‘राज्यातील बियाणे उत्पादकांचे तेलंगण, आंध्र प्रदेशात स्थलांतर’ (लोकसत्ता- १५ मे) ही बातमी वाचली. महाराष्ट्रात बियाणांचा पुरवठा तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश तर ज्वारी बाजरीच्या बियाणांचा पुरवठा निजामाबाद व आरमूर या विभागातून येतो. याला कारण महाराष्ट्रापेक्षा दक्षिणेकडील राज्ये अधिक सोयी सवलती देत आहेत. त्यामुळे व्यापारी तेथील राज्यांना जास्त पसंती देतात. तेलंगणा व आंध्र प्रदेशात जागेपासून अनेक सवलती सरकार देते. जालना ही बियाणाची राजधानी ही कल्पना आता बदलत चालली असून हैदराबाद हे बियाणांचे केंद्र होत आहे. एकेकाळी महाराष्ट्र बियाणांचे आगर होते. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जालना येथील बियाणे उद्योगासाठी १०० कोटींच्या तरतुदीची घोषणा करण्यात आली होती. बियाणे हब ही संकल्पना मांडण्यात आली होती, पण ही संकल्पना केवळ कागदावरच राहिल्याचे दिसते. बियाणे उद्योग महाराष्ट्राबाहेर का जात आहे, याचा सखोल अभ्यास करून त्यावर योग्य ती उपाययोजना करावयास हवी. बियाणांचे माहेरघर ही महाराष्ट्राची ओळख पूर्ववत व्हायला हवी.

  • शांताराम वाघ, पुणे

पुन्हा तीच चूक, पुन्हा तेच फळ!

कर्नाटक निवडणूक निकालाचे अर्थ-अन्वयार्थ अनेकजण आपापल्या परीने काढताहेत. पुढील आणखी काही दिवस हे असेच चालू राहील. मात्र, स्वत:स सर्वसत्ताधीश समजणाऱ्या आपल्या आत्ममग्न लोकप्रिय पंतप्रधानांनी, त्यांच्या कंपूने आणि त्यांच्या अवतीभवतीच्या भाटांनी या निकालातून योग्य तो धडा घेतला असेलच असे समजण्याचे काही कारण किंवा तशी काही चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. तसे काही असते तर त्यांनी जनतेसमोर येऊन मोठय़ा मनाने त्यांचा पराजय स्वीकारला असता आणि काल-परवापर्यंत या निवडणुकीत फारसे अस्तित्व नसलेल्या पक्षाध्यक्षांची छबी अचानकपणे प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागली नसती. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यावर कोणत्या पातळीवर जाऊन टीका करायची याचे किमान तारतम्य तरी बाळगले जावे. आणि, ते न बाळगल्यास त्याचे होणारे परिणाम कसे असतात ते पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाने दाखवून देऊनही पुन: तीच चूक भाजपचे प्रमुख प्रचारक आणि त्यांच्या कंपूने केली. त्याचेही फळ त्यांना पुन्हा तेच मिळाले.

राज ठाकरे आता भाजपसाठी ‘दुसरे’?

भाजपच्या प्रचार, पराभवाची कारणे यावर अनेकांनी आपापली मते मांडली पण पराभवानंतर भाजपची उफाळून आलेली वृत्ती अचंबित करणारी आहे. कालपर्यंत भाजपच्या बगलेत असलेले राज ठाकरे यांनी भाजपला जरासा आरसा काय दाखवला, सारे भाजपाई त्यांच्यावर तुटून पडले. राजजींच्या घरी जाऊन भोजन करणारे, रात्री-अपरात्री त्यांना भेटीची वेळ देणारे उपमुख्यमंत्री फडणवीसही ‘दुसऱ्यांनी आमच्या पराभवाचे विश्लेषण करू नये’ असे राज यांना सुनावते झाले. कालपर्यंत भाजपच्या मर्जीप्रमाणे भाषणे देणाऱ्यांना भाजपने एकदम ‘दुसरे’ करून टाकले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी ‘‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो.. त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही महत्त्व देत नाही’’ असे म्हणणे राजकीय शिष्टाचाराला साजेसे नाही.

  • अ‍ॅड. एम. आर. सबनीस. अंधेरी पूर्व (मुंबई)

भाजपच्या सहकार्याशिवाय वचन कसे पाळणार?

‘भाजपच्या वर्तनामुळे कर्नाटकमध्ये पराभव!’ ही बातमी (लोकसत्ता- १५ मे) वाचली. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सत्तेवर बसविण्याचे वचन दिले आहे. ते भाजपच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणे अशक्य!  शिवाय आघाडीत स्वागत होण्याचीही शक्यता शून्य! अशा परिस्थितीत भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी वक्तव्ये करून वातावरण बिघडविणे योग्य नाही!

  • अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे

लोकसभेच्या जागा भाजपकडे..

हेच कानडी मतदार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसलाच मतदान करतील हे गृहीत धरणे हा अति आत्मविश्वास घातक ठरेल. याचे उत्तम उदाहरण दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांपैकी ६२ जागा आम आदमी पक्षाच्या आहेत परंतु लोकसभेच्या सातही जागा भाजपकडे आहेत.

  • महारुद्र आडकर, पुणे

..तर- आणि तरच!

