कोवळ्या वयात पालकांचं प्रेम वाट्याला न आल्याने असुरक्षिततेने ग्रासलेलं बालपण आणि तरीही कर्तृत्ववान, कोरड्या आईचं गारूड हा मनाचा तळ ढवळून काढणारा विषय एकांगी दोषारोपण टाळून मांडणाऱ्या अरुंधती रॉय यांच्या नव्या पुस्तकासंदर्भात…

प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई… या साध्या सरळ कविकल्पनेला आडवा- उभा छेद देणाऱ्या आयांची संख्या काही कमी नसते. अशा आया गुणदोषांचं मिश्रण असलेलं माणूस म्हणून जास्त खऱ्या असतात. त्यांना अक्षरश: नकोशा वाटणाऱ्या मुलांना पाण्यात पाहण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. एक महत्त्वाचं कारण म्हणजे तयारी नसताना लादलं गेलेलं मातृत्व आणि छंदीफंदी जोडीदारामुळे एकटीवर येऊन पडलेल्या, न पेलल्या जाणाऱ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली होणारी चीडचीड. ज्या पुरुषाबद्दल मनात तिरस्कार असतो, त्याच्यापासून झालेली मुलंही डोळ्यांसमोर नकोशी होतात आणि अशा आई- वडिलांमधल्या तीव्र मतभेदांची किंमत अबोध मुलांना चुकवावी लागते, हे दुर्दैव. कोवळ्या वयात अत्यावश्यक असलेलं पालकांचं नैसर्गिक प्रेम वाट्याला न आल्याने, वात्सल्यहीन, असुरक्षित झालेलं आयुष्य, हा विख्यात लेखिका अरुंधती रॉय यांचं बालपण ग्रासणारा आणि नंतरही छळणारा सल! तरीही कर्तृत्ववान, कोरड्या आईचं गारूड होतंच मनावर, म्हणून २०२२ मध्ये तिच्या निधनानंतर अरुंधतींनी हे प्रकाशनाआधीपासूनच गाजत असलेलं आत्मकथन, ‘मदर मेरी कम्स टू मी’ लिहायला घेतलं. हे पुस्तक लिहिणं त्यांना आतून इतकं अपरिहार्य वाटत होतं की ते लिहून मोकळं झाल्याशिवाय इतर काही लिहिता येणं अशक्य होऊन बसलं होतं. हुकूमशहा आईच्या आठवणी आणि तिच्या कडवट व्यक्तिमत्त्वाच्या वलयात अरुंधती आणि त्यांचा भाऊ ललित यांच्या वाट्याला खूप काही दुखावणारंच असूनही या अतिशय गुंतागुंतीच्या नात्याच्या कहाणीला त्यांना जे शीर्षक द्यावंसं वाटलं ते बीटल्सच्या गाण्यातल्या एका ओळीचं, ‘व्हेन आय फाइन्ड मायसेल्फ इन टाइम्स ऑफ ट्रबल, मदर मेरी कम्स टु मी’ हे शांत लयीतलं गोड गाणं प्रत्येक कडव्यात मदर मेरीच्या आयुष्यातील आश्वासक अस्तित्वाचा उल्लेख करणारं आणि अप्रिय गोष्टी आहेत तशा स्वीकारण्याचं! मायलेकींच्या नात्याच्या कडवट प्याल्यातही काहीतरी संजीवकही असावं, तसंच काहीसं.

