भाजपमध्ये ‘मार्गदर्शक मंडळ’ नावाचा देखावा उभा केला, त्यामागे मोदींना स्वत:ला हवा तसा भाजप तयार करता यावा हे प्रमुख कारण होते. वेळ आली की मोदींनीच मार्गदर्शक मंडळाचा सदस्य व्हावे यासाठी मोदींनी ही सोय निर्माण केलेली नव्हती. मोदी येत्या १७ सप्टेंबरला ७५ वर्षांचे झाले म्हणून त्यांची रवानगी सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शक मंडळात करतील असा कोणी समज करून घेऊ नये. नुकतीच मार्गदर्शक मंडळाची नव्याने चर्चा सुरू झाली ती भागवत यांच्या विधानामुळे हे खरे असले तरी, राजकारणात अनेक गोष्टी चकवा देत असतात. त्यामुळे भागवतांच्या विधानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल असे नव्हे. २०२९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर मोदी सलग चौथ्यांदा पंतप्रधान झालेले दिसू शकतील, ही शक्यता आत्ता तरी कोणी नाकारू शकत नाही. मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पण चौथ्यांदा पंतप्रधान होऊन विक्रम मोडण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची असू शकते!
‘जर ७५ वर्षांचे झाल्यावर तुम्हाला शाल देऊन सन्मानित केले जात असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता थांबावे, तुम्ही खूप म्हातारे आहात. बाजूला व्हा आणि इतरांना येऊ द्या’, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे आता मोदींचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. वास्तविक मोहन भागवत मोदींपेक्षा फक्त ६ दिवसांनी मोठे आहेत. भागवतांचा वाढदिवस ११ सप्टेंबर तर, मोदींचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी असतो. सप्टेंबरमध्ये दोघेही ७५ वर्षांचे होतील. समाजकारणातून आणि राजकारणातून ७५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा नियम लागू करायचा असेल तर फक्त भाजपमध्ये नव्हे तर संघातही लागू झाला पाहिजे, असे कोणी म्हणू शकतो. तसे असेल तर मोदींच्या आधी भागवत सरसंघचालकपद सोडतील. मग ते मोदींना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हा असे म्हणू शकतील. अशी निवृत्तीची घोषणा होते का, हे पाहण्यासाठी सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. भागवतांनी निवृत्ती घेतली नाही तर मोदीदेखील २०२९ पर्यंत पंतप्रधानपदी कायम राहतील असे मानायला कोणाची हरकत नसेल. पण ७५व्या वर्षी निवृत्त होण्याबाबत भागवत यांनी जाहीरपणे विधान केलेले आहे. सरसंघचालक म्हणून त्यांचे विधान कोणीही गांभीर्यानेच घेईल! दिल्लीमध्ये भागवत यांच्या विधानाचा अर्थ, मोदींना निवृत्त होण्याचा दिलेला सल्ला असा घेतला जात आहे. कदाचित भागवत यांनी भाजपमध्ये नजिकच्या भविष्यात नवी पिढी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आणली जाऊ शकते असे सूचित केले असावे. मोदींच्या पूर्वी भाजपमध्ये वाजपेयी-अडवाणी यांची सत्ता होती. केंद्रातील वाजपेयी सरकार सत्तेतून गेल्यानंतर, भाजप-नेतृत्वात बदल झाले. त्यावेळी अडवाणींची पंतप्रधान होण्याची मनीषा कायम होती. पण, भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी, नंतर राजनाथ सिंह आदी नेत्यांकडे दिले गेले. त्याच वेळी गुजरातमधून मोदींनी अप्रत्यक्षपणे अडवाणींच्या पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेला आव्हान दिले होते. संघातही नेतृत्वबदल झाला होता आणि मोहन भागवत यांना अडवाणींपेक्षा मोदी अधिक जवळचे वाटले. त्यांनी मोदींच्या बाजूने कौल दिला. हा भाजपच्या नेतृत्वातील बदल भाजप केंद्रात सत्तेत नसताना झाला. त्यावेळी भाजपला पुन्हा केंद्रात सत्ता मिळाली असती तर कदाचित वाजपेयीच पंतप्रधानपदी कायम राहिले असते. त्यामुळे आत्ताही २०२९ मध्ये भाजपला केंद्रात सत्ता मिळाली तर मोदीच पंतप्रधानपदी कायम राहण्याची अधिक शक्यता आहे. भाजपच्या कोणत्याही नेत्याला खासगीत विचारले तर, मार्गदर्शक मंडळाचा ‘नियम’ मोदींना थोडाच लागू होतो, हीच प्रतिक्रिया असते. भागवतांनी सप्टेंबरमध्ये सरसंघचालकपद सोडले तरच मोदींच्या जागी दुसरा कोणी येऊ शकेल. पण तशी कोणती शक्यता आत्ता तरी दिसत नाही.
