महेश सरलष्कर
टीकेची धार काँग्रेसवरच, बाकी ‘इंडिया’ आघाडी संपल्याच्या प्रचारावर भर, हा भाजपनेत्यांचा डावपेच राज्याराज्यांतल्या प्रत्यक्ष स्थितीशी जितका विसंगत ठरेल तितकी आघाडी जोर धरेल..
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहांमध्ये भाजपच्या खासदारांना अपेक्षित असलेले भाषण केले होते. मोदींच्या भाषणात नेहमीच उपहास असतो आणि तो बऱ्याच वेळा काँग्रेसविरोधात असतो. त्यामुळे अनेकदा कोणी रेकॉर्डप्लेअर सुरू ठेवलाय असे वाटू शकते. पण भाजपच्या कार्यकर्त्यांचा जोश कायम ठेवण्यासाठी अशी भाषणे करावी लागतात हे मोदींनाही माहीत असते. त्यामुळे मोदींची भाषणे भाजपमधील प्रत्येकाला आवडतात, हे कबूल केले पाहिजे! मोदींनी दोन्ही सदनांमधील भाषणांमध्ये ‘माझ्यामुळे २०२४ची लोकसभा निवडणूक भाजप जिंकेल’, असे ठामपणे सांगितले. त्याची पुनरावृत्ती मोदींनी ‘भारत मंडपम’मध्ये झालेल्या दोन दिवसांच्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातही केली. मोदींच्या या सगळय़ा भाषणांमध्ये काँग्रेसविरोध हेच सूत्र होते. मोदींनी ही भाषणे अत्यंत चाणाक्षपणे केलेली होती, त्यामध्ये काँग्रेसविरोधात कडवी टीका होती; पण मोदींनी ‘इंडिया’ हा शब्द देखील उच्चारला नाही. इतकेच नव्हे तर, ‘इंडिया’तील इतर प्रादेशिक पक्षांवर अपवाद म्हणून देखील टीका केली नाही. मोदींनी ‘इंडिया’तून काँग्रेसला खडय़ासारखे उचलून बाजूला केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अजून सुरुवातही झालेली नाही, मोदी प्रचारात उतरतील तेव्हा त्यांचे लक्ष्य ‘इंडिया’तील विरोधक नव्हे तर फक्त काँग्रेस असेल हे नक्की.
मोदींनी काँग्रेसवरच लक्ष केंद्रित केले, यामागे कदाचित दोन कारणे असू शकतात. भाजपविरोधात ‘इंडिया’ आघाडी ही सशक्त राजकीय शत्रू असल्याचे मोदींना वाटत नाही. नितीशकुमार यांनी पलटी मारल्यानंतर तर भाजपसमर्थकांनी ‘इंडिया’ आघाडीने चिरविश्रांती घेतल्याचेच जणू घोषित केले होते. भाजपच्या पाठिंब्यावर ‘टीआरपी’ खेचून घेणाऱ्या नोएडास्थित वृत्तवाहिन्यांनी ‘इंडिया’च्या अस्तावर इतके कार्यक्रम केले की, भाजप सोडून काँग्रेसलाच अधिक प्रसिद्धी मिळाली! ‘इंडिया’कडे भाजपविरोधात दंड ठोकून उभे राहण्याची ताकद नसेल तर ‘इंडिया’तील घटक पक्षांवर टीका करून काय मिळणार, हे सरळसोपे गणित मोदींनी मांडले असावे. त्यामुळे मोदींनी ‘इंडिया’तील प्रादेशिक पक्षांवर टिप्पणी करून वेळ वाया घालवला नसावा. मग, उरला काँग्रेस पक्ष. कुठल्याही निवडणुकीत शत्रू तर हवाच, स्वत:च्या कामगिरीवर पक्षाला निवडून देता येत नसेल तर कमकुवत विरोधी पक्षालाही तात्पुरते बलवान असल्याचे दाखवून धोपटता येते. मोदींनी काँग्रेसला संसदेत मनसोक्त धोपटून काढले. आता कदाचित फक्त काँग्रेसला शत्रू मानण्याची रणनिती बदलावी लागू शकते. ‘इंडिया’ नेस्तनाबूत झाल्याची घोषणा काळाआधीच केली याचा पश्चात्ताप भाजपला होऊ शकतो.
गेल्या महिना-दीड महिन्यात काँग्रेसने वेड पांघरून भाजपला पेडगावला नेले असावे, अशा घडामोडी आठवडाभरात झालेल्या आहेत. भाजपच्या नाकावर टिच्चून काँग्रेसने इंडिया आघाडीचे पुनरुज्जीवन केले आहे. हे पाहिले तर ‘इंडिया’ला जीवदान मिळण्यात भाजपचा मोठा वाटा आहे, असे म्हणता येईल. नितीशकुमार यांना फोडून ‘इंडिया’ आघाडी कोलमडून पडेल असा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र भाजपच्या या फोडाफोडीमुळे काँग्रेसला दोन पावले मागे घेण्याचे शहाणपण सुचले. काँग्रेसच्या अडेलतट्टूपणामुळे समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आघाडी करणार नाहीत असे चित्र निर्माण झालेले होते. पण दोन्ही पक्षांनी काँग्रेससोबत अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब केलेले आहे. या दोन्ही पक्षांशी यशस्वी वाटाघाटी करून काँग्रसने तडजोडी करण्याची तयारी असल्याचे दाखवून दिले आहे. ‘सप’शी झालेली आघाडी उत्तर प्रदेशप्रमाणे मध्य प्रदेशातही फायद्याची ठरेल. कमलनाथ यांनी विधानसभा निवडणुकीत केलेली चूक मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांनी सुधारलेली आहे. ‘आप’शी दिल्लीत युती करून हरियाणा, गुजरात, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांतही काँग्रेसने लाभाचे गणित मांडले आहे. त्याचा काँग्रेस किती लाभ करून घेईल हा भाग वेगळा; पण भाजपविरोधातील आघाडीची दिशा चुकीची नव्हे.