मागल्या शतकाच्या अखेरीस आलेली ‘डिफिकल्ट डॉटर्स’ ही मंजू कपूर यांची सत्य घटनेवर आधारित कादंबरी, एका बदलत्या जमान्याची साक्षीदार ठरलेली. वाचून मनात आलं होतं ‘डिफिकल्ट मदर्स’ हाही तेवढाच सुरस विषय होऊ शकेल. तो इथे अरुंधती रॉय ह्यांनी ताकदीने हाताळलाय. ‘आई आमच्यासाठी आईपेक्षा करडी शिक्षिका मिसेस रॉयच होती’ हे त्यांचं विधान आणि पुस्तकभरात आईचा तसाच केलेला उल्लेख बोलका, त्रयस्थ तिरकसपणाची धार असलेला. प्रत्येक स्वतंत्र विचार करणाऱ्या लेकीला तिची तितक्याच स्वतंत्र वृत्तीने जगणारी कणखर आई जशी माहीत असते आणि त्यांचं जे भांडणमंडित नातं असतं ते खासच असतं. पाळंमुळं त्यांच्या स्वत:च्या आणि एकमेकींत मिसळलेल्या भावनिक आणि बौद्धिक जडणघडणीत असतात. चारचौघींसारखी नसलेल्या आईचा, बालपणात मुलीला त्रास नक्कीच होतो. अगदी तीच कठोर ,प्रेमविरहित वागणूक मिळालेल्या भावाच्या मनाचा दगड बनतो. मोठेपणी आईला ठाम विरोध करणाऱ्या अरुंधती मात्र वेळोवेळी आईच्या पसंतीच्या शिक्क्यासाठी मागे वळून पाहताना दिसतात. कौतुक भरभरून येत नाही वाट्याला पण एखादं वाक्यसुद्धा पुरेसं वाटतं : जसं की बुकर मिळालेली कादंबरी वाचल्यावर ‘चांगलं लिहितेस तू’. पण हीच कडकलक्ष्मी आई इतर सर्व मुलांना विशेषत: वसतिगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना प्रेम देताना अगदी प्रेमळ होताना दिसते तेव्हा मात्र तिच्या त्या रूपाने मुलांना असूया वाटत नाही, दिलासाच मिळतो, आईचं माणूसपण पाहून. एके ठिकाणी त्या लिहितात, ‘आईने आम्हाला कधी प्रेमाने जवळ घेतलं नाही. कधी कधी आईला प्रेमाने बिलगावंसं मला वाटे. पण काटेरी साळूला कशी मिठी मारायची, अगदी फोनवरूनसुद्धा?’

एक कठीण नातं केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे आत्मनिवेदन निवडक आठवणींतून अरुंधतींच्या आजवरच्या आयुष्याची कहाणी सांगतं. आसामच्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या आई-वडिलांचं आंतरधर्मीय लग्न, त्यातही आई मल्याळी आणि वडील बंगाली. मागोमाग झालेली दोन मुलं, दारुड्या नवऱ्याच्या कलंदर वृत्तीला वैतागून १९६२ मध्ये आईने मुलांसह उटीच्या माहेरघरी परतणं (ती दोघं ५ वर्षं सोडा, पाच मिनिटं तरी कशी एकत्र राहिली असतील याचंच आश्चर्य वाटतं असं अरुंधती म्हणतात) तिथे आजी व ऱ्होड्स स्कॉलर असलेल्या मामाने त्यांना निर्ममपणे घराबाहेर काढणं, तशा अवस्थेत अंधारात दोन्ही चिमुरड्या मुलांना हात धरून फरफटत वकिलाकडे नेणं व तिथे राहायची परवानगी मिळवणं… पुढे आईने ऐतिहासिक कायदेशीर लढा देऊन तमाम ख्रिाश्चन मुलींना वारसा-इस्टेटीत समान हक्क मिळवून देणं, स्थापत्याचे गांधी म्हणवणाऱ्या पर्यावरणस्नेही लॅरी बेकर यांच्या साहाय्याने छोटीशी शाळा व वसतिगृह बांधणं वगैरे. आईला दम्याचे झटके येत, अनेकदा रुग्णालयात दाखल व्हावं लागे, ‘मी मेले तर तुम्हाला दोघांना आपापलं काय ते बघावं लागणार आहे,’ ही धमकीवजा भीती, शाळकरी अरुंधतींना कायम असुरक्षित ठेवणारी. ‘भीती म्हणजे एखाद्या थंड, केसाळ अळीसारखी माझ्या मनावर कायम सरपटत राहाणारी’ हे वाक्य अनेकदा येणारं. शारीरिक व्याधी आणि आर्थिक चणचणीने सतत उखडलेल्या आईने दोन्ही मुलांना, ती त्यांच्यावर फुकटचे ओझे आहेत अशी वारंवार आठवण करून देत क्रौर्याने वागवणं, भावाला शाळेत निकाल वाईट आला म्हणून रात्री खोलीत दरवाजा बंद करून खालच्या आवाजात रागवत, पट्टी तुटेस्तोवर बदडणं किंवा लहानग्या अरुंधतीला प्रवासातून येताना काहीतरी चुकलं म्हणून गाडीतून उतरवून मैलाच्या दगडावर सोडून देणं : अशा आठवणी. अरुंधती स्थापत्य शिकण्यास दिल्लीला आल्यावर मध्यंतरी सात वर्षं त्यांच्याशी कुठलाही संपर्क न ठेवणं हे सगळे मानसिक अत्याचारच. अडचणींशी झगडत, विपन्नावस्थेत अरुंधती स्वैर, स्वान्त सुखाय जीवन जगत गेल्या. एकदा तर पैशांअभावी भूल (क्लोरोफॉर्म) न घेता गर्भपात करावा लागला. मित्रांच्या साथीमुळे छोटी-मोठी कामं मिळत गेली, कशीबशी गुजराण होत राहिली. काहीही झालं तरी आईच्या जुलूमशाहीत परत जायचं नाही, हे नक्की ठरवलेलं होतंच.