निवृत्तीनंतरचे अमित शहा
भागवतांचे विधान आणि मोदींचे वारसदार यांची दिल्लीत चर्चा सुरू असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील कार्यक्रमात राजकारणातील निवृत्तीवर भाष्य केले. मी निवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे यांच्या अभ्यासामध्ये आणि नैसर्गिक शेती करण्यात घालवेन, असे शहा म्हणाले. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कधीही स्वत:हून निवृत्त होत नसतात. शहांसारखा महत्त्वाकांक्षी राजकीय नेता सहजासहजी निवृत्त होणार नाही हे कोणीही सांगू शकेल. शहांच्या मनात आले म्हणून त्यांनी निवृत्तीचे विधान केले असेल यावर कोणाचा विश्वास बसण्याची शक्यता नाही. मग, जाहीरपणे शहांनी असे विधान कशासाठी केले असेल असा प्रश्न निर्माण होतो. मोदींच्या भाजपमध्ये संघटनेचे काम शहांनी करायचे आणि नेतृत्व मोदींनी करायचे हे ठरलेले आहे. वाजपेयींच्या काळात सरकार वाजपेयींनी सांभाळायचे आणि पक्ष अडवाणींनी बघायचा, हे ठरले होते. या रचनेमध्ये संघाने बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आव्हान दिले जाईल, असा अप्रत्यक्ष इशारा शहांनी या विधानातून दिलेला असावा असे दिसते.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून प्रामुख्याने शहा आणि संघ यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची बाब लपून राहिलेली नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील व्यक्ती शहांना आव्हान देणारा असू शकत नाही, तसा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, हे शहांनी एकप्रकारे स्पष्ट केले असे म्हणता येऊ शकेल. ७५ व्या वर्षी निवृत्ती भाषा केली तरी कोणी मोदींच्या भाजपमधील स्थानाला धक्का लावू शकत नाही, त्याप्रमाणे शहांच्याही भाजपमधील वर्चस्वालाही नाही, हा संदेश शहांनी दिलेला आहे. हे पाहता नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना तडजोड केली जाईल हेही शहांच्या विधानावरून दिसू लागले आहे.
आत्ता मोदी सरकारमध्ये आणि शहा संघटनेमध्ये अशी सत्तेची विभागणी झाली असली तरी, मोदींचा उत्तराधिकारी म्हणून काही नेत्यांचा संघामध्ये विचार केला जात असल्याचे सांगितले जाते. मोदींनंतर कोण, या उत्तरामध्ये शहांचे नाव नेहमीच घेतले जाते. त्यांच्या बरोबरीने देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ या दोघांचाही पर्याय संघासमोर असू शकतो असे मानले जाते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले निवृत्तीसंदर्भातील विधान याच पर्यायाकडे अंगुलीनिर्देश करणारे असल्याचे मानले जात आहे. वाजपेयी-अडवाणी केंद्रातील सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये नव्या पिढीकडे नेतृत्व दिले गेले. त्याची पुनरावृत्ती नजिकच्या भविष्यात होऊ शकते.
दिल्लीआधी राज्यांकडे लक्ष
शहा, फडणवीस आणि योगी हे तीनही नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये असू शकतात. फडणवीस व योगी हे दोन्ही महत्त्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानपद मिळवण्यासाठी आपापली राज्ये आपल्यासाठी सुरक्षित असली पाहिजेत, हे दोन्ही नेते जाणतात. मोदींनी दिल्लीत येण्यापूर्वी गुजरात स्वत:साठी सुरक्षित केले होते. गेल्या ११ वर्षांत मोदींनी गुजरात आपल्या हातात ठेवलेला आहे. तसेच फडणवीस यांना महाराष्ट्र आणि योगींना उत्तर प्रदेश आपल्या हातात ठेवावे लागणार आहे. त्यादृष्टीने हे दोन्ही नेते एक-एक पाऊल पुढे टाकताना दिसतात. त्याद्वारे स्वतंत्रपणे शहांना आव्हान देत असतात. शहांच्या निवृत्तीच्या विधानाचा संदर्भ या तीन नेत्यांच्या एकमेकांमध्ये होत असलेल्या स्पर्धेशीही जोडता येऊ शकतो. पण, २०२९ची लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असेल तर फडणवीस आणि योगी या दोघांनाही आपापल्या राज्यांवर कब्जा मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो. फडणवीस व योगी यांना दिल्लीत आणले जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत असल्या तरी, दोघांसाठी दिल्लीत येणे म्हणजे शहांना बळ देण्याजोगे ठरेल हे दोन्ही नेते जाणतात.
ही सगळी राजकीय परिस्थिती पाहता सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निवृत्तीच्या विधानाचा अर्थ संघ पुढच्या पिढीतील नेत्यांकडे पाहू लागला आहे; पण मोदींची सलग चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्यावरच त्यावर निर्णय घेतला जाईल, एवढाच निघू शकतो.