंनी निर्माण केलेले अनेक सार्वजनिक उद्योग, औद्योगिक संस्था बंद करून किंवा त्यांचे खासगीकरण करून रोजगाराची सर्व साधने, संधी गेल्या दशकभरात नष्ट केल्या गेल्या. त्यामुळे बेरोजगारीचा गेल्या ४५ वर्षांतील उच्चांक आज निर्माण झाला आहे. ८० कोटी बेरोजगार जनतेला दरमहा ५ किलो मोफत धान्य देण्याची ‘मोदींची गॅरंटी’ ही रोजगार हमी नव्हे तर ‘बेरोजगार हमी योजना’च आहे. जनतेला आळशी बनवण्याचे याच सरकारचे हे उद्योग नाहीत काय? या युवाशक्तीचा देशाच्या विकासासाठी विधायक उपयोग करून घेतला नाही तर त्यांचे बेरोजगार हात देशासाठी विघातक ठरतील याची जाणीव सत्ताधीशांना आहे काय? -राजेंद्र फेगडे, नाशिक

यातून धर्माधांना व्यासपीठ मिळेल

‘रामायणाचे महाभारत’ हा ‘अन्वयार्थ’ आणि श्रद्धा कुंभोजकर यांचा ‘चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर..’ हा लेख (६ फेब्रुवारी) वाचला. लोकशाहीत लोकांच्या धार्मिक भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकत्र प्रवास करत नाहीत. अनेक धर्मातील लोकांच्या भावना या त्यांच्या धर्माशी संबंधित प्रतीके, कर्मकांड आणि मुद्दय़ांवर दुखावत असतात. काही दशकांपूर्वीपर्यंत असे अनेक विनोद चित्रपटांमध्ये दाखवण्यात येत होते. काही चित्रपटांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिरेखेची वेशभूषा केलेला अभिनेता शौचालयातून बाहेर पडताना, धूम्रपान करताना दिसत असे. रामायण आणि महाभारतातील पात्रांबद्दल शेकडो विनोद केले गेले पण तेव्हा कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाही. पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, आता लोकांच्या धार्मिक भावना अतिशय नाजूक झाल्या आहेत.

भारतात हिंदू धर्माचे असंख्य पंथ आहेत आणि प्रत्येक पंथाच्या लोकप्रिय कथाही अनेक प्रकारच्या आहेत. हिंदूंमध्येही काही ठिकाणी रामचरितमानसाच्या संदर्भात तर काही ठिकाणी इतर कथांबाबत मतभेद आहेत.  तुलसीदास आणि त्यांचे रामचरितमानस या संदर्भात बिहारपासून तामिळनाडूपर्यंत अनेक प्रकारचे वाद आहेत. इतकेच नव्हे तर हिंदू धर्माशी निगडित सनातन संस्कृतीबद्दल हिंदूंच्या एका वर्गाची श्रद्धा किंवा मान्यता आहे, पण हिंदूंचे इतर अनेक वर्ग त्यांच्याशी सहमत नाहीत. भारतीयांच्या धार्मिक भावना अलीकडे विस्फोटकांच्या ढिगाऱ्यावरच बसलेल्या असतात. अशा परिस्थितीत कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली धार्मिक विषयांना हात न लावणे शहाणपणाचे ठरेल. आज धर्मावर गंभीर आणि प्रामाणिक लिखाणही एक ओझं ठरत आहे, अशा परिस्थितीत धर्माविषयी विनोद केल्याने मोठय़ा प्रमाणात तणाव निर्माण होतो. अनेक राज्यांमध्ये विविध खटल्यांना सामोरे जावे लागते. आज कलेच्या स्वातंत्र्याचा दावा करण्याची वेळ नाही. धर्माची गंभीर व्याख्या आणि विश्लेषण करायचे असेल, तर धोक्याचा सामना करूनच केले जाऊ शकते.

१०-२० वर्षांपूर्वीपर्यंत धार्मिक पात्रांवर आधारित विनोद आणि व्यंगचित्रांवरून फारसे वाद होत नसत, पण आता तशी परिस्थिती राहलेली नाही. धर्मावर भाष्य करणाऱ्या कलाकृतींमुळे केवळ धर्माधतेला व्यासपीठापर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही, तर सांप्रदायिकतेलाही खतपाणी घालण्याची संधी मिळण्याचा धोका निर्माण होतो. -तुषार अशोक रहाटगावकर, डोंबिवली