अजाण असताना घर सोडल्यानंतर, दोन्ही मुलांची वडिलांशी भेट विशीत झाली. तोवर कोणीच परस्परांशी संपर्क साधायचा कधी प्रयत्न केला नाही हेही विचित्र वाटणारं, एकंदरीत कुटुंबातला प्रत्येकजण आपापल्या परीने टोकाचा विक्षिप्त! वडील बदललेले नव्हतेच. शेवटी त्यांची देखभालही अरुंधतींनी केली. त्यांच्या मृत्यूला आईची प्रतिक्रिया एवढीच ‘पुअर फेलो! ही वॉज सच अ नथिंग मॅन’. आईने मात्र वडिलांना सोडल्यावर कोणा पुरुषाला आयुष्यात स्थान दिलं नाही आणि त्यामुळेही तिच्या स्वभावात काही अनैसर्गिक कंगोरे आले असावेत असंही अरुंधती लिहितात.

आर्किटेक्ट झालेल्या अरुंधती अभावांशी झगडत लेखनाकडे कशा वळत गेल्या, त्यांची ‘मेस्सी साहेब’ या चित्रपटातील भूमिका, पुढे प्रदीप क्रिशन यांच्याबरोबर चित्रपट कथालेखन व आर्टफिल्मस निर्मिती ते जादूच्या कांडीने आयुष्य बदलून टाकणाऱ्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ पर्यंतचा प्रवास हे सगळं निवेदनात येतं, अर्थात नंतरच्या पुस्तकांबद्दलही. एका मनस्वी मुलीने स्वत:चं आयुष्य रूढ सामाजिक चाकोऱ्यांकडे शांतपणे दुर्लक्ष करून फक्त स्वत: ला हवं तसं कसं जगलं हे सांगताना, नर्मदा बचाओ आंदोलन, छत्तीसगढमधल्या माओवादी लोकांना दिलेला पाठिंबा व सहयोग, काश्मीरच्या जनतेच्या/ अल्पसंख्याकांच्या बाजूने दिलेला व्यक्तिगत लढा त्यात त्यांना चिकटलेलं अर्बन नक्षल हे बिरुद आणि येणाऱ्या धमक्या हेही त्यांनी सांगून टाकलं आहे. त्यांच्या दोन्ही लग्नं आणि फारकतींबद्दलही आयुष्याच्या ओघात आलेल्या वळणांबद्दल लिहावं तसं सहज लिहिलं आहे, कुठलीही चिरफाड नाही, नाट्य नाही किंवा भावनिक तिढे नाहीत. थोडक्यात हे पुस्तक म्हणजे अरुंधती रॉय यांचं, ‘मी कशी झाले?’ आहे.

