इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय वंशाच्या अनेक साहित्यिकांना गेल्या काही दशकांत जगभरात लोकप्रियता लाभली. त्यावरून अशा साहित्याच्या यशासाठी उपयुक्त ठरणारे काही ठोकळेबाज घटक सांगता येतात. उदाहरणार्थ, नोकर-चाकरांनी भरलेल्या प्रशस्त बंगल्यांत राहणाऱ्या, पाश्चात्त्य संस्कृतीचा कमीअधिक प्रमाणात प्रभाव पडलेल्या उच्चवर्गातल्या लोकांच्या गोष्टी, भारतीयांची जात/ प्रांत/ वर्गजाणीव ज्यात तीव्रपणे व्यक्त होते असे प्रसंग, ठरवून केलेली लग्नं, असफल प्रेमप्रकरणं, इस्टेटीवरून भाऊबंदकी, भारतीय खाद्यापदार्थ, कपडे, नातेवाईक आणि इतर गोतावळ्याचे खास भारतीय पद्धतीचे अनुबंध अशा गोष्टी ज्यात दाखवल्या जातात अशा साहित्याला, म्हणजेच परदेशी वाचकाला ज्याद्वारे भारताकडे एखादा ‘एग्झॉटिक’ प्रदेश म्हणून बघता येतं अशा साहित्याला लोकप्रियता लाभलेली दिसते. त्यामुळे २०२५ साली जर असं एखादं नवं पुस्तक प्रकाशित झालं असेल तर त्याविषयी विशेष उत्साह वाटायचं कारण नाही. पण ते जर किरण देसाईंनी लिहिलं असेल तर त्याविषयी उत्सुकता मात्र नक्कीच वाटेल.
‘इनहेरिटन्स ऑफ लॉस’ कादंबरीसाठी २००६ साली ३५ वर्षांच्या किरण देसाईंना जेव्हा बुकर पुरस्कार मिळाला तेव्हा त्या सर्वात तरुण बुकरविजेत्या लेखिका ठरल्या. भारतीय वंशाच्या लेखकांपैकी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच लेखकांना तोवर बुकर मिळालं होतं. अशा लखलखीत यशानंतर आता त्या पुढे काय लिहिणार, हा प्रश्न अर्थात त्यांच्या वाचकांच्या मनात तेव्हापासून उत्पन्न झाला असणार. त्याचं उत्तर मिळण्यासाठी मात्र त्यांना २०२५ सालापर्यंत वाट पाहावी लागली. ‘द लोनलिनेस ऑफ सोनिया अँड सनी’ ही त्यांची कादंबरी या वर्षी प्रकाशित झाली आणि तिला बुकरच्या लघुयादीतही स्थान मिळालं. बुकरविजेत्या लेखकाला नव्या पुस्तकासाठी पुन्हा एकदा पुरस्कार मिळण्याची उदाहरणं अगदीच मोजकी आहेत. त्यामुळे या वर्षीचा पुरस्कार देसाईंना हुलकावणी देण्याची शक्यता खूपच अधिक आहे. त्याची चर्चा करण्यापेक्षा पुस्तकाचं रसग्रहण करणं अधिक फायद्याचं ठरेल. ही कादंबरी लिहिण्यात देसाईंच्या आयुष्यातली जवळपास २० वर्षं गेली. इतका काळ त्यावर घेतलेल्या मेहनतीचा आणि देसाईंच्या प्रतिभेचा साक्षात्कार ती पानोपानी घडवते.
मूलत: ही एक प्रेमकथा आहे. सनी भाटिया आणि सोनिया शहा तिचे नायक-नायिका आहेत. घटनाक्रम मुख्यत: ९०च्या दशकात घडतो. कादंबरी सुरू होते तेव्हा सोनिया अमेरिकेत शिकते आहे. लेखक होण्याची तिची आकांक्षा आहे. सनी आपलं शिक्षण पूर्ण करून असोसिएटेड प्रेस (एपी) या जागतिक महत्त्वाच्या वृत्तसंस्थेच्या न्यू यॉर्कमधल्या ऑफिसात अगदी खालच्या पायरीवरचा वार्ताहर म्हणून रुजू झालेला आहे. सनी आणि सोनियाची एकमेकांशी ओळख अद्याप झालेली नाही. दोघांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आणि परिस्थितीमध्ये अनेक फरक आहेत, पण कळीचं साम्य सांगायचं झालं, तर दोघेही मायदेशापासून दूर आणि शीर्षकात म्हटल्यानुसार एकाकी आहेत. त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव होते त्याचं कारण म्हणजे सोनियाच्या कुटुंबाकडून सनीसाठी तिचं स्थळ सांगून येतं. ही बातमी सनीपर्यंत पोचवायचं काम त्याची आई करते, पण आपली नापसंतीही ती लपवून ठेवत नाही. अपेक्षेनुसार सोनियाच्या कुटुंबाकडे नकार पोचता होतो. अर्थात, गोष्ट तिथे संपणार नसते.
