‘मठोमठीचे मंबाजी!’ हा अग्रलेख वाचला. सत्तारूपी विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी देशात अनेक पक्षसंप्रदाय निर्माण झाले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मठ स्थापन झाले आहेत. मात्र सदैव फ्लेक्स-बॅनरवर झळकणाऱ्या या सत्तेच्या वारकऱ्यांना सर्वाभूती परमेश्वर दिसत असल्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षसंप्रदायाचे किंवा मठाचे वावडे नाही. एकीकडे सत्तारूपी विठ्ठलाच्या ओढीने मठामठातील भेद संपुष्टात येत आहेत तर दुसरीकडे विठ्ठलाची रूपे नानाविध असल्याने प्रस्थापित विठ्ठलाच्या जागी नवनवे विठ्ठल जन्माला येत आहेत आणि तरीही ‘एक मठ, एक विठ्ठल’ या ध्येयाकडे देशाची वाटचाल जोमाने सुरू आहे. या प्रसन्न वातावरणामुळे अवघ्या राजकारणाची पंढरी झाली आहे.
या पंढरीत वाट चुकलेल्यांना ‘योग्य’ तो रास्ता दाखविण्यासाठी ईडी-सीबीआयसारखे स्वयंसेवक तत्पर असतात. या वाटेवर वारकऱ्यांतील अहंकार गळून पडतो. एरवी आक्रमक असलेले गायींप्रमाणे नम्र होतात. त्यातच, एका विशिष्ट मठाच्या शेजारून वाहणाऱ्या चंद्रभागेत डुबकी मारल्याने वारकऱ्यांची सर्व पापे दूर होतात. कालचे भ्रष्ट आजचे पवित्र-पावन वारकरी होतात. लक्ष्मी-विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना शांत झोपही लागते. त्यामुळे या मठात खूप गर्दी झाली आहे. मठात रोज येणाऱ्या नवनवीन वारकऱ्यांमुळे मूळचे वारकरी थोडेसे अस्वस्थ आहेत, पण मठाच्या वाढत्या सामर्थ्यांमुळे त्यांनीही आपले मनोबल वाढविण्यावर भर दिला आहे. विठ्ठलनामाच्या या अखंड गजरात वारकऱ्यांनी गृहीत धरलेला मतदाररूपी खराखुरा विठ्ठल मात्र उपेक्षित राहिला आहे.
- हेमंत सदानंद पाटील, नाळे (नालासोपारा)
नेत्यांना नैतिक संहिता का लागू करू नये?
‘मठोमठीचे मंबाजी!’ हे संपादकीय वाचले. सध्याचे राजकीय नाटय़ पाहता लक्षात घेण्याची बाब अशी, की राजकीय नेते ज्या सहजतेने पक्ष बदलतात, तेवढय़ा सहजतेने नाटकात पात्रदेखील बदलली जात नाहीत. त्यांना ना कुठल्या कार्यकर्त्यांची चिंता ना मतदारांची. सत्तालोलुप नेत्यांना आता तरी नैतिक संहिता लागू करणे गरजेचे आहे. पक्षांतरबंदी कायदा पुरेसा प्रभावी नाही. एक जिल्हा, एक तालुका नव्या अधिकाऱ्याला देताना आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. त्यांना नैतिक संहिता लागू असते मग नेत्यांच्या हाती जेव्हा सत्ता सुपूर्द केली जाते, तेव्हा त्यांना नैतिक संहिता का लागू करू नये?