जुना आकस, नवा विरोध
‘इंडिया’च्या आघाडीतील कथित विरोधाभासावर भाजपकडून सातत्याने बोट ठेवले जाते. आघाडीत सहभागी होणारे पक्ष केरळ, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये मात्र एकमेकांविरोधात लढणार. मग, ही कसली आघाडी, अशी थट्टा भाजपने अनेकदा केलेली आहे. ‘इंडिया’ आघाडी भाजपविरोधाचा धागा पकडून कार्यरत झालेली आहे. त्यांचा उद्देश लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे आहे, त्यासाठी ते आपापसांतील मतभेदांकडे दुर्लक्ष करत आहेत. ‘इंडिया’ आघाडी म्हणजे एकसंध पक्ष नव्हे, त्यातील अनेक घटक पक्ष काँग्रेसला विरोध करून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये काँग्रेसबद्दल आकस असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. असे असूनदेखील भाजपविरोधात ते एकत्र आलेले आहेत. त्यामुळे केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’तील इतर घटक पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटप झाले नाही तरी फारसे बिघडत नाही. केरळमध्ये भाजप हा शत्रूच नसेल तर ‘माकप’ आणि काँग्रेसने एकत्र कशासाठी लढायचे आणि कोणाविरोधात? पंजाबमध्ये भाजप नावालाही नसेल तर काँग्रेस आणि ‘आप’ने एकत्र येण्याला कोणता अर्थ निर्माण होतो? शिवाय, भाजपचे अस्तित्व असलेल्या राज्यांमध्ये ‘इंडिया’च्या घटक पक्षांत जागावाटप होण्याच्या मार्गावर आहे वा झालेले आहे.
काँग्रेसने नमते घेतल्यामुळे उत्तर प्रदेशात ‘सप’शी युती झाली आहे. दिल्लीत ‘आप’शी युती करून गुजरात आदी अन्य राज्यांतील आघाडीचा प्रश्नही काँग्रेसने निकालात काढला आहे. महाराष्ट्रातील जागावाटपासाठी थेट राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधल्याने महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर मतैक्य होईल असे दिसते. बिहार, तमिळनाडू या राज्यांमध्ये काँग्रेस महागठबंधनचा हिस्सा आहे, तिथेही वाटाघाटींमध्ये दबावाचे राजकारण केले जाईल; पण अखेरीस जागावाटपाच्याच बाजूने सारे झुकतील. ‘इंडिया’ आघाडी संपुष्टात आल्याचा साक्षात्कार भाजपसमर्थक वृत्तवाहिन्यांना झाला त्याचे कारण पश्चिम बंगाल! इथे भाजप सगळी ताकद ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी खर्च करत आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’ आघाडीमध्ये जागावाटपात तिढा निर्माण झालेला आहे हे खरे. पण, इथे ‘इंडिया’ आघाडी नसली तरी काही बिघडत नाही. ‘इंडिया’ आघाडीतील तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र लढले तर त्यांचा प्रमुख विरोधक भाजप होईल. भाजपला आयती संधी देणे म्हणजे ‘इंडिया’साठी ‘आ बैल मुझे मार’चा प्रकार होईल. त्यापेक्षा मालदा व मुर्शिदाबाद जिल्ह्यातील दोन जागा घेऊन काँग्रेसने तृणमूल काँग्रेसशी युती करावी किंवा तीनही भाजपविरोधी पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. तृणमूल काँग्रेसविरोधातील जनमत काँग्रेस व डाव्या पक्षांकडे वळले तर ‘इंडिया’चा लाभ होईल. ‘इंडिया’तील घटक पक्ष एकत्र लढून हे जनमत भाजपकडे गेले तर ‘इंडिया’ आघाडीचे नुकसानच अधिक होईल, हा मुद्दा ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीपासून मांडत आहेत. येचुरींचा युक्तिवाद बिनचूक मानला तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आक्रमकपणाचा ‘इंडिया’ला तोटा होण्याची शक्यता कमी दिसते. शिवाय, दोन्ही काँग्रेसमध्ये सामंजस्य होणारच नाही असे नव्हे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. ऐनवेळी सोनिया गांधींनी मध्यस्थी केली तर पश्चिम बंगालमध्ये आघाडी होऊ शकेल.
अर्धी लढाई जिंकूनही..
भाजपने अर्धी लढाई जिंकलीही असेल; पण प्रत्यक्ष लढत अद्याप बाकी आहे. नितीशकुमारांना ‘इंडिया’पासून तोडल्यानंतर ‘इंडिया’ अस्तगत झाल्याचा डांगोरा पिटला नसता तर कदाचित ही आघाडी आपोआप नष्ट झालीही असती पण, भाजपच्या अतिउत्साहाने ‘इंडिया’तील घटक पक्षांना विशेषत: काँग्रेसला बळ दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘इंडिया’ आघाडीला उभारी मिळालेली आहे. काँग्रेसचे संख्याबळ वाढेल की नाही यापेक्षाही भाजपने केलेली ३७० जागा जिंकण्याची गर्जना पूर्ण होईल की नाही हे अधिक महत्त्वाचे. अख्खा ‘एनडीए’ तिथवर पोहोचला तरी भाजपसाठी ते मोठे यश असेल.
mahesh.sarlashkar @expressindia.com