जागतिक राजकारणात, अर्थकारणात, संस्कृतीकारणात, समरकारणात भारताचा प्रभाव किती आणि कसा वाढू लागला आहे याविषयीचे दावे अलीकडे उच्चरवात मांडले जातात. भारताची वाटचाल किती वेगाने प्रगतावस्थेकडे सुरू आहे आणि कित्येक क्षेत्रांमध्ये प्रगत देशांच्या बरोबरीने किंवा काही वेळेस त्यांच्यापुढे आपण कसे पोहोचलो आहोत हेही ठासून सांगण्याची हल्ली प्रथा आहे. काही मानवी विकास निर्देशांकांच्या आणि आर्थिक विकास निर्देशांकांच्या निकषांवर आपण अजूनही मागासलेले आहोत हे सप्रमाण सिद्ध होऊनही, आपण ‘तिसऱ्या जगातले’ वगैरे आता राहिलेलो नाही हेच सांगितले जाते. यास क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. काही खेळांमध्ये आपण लक्षणीय प्रगती केली असली नि करत असलो, तरी इतर खेळांमध्ये आपण खूपच मागे आहोत. यात विशेष उल्लेख करावा असा खेळ म्हणजे अर्थातच फुटबॉल. खऱ्या अर्थाने जागतिक म्हणवल्या जाणाऱ्या या खेळामध्ये भारताचे स्थान नगण्य आहे. हे स्थान कधी दोन पायऱ्यावर सरकते नि पुन्हा सहा पायऱ्या घसरते. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील भारताची अलीकडची कामगिरी हेच दर्शवते. या स्पर्धेत आपण तिन्ही सामने हरून साखळीतच गारद झालो. ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान आणि सीरिया हे तीन संघ जागतिक क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत हे मान्य केले, तरी अलीकडच्या काळात लेबनॉन, इराकसारख्या संघांना हरवून किंवा बरोबरीत रोखल्यामुळे या संघाकडून आशा वाढल्या होत्या. परंतु तीन साखळी सामन्यांमध्ये भारताला एकही गोल करता आला नाही आणि उलट सहा गोल प्रतिस्पर्धी संघांनी भारतीय संघावर चढवले. या पराभव मालिकेची चिकित्सा करताना अनेक मुद्दे उपस्थित होतात.
भारतीय फुटबॉल संघाचे अशा प्रकारचे हरणे हे किमान तीन पिढय़ांनी पाहिलेले आहे. त्यामुळे त्यात तसे पाहू गेल्यास नावीन्य नाही. परंतु एके काळी या देशातील फुटबॉलपटूंनी किमान आशियाई स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच आता बंगाल, केरळ, गोवा आणि ईशान्य भारत या पारपंरिक फुटबॉल गुणसंपन्न प्रदेशांपलीकडेही गुणवत्ता आढळू लागलेली आहे. शिवाय रिलायन्स समूहाच्या पुढाकाराने दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या इंडियन सुपर लीग या फ्रँचायझी आधारित फुटबॉल स्पर्धेमुळे या खेळात भरीव गुंतवणूकही आलेली आहे. मात्र यांपैकी कोणताच घटक भारतीय फुटबॉलला फार उंचीवर नेऊ शकलेला नाही. याचे कारण म्हणजे निव्वळ गडगंज गुंतवणूक यशाची हमी देऊ शकत नाही.
याबाबतीत काही उदाहरणांचे दाखले अस्थानी ठरणार नाहीत. अमेरिका, चीन, जपान या देशांनी भारताच्या किती तरी आधी आपापल्या देशांमध्ये फुटबॉल लीग सुरू केल्या. अमेरिकेने तर पेले, बेकेनबाउर, क्रायुफ, बेकहॅम आणि आता मेसी अशासारख्यांना तेथील लीगमध्ये खेळण्याचे आवतण दिले. आज परिस्थिती अशी आहे की, अमेरिका विश्वचषकामध्ये सातत्याने खेळताना दिसते, पण चमकताना दिसत नाही. चीनच्या बाबतीत सगळाच विचका उडालेला आहे. महागडे फुटबॉलपटू बोलावूनही त्या देशातील फुटबॉलच्या दर्जामध्ये फार फरक पडलेला नाही. एका विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यापलीकडे त्या देशाची पुण्याई नाही. शिवाय भारताप्रमाणेच हाही देश आशियाई स्पर्धेत साखळी टप्प्यात गारद झाला. याउलट जपानने एका टप्प्यावर महागडय़ा लीगचा आग्रह सोडून दिला आणि कुमार स्तरावर फुटबॉल अकादम्या उभारण्याचे युरोपीय प्रारूप स्वीकारले. आज तो देश विश्वचषक स्पर्धेमध्ये महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या संघांना धूळ चारत आहे.
भारतीय संघाचे क्रोएशियन प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनीही हा मुद्दा बोलून दाखवला. मात्र असे बोलून त्यांना जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. त्यांच्या अमदानीत भारतीय संघ १०१व्या क्रमांकावरून कधी काळी नव्वदीत सरकला आणि आता पुन्हा १०२व्या क्रमांकावर घसरला. म्हणजे फिरून पुन्हा तेथेच. याचे कारण मूलभूत परिस्थिती बदलण्याची क्षमता असली, तरी इच्छाशक्ती नाही. यातून फुटबॉल अकादम्यांसारख्या दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, पेन्शनीत निघालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंना बोलावून अल्पानंदी इव्हेंटी छापाच्या लीग खेळवल्या जातात. हे सारे ‘तिसऱ्या जगातील’ मानसिकतेलाच शोभून दिसणारे. यातून फुटबॉलमध्ये ‘पहिल्या’ तर सोडाच, पण ‘दुसऱ्या’ जगातही आपण सरकू शकत नाही.