जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणवणाऱ्या देशाला महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेता येत नसेल, तर त्या विस्ताराचा किंवा वाढत्या प्रभावाचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घडामोडींचे दाखले देता येतील. त्यांत सर्वाधिक चर्चित झालेली चलचित्रफीत एका भारतीय विद्यार्थ्याची किंवा रोजगारार्थीची होती. न्यूयॉर्कच्या न्यूआर्क विमानतळावर या भारतीय तरुणाला तेथील पोर्ट अथॉरिटी पोलीस डिपार्टमेंट (पीएपीडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीवर जखडून ठेवले. त्याला पोटावर झोपवून, त्याचे हात पाठीमागे बांधून अत्यंत अवमानास्पद पद्धतीने, इतर प्रवाशांसमोर वागणूक दिली गेली. त्या वेळी तेथे उपस्थित कुणाल जैन या अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय उद्याोजकाने या प्रसंगाचे चित्रीकरण केले आणि ते समाजमाध्यमांवर प्रसृत केले. जैन यांनी न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीसही याविषयी अवगत केले. ही घटना ८ जून रोजी घडली. त्या वेळी भारतीय वकिलातीने या प्रसंगाची आणि संबंधित तरुणाची माहिती घेऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे बुधवारी भारताच्या परराष्ट्र खात्याने ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले, की या प्रसंगाविषयी किंवा संबंधित तरुणाविषयी तपशील उपलब्ध नाही. याविषयी आम्ही वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावास आणि न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीस कळवले आहे. दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडेही स्पष्टीकरण मागितले आहे. ही उत्तरे आपल्याकडील एखाद्या किरकोळ तपास यंत्रणेच्या किंवा सरकारी कार्यालयास शोभून दिसतील. पण ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी तीसेक देशांमध्ये शिष्टमंडळे धाडणाऱ्या आणि त्यासाठी समन्वय साधलेल्या परराष्ट्र खात्यास शोभणारी नाहीत. अमेरिकेशी आपला थेट संवाद कितपत उरला आहे, अशी शंका अलीकडे वारंवार उपस्थित होते. त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प द्विपक्षीय व्यापारापासून ते भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करण्यापर्यंत भारताशी संबंधित सर्व विषयांवर वारंवार विधाने करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या देशाला भेट देतात, त्याच दरम्यान अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांची अवमानास्पद पद्धतीने भारतात पाठवणी करतात. अॅपल कंपनीने भारतात मोबाइल संचांची निर्मिती करू नये म्हणून त्या कंपनीला इशारा देतात. असे केल्याने भारताच्या वाट्याचा घास आपण हिरावून घेऊ याची तमा बाळगत नाहीत. या सगळ्या प्रसंगांमध्ये एकदा तरी आपण अमेरिकेला जाब तर सोडाच, पण त्या देशाच्या नेतृत्वाकडे स्पष्ट शब्दांमध्ये पृच्छा केली आहे काय? आपल्याकडे काय दिसले, तर परराष्ट्र खात्याचे असंबद्ध आणि मिळमिळीत खुलासे. वास्तविक हे काम परराष्ट्र खात्यातील सनदी अधिकाऱ्यांचे नाहीच. त्यासाठी पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री किंवा संरक्षणमंत्री अशा अत्युच्चपदस्थांनीच बोलले पाहिजे. आज अंगुलीच्या अग्रावर इतकी असीम माहिती उपलब्ध असताना आमच्या परराष्ट्र खात्याला संबंधित तरुण कोण नि कुठला याचा पत्ता तीन-तीन दिवस लागत नाही. यासाठी अमेरिकेच्या विविध यंत्रणांकडे पाठपुरावाही करता येत नाही. सगळ्यांदेखत ज्याच्याविरोधात कारवाई झाली, त्याचा काही तरी तपशील अमेरिकेचे परराष्ट्र खाते, गृह खाते, स्थलांतरित वा पोलीस विभाग यांच्याकडे उपलब्ध असेलच. तो मिळवण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती किंवा हिंमत आपण का दाखवू शकत नाही?
ट्रम्प प्रशासनाने दोन वर्गांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे – विद्यार्थी आणि स्थलांतरित. भारतातून त्या देशात दोन्ही वर्गांतील मंडळी लाखोंनी जातात. विद्यार्थ्यांनी तेथे जाऊन काय बोलावे वा बोलू नये, याविषयी आपण ठरवू शकत नाही. पण या देशातून तिकडे वैध स्थलांतरितच जातील याची दक्षता घेण्याची जबाबदारी सर्वस्वी आपलीच. तसेच तेथे गेलेल्या प्रत्येक भारतीयाची – विद्यार्थी आणि स्थलांतरित नोकरदार – नोंद ठेवण्याची जबाबदारी येथील गृह आणि परराष्ट्र खात्याची आहे. भारत हा मित्रदेश आहे याची पत्रास तेथील प्रशासन बाळगत नाही. आपल्या अवैध स्थलांतरितांना तेथे आफ्रिकी किंवा पुंड देशाच्या नागरिकासारखीच वागणूक मिळते. याविषयी आक्षेप उपस्थित करण्याची हिंमत जोपर्यंत येथील नेतृत्व दाखवत नाही, तोपर्यंत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, विश्वगुरू वगैरे बिरुदे पोकळच ठरतात. आपल्याच नागरिकांना अवमानास्पद वागणूक मिळत असताना आपले सरकार ‘बघ्याच्या’ भूमिकेत वावरते. इस्रायलसारख्या देशाच्या अत्याचाराविरोधात युरोपातील इस्रायलच्या मित्रदेशांची सरकारे किंवा अगदी पेप गार्डियोलासारखे विश्वविख्यात फुटबॉल प्रशिक्षक जाहीर नाराजी व्यक्त करतात, तेव्हाही आपण बघ्याच्याच भूमिकेत वावरतो. अमेरिकेकडून भारतीयांना अवमानास्पद वागणूक यापूर्वीही विशेषत: गतशतकात मिळालेली आहे. ‘त्या’ सरकारांपेक्षा वेगळे आणि सुधारित असल्याचा दावा करणारे आजचे सरकार धुरीण कित्येक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ‘उगी राहावे’ भूमिकेस प्राधान्य देतात. हेच धोरण इतरांनी आपल्याबाबत स्वीकारले, तर?