जवळपास ७०० पानांची ही कादंबरी साध्यासुध्या प्रेमकथेपुरती मर्यादित मात्र नाही. तिची आकांक्षा एखाद्या महाकाव्याची उंची गाठण्याची आहे. त्यात सनी-सोनियाशी संबंधित अनेक व्यक्तिरेखा आहेत. त्यांपैकी काही काळाच्या उदरात कधीच गडप झालेल्या आहेत, तरीही त्यांची सावली कादंबरीवर आहे. त्यामुळेच कादंबरीच्या सुरुवातीला सनी-सोनियाच्या कुटुंबांचे वंशवृक्ष दिलेले आहेत. कादंबरी पुढे सरकते तशी वाचकांची त्यांच्याशी ओळख होते. यातल्या बहुतांश व्यक्तिरेखा गोतावळ्यात असूनही एकाकी आहेत याचीही मग जाणीव होते. सनीची आई विधवा आहे. वडिलोपार्जित घराची वाटणी करून तिचे दीर आणि ती तिथे राहतात, पण त्यांच्याशी तिचं अजिबात जमत नाही. सोनियाचे आई-वडील एकत्र राहात असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच इतका फरक आहे की अनेक वर्षांच्या सहवासानंतरही (किंवा त्यामुळेच) त्यांच्या नात्यात दूरत्व आलेलं आहे.
कादंबरीची व्याप्ती मोठी आहे. घटनाक्रम आपल्याला अमेरिका, भारत, इटली, मेक्सिको अशा विविध ठिकाणी घेऊन जातो. शिवाय, एकाच वेळी अनेक मुद्द्यांना कादंबरी स्पर्श करू पाहते म्हणूनही तिचा आवाका महाकाव्याप्रमाणे होतो. त्यात बारीकसारीक तपशिलांतून उभी केलेली, थक्क करणारी चित्रदर्शी वर्णनं आहेत. त्यात खुनासारख्या चित्तथरारक घटनाही घडतात, आणि अस्तित्वविषयक तत्त्वचिंतनही आढळतं. महासत्ता असलेली अमेरिका, वसाहतोत्तर काळातला आजचा भारत, या दोन संस्कृतींमधलं अंतर, गरीब-श्रीमंतांमधला फरक, एकाच वेळी आधुनिक व्यक्तिकेंद्री जगण्याची आस आणि समष्टीशी असलेले बंध यांमुळे निर्माण होणारे ताण, कलावंतानं आपल्या आयुष्यातले ताणतणाव पचवून त्यातून आपली कलानिर्मिती करणं अशा विविध मुद्द्यांचा कादंबरीतल्या नाट्याशी संबंध आहे. काही प्रसंग एखाद्या भयस्वप्नागत आहेत, तर काहींमध्ये मॅजिकल रिअलिझमही दिसतो.
एखाद्या लघुचित्रात असावेत त्याप्रमाणे कादंबरीत गुंफलेले अनेक छोटेछोटे तपशील कादंबरी वाचताना लक्ष वेधून घेतात. बऱ्याच प्रमाणात ते देसाईंच्या व्यक्तिगत आयुष्यातून आलेले असावेत. उदा. सनी न्यू यॉर्कच्या जॅकसन हाइट्स भागात राहतो. तिथली दुकानं, रस्त्यावर दिसणारी माणसं, तिथे मिळणारं अन्न आणि या सर्वातून उभी राहणारी न्यू यॉर्क शहराची बहुसांस्कृतिकता देसाईंच्या व्यक्तिगत परिचयाची असणार, कारण त्यांचंही घर त्याच भागात आहे. किंवा, देसाईंप्रमाणेच सोनियादेखील दिल्लीत लहानाची मोठी झालेली असते आणि पुढे अमेरिकेत शिकायला गेलेली असते. तिलाही साहित्यिक व्हायचं आहे.
असे आत्मचरित्रात्मक बारकावे वापरल्यामुळे कादंबरी जिवंत झाली आहे. वर म्हटल्याप्रमाणे इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय वंशाच्या साहित्यिकांनी ठोकळेबाज करून टाकलेले कित्येक घटक त्यात जरी असले, तरी त्यांच्या वापरातले धोके देसाईंना नीट ठाऊक आहेत. त्यावरून त्या विनोदही करतात. एक गोरा चित्रकार सोनियाचा प्रियकर आहे. तिला कथनात्मक लेखन करायचंय हे कळतं तेव्हा तो तिला सल्ला देतो : ‘मॅजिक रिअलिझम वापरू नकोस. दांभिक मानसशास्त्र नको. प्राच्यवादी (ओरिएंटलिस्ट) कचरा नको. ठरवून केलेल्या लग्नांबद्दल लिहू नकोस!’