- सूरज बाळकृष्ण तलमले, कोलारी (चंद्रपूर)
यांच्यापेक्षा राज ठाकरे बरे
सध्याच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे वेगळेपण अधोरेखित होते. शिवसेनेतील मतभेद मनभेदापर्यंत ताणले गेले. निवडणुकीत भाषणबाजीपुरता आपला वापर होत आहे, हे राज यांना जाणवले आणि ते मातोश्रीतून बाहेर पडले. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. पहिली सभा पाडव्याला शिवाजी पार्कवर घेतली, पण त्यांनी आपल्या काकांना निवृत्त व्हा, म्हणून सांगितले नाही. शिवसेना पक्ष, चिन्ह, झेंडा, शाखा यापैकी कशावरही दावा केला नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘माझ्या फोटोशिवाय चालत नाही काय?’ अशी नाराजी व्यक्त करताच राज यांनी आपल्या पक्षाच्या बॅनरवरून बाळासाहेबांचे छायाचित्रही हटविले. पुढची मनसेची वाटचाल पक्ष आणि पक्षप्रमुखांच्या कुवतीनुसार सुरू आहे, मात्र आजही तो पक्ष स्वबळावर टिकून आहे. ‘तुम्ही माझी दखल घेतली नाहीत तरी चालेल, पण तुम्ही मला टाळू शकणार नाही,’ या धर्तीवर मनसेचे इंजिन धावत आहे.
- अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई)
पवार यांचे संयत वर्तन प्रभावी
‘मठोमठीचे मंबाजी!’ हा अग्रलेख वाचला. अजित पवारांना अनुल्लेखाने मारून त्यांचे राजकीय वजन वाढता कामा नये, याची पुरेपूर काळजी शरद पवार यांनी घेतली. ज्या विकासाची आणि ज्यांच्या सोबत राहून विकास साधण्याचे स्वप्न अजित पवार पाहत आहेत, त्या विकासाच्या वाटेने जाण्यासाठी धर्माची गरज भासणार आहे. राजकारणात धर्माची गरज भासणे हे अविकसिततेचे लक्षण. शरद पवारांचे मलूल वाटणारे भाषण आणि पक्षफुटीनंतरचे त्यांचे संयत वर्तन, आरोपांच्या फैरींपेक्षा अधिक परिणामकारक ठरते.
- परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)
तेव्हा बडव्यांचा अडथळा आला नाही?
‘मठोमठीचे मंबाजी!’ हा अग्रलेख वाचला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजवर अनेकदा सत्तेत आला. आजवर अजित पवार, प्रफुल पटेल, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ आदी नेते शरद पवार यांचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांना मंत्रीपदे नाही तरी गेलाबाजार साखर कारखान्याचे अध्यक्षपद, महामंडळाचे अध्यक्षपद तरी मिळत राहिले. ही मंडळी असुंतष्ट असण्याचे काहीच कारण नव्हते! त्यावेळी बडव्यांचा अडथळा आला नाही का? सगळे एकाच वेळी असंतुष्ट कसे काय होऊ शकतात? बडवे आणि वय वगैरे कारणे झूठ आहेत, अजित पवार यांची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे!
- अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</li>
आर्थिक नाकेबंदीने नागरिकांचा छळ
‘आर्थिक नाकेबंदीचा खटाटोप’ हा अन्वयार्थ (७ जुलै) वाचला. त्यामध्ये साडेचौदा हजार बिगर सरकारी संस्थांना परदेशी मदत मिळविण्यावर बंदी घातल्याचा उल्लेख आहे. ज्यांना सरकारी मदत मिळत नाही, अशा गोरगरीब भारतीयांचा हा छळच म्हणावा लागेल. एवढेच नव्हे तर यामुळे भारताच्या गंगाजळीत परदेशी निधीची कमतरतादेखील भासू शकते. त्यामुळे धर्माचा अभिमान जरूर बाळगा. परंतु देश चालविणे म्हणजे सर्व घटकांना मदत देणे. एवढेच नव्हे तर परदेशी गंगाजळीची काळजीही घ्यावी लागते. राज्यकारभार एखाद्या धर्माचा अट्टहास धरून चालवता येईल असे वाटत नाही. त्यामुळे जगात आपली आर्थिक पत घसरेल, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. देशात सत्ता मिळणे वेगळे आणि देश चालविणे वेगळे. देश चालविताना संकुचित असणे घातक ठरते. परदेशी चलनाचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.