पुस्तकाच्या निमित्ताने दिल्लीत आयोजित वार्ताहरांबरोबरच्या संवादात अरुंधतींना प्रश्न विचारला गेला होता : तुमच्या आईकडून तुम्हाला वारशात मिळालेली गोष्ट कोणती? तेव्हा त्यांनी उत्तरादाखल उंचावलेलं हाताचं मधलं बोट बीभत्सच होतं. पण ज्यांनी पुस्तक वाचलंय त्यांना धक्का कमी बसला असावा. या निराकार नात्याबद्दल अरुंधती म्हणतात की ‘मी मोठी झाल्यावर तुल्यबल अणुशक्तींप्रमाणे आम्ही एकमेकींची स्पेस सांभाळायला शिकलो. आयुष्यभर तिला अपमानित न करता, तिला आव्हान न देता मी माझं स्वतंत्र आयुष्य घडवत राहिले आणि आता तिच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे, तिचं काय करावं हे कळेनासं झालंय.’ पुस्तक दु:ख आणि अन्यायाविरुद्ध दाबून ठेवलेल्या रागाबद्दल असूनही ते एकांगी दोषारोपण वाटत नाही. नाट्य किंवा भावोद्रेक कसोशीने टाळून, वाहू दिलेला हा थंड कोरडा संताप, अगदी समजण्यासारखा. परिपक्व वस्तुनिष्ठतेने स्वयंसिद्धा मिसेस रॉय यांच्या वागण्याचा अर्थ लावताना अरुंधती आईला सूट देत नाहीत आणि स्वत:वरही अन्याय होऊ देत नाहीत, हे त्यांच्या मानसिक संतुलनाचं कौशल्य की लेखणीचं लालित्य? पुस्तकाच्या शेवटी अरुंधतींनी म्हटलंय, ‘ही कहाणी सांगताना मी स्वत:ही पूर्णपणे माझ्या बाजूला नव्हते कधी’ ते मात्र अतिशय हृद्या वाटतं.

मनाचा तळ ढवळून काढणारा हा विषय लिहायला खूप कठीण असावा, पण विरोधाभास असा की हे अरुंधती रॉय यांचं सरळसोट निवेदन त्यांच्या आजवरच्या पुस्तकांपैकी, वाचायला सगळ्यात सोपं. सामाजिक- राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वच मतं मान्य असली- नसली तरी जागतिक पातळीवरच्या लेखिकेला, प्रामाणिक निवेदनातून अंतर मिटवून, तिच्या वाचकांशी जोडणारं. दोन्ही मुलांनी लावलेल्या मिसेस रॉय यांच्या कोट्टायममधील हिरव्यागार स्मृतिवनासारखं हे पुस्तकही परिपूर्ण सौंदर्यदृष्टीचं उदाहरण आहे. आकर्षक रंगसंगतीतलं मुखपृष्ठ, साजेसा लेआऊट व बांधणी आहे. भारतासह इंग्लंड, अमेरिका, कॅनडातही सध्या बेस्ट सेलर्सच्या यादीत झळकणाऱ्या या त्यांच्या पुस्तकाने त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ पेक्षाही अधिक पटीने वाढ केली आणि त्यांच्या आधीच्या पुस्तकांच्या विक्रीचे उच्चांक मोडले, तर आश्चर्य वाटू नये.

मदर मेरी कम्स टू मी’

लेखिका: अरुंधती रॉय

प्रकाशक: पेंन्ग्विन हॅमिश हॅमिल्टन

पृष्ठे – ३७६, मूल्य- ८९९ रुपये

arundhati.deosthale@gmail.com