सोनियाच्या प्रियकराचा सल्ला देसाईंनी जरी मानलेला नाही, तरीही ठोकळेबाजपणा टाळण्यासाठी कादंबरीच्या घाटावर आणि आशयावर त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे. उदाहरणार्थ, कादंबरी सनी-सोनियाची प्रेमकथा असूनही त्यांची प्रत्यक्ष भेट व्हायला बराच काळ जातो (सुमारे २०० पानं). तोपर्यंत कथानक दोघांचा स्वतंत्र प्रवास दाखवत राहतं. दोघांच्या कुटुंबांच्या भूतकाळाचीही सावली कथानकावर आहे. सोनियाचे आजोबा जर्मन असतात. त्यांची भावंडं हिटलरच्या सैन्यात दाखल झालेली असतात. भारतात येऊन ते हिमालयाच्या पायथ्याशी राहतात तेव्हा त्यांना आध्यात्मिक साक्षात्कार होतो. त्यांना प्रिय असणारा एक ताईत सोनियाच्या आईनं तिला दिलेला असतो. तो पुढे तिच्याकडे राहात नाही. त्या ताईताचा विरह सोनियासाठी तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या विरहाहूनही अधिक टोकदार होतो. ताईत दुरावल्यानंतरच तिची सनीशी गाठ पडते. पण त्या ताईताच्या नसण्यानं तिच्यावर इतका खोल परिणाम केलेला आहे, की तिच्या आणि सनीच्या नात्याचं काही बरंवाईट होणं आणि ताईत परत मिळणं यांची एक विलक्षण सांगड देसाई घालतात. तो ताईत कुणा ‘बादल बाबा’चा असतो. कमालीच्या आनंदाच्या क्षणी किंवा एखाद्या व्यक्तिरेखेला एखादा साक्षात्कार घडण्याच्या प्रसंगी ढग, समुद्र अशा पाण्याशी संबंधित अनेक प्रतिमा कादंबरीत येतात. व्यक्तिरेखांचं एकाकीपण आणि जगण्याच्या धडपडीतला ओलाव्याचा शोधही त्याद्वारे अधोरेखित होतो.
सोनियाची लेखक होण्याची आकांक्षा तिच्या आयुष्यातल्या अनेक अनपेक्षित वळणांमुळे बाजूला पडते. तिला लेखक होता येईल का, हा कादंबरीतला एक कळीचा प्रश्न आहे. पाश्चात्त्य वाचकाला आवडतील अशा ‘चार्मिंग’ गोष्टी लिहिल्या तर तिला उदरनिर्वाह करता येईल. पण आपलं आयुष्य तर तसं नाही, मग असं लिहित राहणं ही स्वत:शी केलेली प्रतारणा आहे हे तिला कळतं आणि ती लिहायची थांबते. सनीला नोकरी टिकवायची आहे, पण निव्वळ गोऱ्या लोकांना जगाचे तारणहार मानून वार्तांकन करण्यात त्याला रस नाही. आपल्या भारतीय असण्यातून जगाविषयीचा आपला वेगळा दृष्टिकोन घडवायच्या प्रक्रियेत तो आहे आणि त्यातून जगाला काही वेगळं सांगायची त्याची आकांक्षा आहे. आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची आणि ओळखीची उभारणी करण्याची दोघांची धडपड आधुनिक आहे, पण आपला भूतकाळ आणि भारतीयत्व सोडून देऊन ते करता येत नाही याची त्यांना होत जाणारी जाणीव आधुनिकोत्तर आहे. आपल्यावर जेव्हा कुणी प्रेम करतं, हळुवार नजरेतून आपल्याला पाहणाऱ्या लोकांकडून आपण कसे आहोत हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा आपण अधिक चांगले होतो, हा आशावाद कादंबरीत एखाद्या अंतर्प्रवाहाप्रमाणे वाहत राहतो. असे अनेक घटक कादंबरीतला आशय समृद्ध करत जातात.
कादंबरीचा पहिला खर्डा १५०० पानांचा होता. त्याची काटछाट करून तो सुमारे ७०० पानांवर आणला गेला आहे. या कादंबरीनं लेखिकेची, तिच्या संपादकांची आणि प्रकाशकांची कसोटी घेतली असावी असं दिसतं. आताही ती वाचताना पसरट वाटू शकते. मात्र, प्रत्येक शब्दावर आणि वाक्यावर देसाईंनी मेहनत घेतली आहे हे लक्षात येतं. (देसाईंना व्ही. एस. नायपॉल यांच्या कथनात्मक साहित्यातली वाक्यं प्रिय आहेत, हा तपशील इथे लक्षात घ्यावा लागेल.) वाचतावाचता कित्येक वाक्यांपाशी थबकून ती पुन्हा वाचावीशी वाटतात, इतकी ती लयदार, काव्यात्म आणि आशयसंपृक्त आहेत. परीकथेतल्या सौंदर्याची भुरळ पडते, पण त्यात काळोख्या गोष्टीही असतात, आणि कळत-नकळत तुम्हाला त्याचीही मजा येत असते. सौंदर्य आणि काळोखाचा तोल सांभाळता सांभाळता आशयाची उंची गाठण्याची ही कसरत देसाईंची कादंबरी लीलया साधते. त्यामुळे पुरस्कार मिळो न मिळो, भारतीय इंग्रजी साहित्याच्या दीर्घ परंपरेत तिला गौरवाचं स्थान द्यावंच लागेल.
rabhijeet@gmail. Com