- युगानंद गुलाबराव साळवे, पुणे
राजकारणी हे स्वामीजी स्वीकारणार नाहीत
‘असे स्वामीजी स्वीकारणार का?’ हा लेख वाचला. त्यांचे विचार आणि त्या संदर्भातील इतिहास जाणून घेणे सद्य:स्थितीच्या आकलनासाठी महत्त्वाचे आहे. सध्या रस्त्यांची, शहरांची नावे बदलण्याचा जो घाट घातला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर स्वामीजींचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. पण असे सर्वसमावेशक स्वामी न स्वीकारता केवळ हिंदू धर्माभिमानी स्वामी स्वीकारले जातात आणि जनतेलाही स्वीकारणे भाग पाडले जाते. धर्माधर्मात द्वेष पसरवणारे संकुचित राजकारण केले जाते. व्यापक, सर्वसमावेशक स्वामीजी शूद्र, संकुचित राजकारणी कधीही स्वीकारणार नाहीत.
- विवेक गुणवंतराव चव्हाण, शहापूर (ठाणे)
हातोहात उचलले गेलेले आदर्श
‘असे स्वामीजी स्वीकारणार का?’ हा ‘देश-काल’ सदरातील लेख (७ जुलै) वाचला. बऱ्याच काळापासून विवेकानंद हे हिंदूत्ववाद्यांचे आवडते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आश्रम आणि संघटनांकडे हिंदूत्ववादी संघ परिवाराच्या संघटना म्हणून पाहिले जाते. धर्म आणि अध्यात्माच्या भगव्या पोशाखात वावरणारे विवेकानंद, धर्माधतेविरोधात आणि सार्वभौमतेबद्दल जे काही म्हणाले, ते जणू हरवले आहे. त्यांचे काही शब्द वेगळे काढून विवेकानंदांना धर्माध म्हणून सादर केले गेले.
सरदार पटेल यांचेच उदाहरण घ्या, ते कट्टर गांधीवादी, काँग्रेसवादी होते. नेहरूंना स्वत:पेक्षा मोठे नेते आणि पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य मानत होते. त्यांचे निर्णय, त्यांचे लेखन हे दाखवते की त्यांनी संघाला गांधीहत्येस जबाबदार धरून त्यावर बंदी घातली होती. यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपने सरदार पटेलांचे अनुयायी असल्याचा दावा करत त्यांचा मोठा पुतळा उभारला आणि त्यांना गांधी-नेहरूंविरोधात उभे केले. त्या वेळेस काँग्रेस इंदिरा-राजीव प्रेमात गुरफटून सरदारांना पूर्णपणे विसरली नसती तर आज भाजपला सरदारप्रेमाचे दावे करण्याची संधी मिळाली नसती. आज भाजप आणि हिंदूत्ववादी एकीकडे गायीवरून धार्मिक, जातीय आणि भावनिक संघर्ष निर्माण करीत आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे सावरकरांच्या वारसावर मक्तेदारीसुद्धा सांगत आहेत. परंतु त्यांच्या गायीसंदर्भातील विचारांकडे, वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
धार्मिक कट्टरतेच्या विरोधात अनेक गोष्टी सांगणारे, जगभरातील निर्वासितांना भारतात स्थान देण्याचा पुरस्कार करणारे, ज्यांचे शब्द आज देशातील नागरिकत्वाच्या लढाईत चळवळीसाठी उपयोगी पडू शकतील, अशा विवेकानंदांना फक्त त्यांच्या धर्म, अध्यात्म आणि भगव्या रंगामुळे वेगळे केले गेले. गेल्या अर्ध्या शतकात देशातील अनेक महान व्यक्तींना दूरदृष्टीच्या अभावामुळे लोकशाहीपासून दूर जावे लागले आणि एखाद्या विचारधारेने त्यांना हातोहात उचलले. भगतसिंग असोत, सुभाषचंद्र बोस असोत, विवेकानंद असोत किंवा सरदार पटेल असोत.
- तुषार अशोक रहाटगावकर, डोंबिवली पूर्व
