डॅनियल नारोडित्स्की या युवा बुद्धिबळपटूच्या धक्कादायक मृत्यूने सध्या बुद्धिबळ विश्व हादरले आहे. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता किंवा नसावा हे त्यामागील एक कारण. डॅनियल नारोडित्स्की अवघ्या २९ वर्षांचा होता. त्याचा १९ ऑक्टोबर रोजी आकस्मिक मृत्यू झाल्याचे दुसऱ्या दिवशी म्हणजे २० ऑक्टोबर रोजी शार्लोट बुद्धिबळ क्लबने डॅनियलच्या कुटुंबाचा हवाला देऊन जाहीर केले. यानंतर काही तासांतच, डॅनियलच्या अपमृत्यूस माजी जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक जबाबदार असल्याचा आरोप अनेक बुद्धिबळपटू तसेच विश्लेषकांनी केला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढते. मृत्यूचे नेमके कारण जाहीर झालेले नाही. डॅनियलने आत्महत्या केली असावी, किंवा नैराश्येपोटी अमली पदार्थांचे अतिसेवन केले असावे याविषयी सध्या केवळ तर्क व्यक्त केले जात आहेत. व्लादिमिर क्रॅमनिकने डॅनियलवर, तो ऑनलाइन बुद्धिबळ खेळताना गैरप्रकारांचा अवलंब करून विजय सातत्य दाखवतो असा गंभीर आरोप गतवर्षी केला होता. त्यामुळे डॅनियल कमालीचा हताश झाला होता ही बाब सर्वश्रुत होती. क्रॅमनिकने अशा प्रकारचे आरोप अन्य काही आघाडीच्या बुद्धिबळपटूंवरही केले आहेत. मात्र आजतागायत त्याबाबत ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. त्याच्यासारख्या प्रतिभावान माजी जगज्जेत्याने असे आरोप केल्याचा परिणाम दूरगामी होतो, असे भारताचा आघाडीचा ग्रँडमास्टर निहाल सरीनने डॅनियलच्या मृत्यूनंतर लगेचच बोलून दाखवले. डॅनियल त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी निहालशी दिवसभर ऑनलाइन खेळत होता. आपल्याला काही सांगायचे आहे, असेही त्याने सूचित केले होते. क्रॅमनिकच्या बेछूट आरोपांनी एकाचा (डॅनियल) बळी घेतला असे वक्तव्य निहालने भारतीय माध्यमांकडे केल्यावर त्याची दखल जगभर घेतली गेली. कारण निहाल मितभाषी, विचारी बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जातो.
बुद्धिबळ या खेळात आणि त्यातही ऑनलाइन प्रारूपामध्ये लबाडीचे प्रकार व्हायचे नि होत असतात. पण अलीकडच्या काळात विशेषत: जलद आणि अतिजलद प्रकाराकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला. कोविड काळात प्रत्यक्ष पटावर खेळण्याच्या स्पर्धांची संख्या कमी झाली, त्यावेळी दूरस्थ अर्थात ऑनलाइन पद्धतीने बुद्धिबळ खेळले जाऊ लागले. ऑनलाइन प्रकारात जिंकण्यासाठी भलेबुरे मार्गही अवलंबले जाऊ लागले. प्रतिस्पर्ध्यास दिसणार नाही अशा प्रकारे संगणक वा इतर उपकरणे दडवून, ती शक्तिशाली सॉफ्टवेअर किंवा इंजिनशी संलग्न करून अत्यंत कठीण आणि अव्वल बुद्धिबळपटूंनाही सहजपणे सुचणार नाही अशा प्रकारे चाली खेळून जिंकणाऱ्या हौश्या-नवख्यांची संख्या वाढू लागली. तेव्हा प्रस्थापित बुद्धिबळपटूंपैकी अनेक या प्रकाराकडे संशयाने पाहू लागले. पण या प्रस्थापितांपैकीच काही आणि इतरही उच्च प्रतिभेचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ऑनलाइन प्रकाराकडे वळले आणि विलक्षण यशस्वी ठरले.
डॅनियल नारोडित्स्की अशांपैकी एक. त्याचा जन्म अमेरिकेत कॅलिफोर्नियातला. वडील युक्रेनियन स्थलांतरित. सहाव्या वर्षी डॅनियलला त्याच्या भावाने बुद्धिबळाची गोडी लावली. या खेळात अल्पावधीतच त्याने नैपुण्य मिळवले. शालेय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकून डॅनियल अमेरिकेत विविध लहान वयोगटांमध्ये अजिंक्य ठरू लागला. त्याने १२ वर्षांखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी त्याने बुद्धिबळावर पुस्तक लिहून प्रकाशित केले. तो १७व्या वर्षी ग्रँडमास्टर बनला, स्टॅनफर्ड विद्यापीठातून इतिहासात पदवीही प्राप्त केली. पण बुद्धिबळावरील प्रेमामुळे त्याने या खेळालाच उत्पन्नस्राोत बनवले. एक उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, समालोचक, समाज माध्यम प्रभावक आणि सादरकर्ता अशा बहुपैलू डॅनियल नारोडित्सिकीची लोकप्रियता असीम होती. पण क्रॅमनिकने केलेल्या आरोपांमुळे तो सैरभैर झाला.
साक्षात गॅरी कास्पारोवला हरवून या शतकाच्या सुरुवातीस जगज्जेता बनलेल्या क्रॅमनिकची बुद्धिबळ प्रतिभा वादातीत आहे. या खेळातील निष्णात जाणकार म्हणून तो आजही ओळखला जातो. तरीदेखील नारोडित्स्की आणि इतर काही खेळाडूंवरील त्याने केलेले आरोप जसे गंभीर आहेत, तितकेच या आरोपांसाठी पुरावे सादर न करण्याचे त्याचे वर्तनही अक्षम्य ठरते. जगातील सध्याचा अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन यानेही मध्यंतरी हान्स नीमन या आणखी एका अमेरिकी खेळाडूवर तो लबाडी करत असल्याचे आरोप केले होते. त्यालाही पुरावे सादर करता आले नाहीत. जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) आता क्रॅमनिकच्या आरोपांची शहानिशा करायचा निर्णय घेतला आहे. पण यासाठी एखाद्या बुद्धिबळपटूचा जीव जायची वाट पाहण्याची गरज नव्हती. डॅनियल नारोडित्स्कीचा आकस्मिक मृत्यू हा एरव्ही बौद्धिक समजल्या जाणाऱ्या या खेळासाठी विलक्षण धक्का आहे. असे आणखी धक्के बसू द्यायचे नसतील, तर साऱ्यांनी जबाबदारीने वागण्याची नितांत गरज आहे.