कर्नाटकचे मतदार २०२४ सालीही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या मागे उभे ‘राहतील’ हे जसे सांगता येत नाही, तसेच उभे ‘राहणारच नाहीत’ असेही तूर्त म्हणता येत नाही. सामान्य मतदारांच्या मूलभूत गरजा नक्की काय आहेत हे जाणून त्या भागवल्या, काँग्रेसने तशी अंमलबजावणी वर्षभरात जर राज्यकारभार करताना केली,तर – आणि तरच-  २०२४ सालीसुद्धा हेच मतदार ते काँग्रेसच्या पाठीशी राहतील.

  • बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)

नेत्यांचे समर्थन हवेच कशाला?

‘नाटय़ परिषद अध्यक्ष निवडणुकीत गुवाहाटी पॅटर्न?’ हे वृत्त (लोकसत्ता- १४ मे) वाचले. अलीकडे हे नवीन अस्त्र राजकीय नेत्यांना उपलब्ध झाले आहे. प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले हे दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांना राजकीय नेत्यांचे समर्थन हवेच कशाला? प्रसाद कांबळी यांनी सामंजस्य दाखवत या निवडणुकीतून स्वेच्छेने माघार घेण्याचा सुज्ञपणा दाखवावा. रंगदेवतेच्या मंदिरात आणि रंगभूमीच्या प्रांगणात हे राजकीय द्वंद्व अनाकलनीय आहे. याचे पडसाद येत्या काळात उमटतीलच.

  • अरविंद बेलवलकर, अंधेरी

नगररचना विभागास वृक्ष अनावश्यक वाटतात?

‘पहिल्या मजल्यावरील मनोरंजन मैदानांना उच्च न्यायालयाचा नकार’ हे वृत्त (लोकसत्ता- १३ मे) वाचले. गेल्या कित्येक वर्षांपासून नगररचना विभाग केवळ विकासकांच्या प्रभावाखाली काम करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ‘युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन फॉर महाराष्ट्रा स्टेट’ ही विकास नियंत्रण नियमावली अलीकडेच तयार केली. ती शहरांच्या विकासाऐवजी विकासकांच्या विकासासाठी केली आहे. खोपोली, कर्जत, पालघरसारख्या शहरांत मोठय़ा प्रमाणात एफएसआय, टीडीआर वापरास परवानगी देऊन मुक्तहस्ते बहुमजली इमारती उभ्या करण्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रासाठी ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९’ अस्तित्वात आहे. त्यातील ६३ आणि ६६अन्वये मोकळी मैदाने, उद्याने क्रीडांगणे व मनोरंजनाच्या जागा उपलब्ध करून देणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.  ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा’तील तरतुदीनुसार शेत जमिनीची बिगरशेती परवानगी घेताना नकाशा तयार करण्यात येतो. भूखंड, मोकळय़ा जागा, उद्याने, मनोरंजनाच्या जागा सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात येतात. अशा मोकळय़ा जमिनी, मैदाने मंजूर नकाशात दाखविण्यात येतात.  आजवर मनोरंजन मैदाने जमिनीवर दाखविण्यात येत होती. ती इमारतीवर उभारून झाडे जमिनीत कशी रुजणार? पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर पोडियमवर मोकळय़ा जागेत मैदानाची परवानगी देणाऱ्या नगररचना विभागाला प्राणवायूसाठी अपरिहार्य असलेले वृक्ष अनावश्यक वाटतात? नवीन विकास नियंत्रण नियमावली लोकांच्या हितासाठी तयार केली की विकासकांच्या हितासाठी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • कल्याण केळकर, महापालिका आयुक्त (सेवानिवृत्त)

नेहरू आणि वाजपेयी सामंजस्याचे प्रतीक

‘वाजपेयी म्हणे  नेहरूवादी!’  ही बुकबातमी (१३ मे) वाचली. वाजपेयी हे प्रारंभी जनसंघातील आणि नंतरच्या भारतीय जनता पक्षातील एक सर्वसमावेशक व्यक्तित्व होते. २९ भिन्न विचारसरणींच्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी पाच वर्षे सरकार चालविले, ही एकच गोष्ट त्यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी वाजपेयींनी संसदेत प्रवेश केला. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने आणि अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीमुळे नेहरू प्रभावित झाले होते, तेवढा मोकळेपणा आणि मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. बहुतेक विरोधी पक्षनेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. वाजपेयींविषयी त्यांनी काढलेले उद्गार बोलके आहेत- ‘‘ये जवान सांसद मुझे बहोत बार परेशानीमे डालता है, लेकीन ईसमे स्पार्क है.’’ त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मतभेद होते, पण मनभेद नव्हते. पंडितजी विरोधकांच्या मतांचा नेहमीच आदर करत. नाथ पै, मधू लिमये, डॉ. लोहिया संसदेत एखाद्या विषयावर बोलणार असतील तर पंडितजी आवर्जुन उपस्थित राहात. इतकेच नव्हे तर त्यांच्या भाषणातील मुद्दे ते आपल्या रोजनिशीत लिहून घेत. एखादा महत्त्वाचा परदेशी पाहुणा भारतभेटीवर आल्यास ते त्याचा परिचय प्रथम विरोधीपक्ष नेत्यांशी करून देत आणि नंतर  मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी. दोन्ही नेते मवाळ आणि समंजस होते.