अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साम्यवादी, सर्वोदयी, समाजवादी, काँग्रेसी आदी विचारधारा या समाजासाठी कष्टल्या. त्यांची समाजहिताची तळमळ नाकारता येण्यासारखी नाही. तथापि परस्परांविषयीच्या समज-गैरसमजांतून हे गट फारसे एकत्र आले नाहीत, हेही वास्तव आहे. या सर्वानी एकत्र येऊन कार्य करायला हवे. त्याचे नेमके कारण विनोबा सांगतात.

स्वराज्य मिळाले पण त्यातही जनतेचे दैन्य तसेच कायम राहिले. कोणत्याही मार्गाने या जनतेला या दैन्यातून आपली सुटका करून घ्यायची आहे. ती घायकुतीला आल्याने विचार करण्याची शक्ती गमावून बसली आहे. कोणती राजकीय विचारसरणी आपल्या हिताची आणि कोणती अहिताची हे जाणून घेण्याची सवडही तिच्याकडे नाही. त्यामुळे नवसाला पावला तो देव मानण्याची तिची स्थिती झाली आहे.

किशोरलाल मश्रूवाला यांच्या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी भारतीय जनतेच्या समस्यांचा वेध घेतला आहे. भारतीय जनतेच्या  दैन्याचे वर्णन करून तेवढय़ावरच विनोबा थांबत नाहीत तर त्यावर उपाय सुचवतात. पुढे जाऊन त्या उपायांच्या अंमलबजावणीच्या दिशेने प्रयत्नही करतात. विनोबांनी या अनुषंगाने केलेले चिंतन अत्यंत महत्त्वाचे आहे. ते त्यांच्याच शब्दांत-

‘सुदैवाने एवढय़ा आपत्तीतही जनतेचे हृदय अजून शाबूत आहे. खेडोपाडच्या लोकांची अशीच श्रद्धा आहे की आमची कधीकाळी सुटका होणार असेल तर ती गांधींच्या मार्गानेच होईल. आजचे सरकार गांधींच्या सहकाऱ्यांचे सरकार आहे. देशातील सर्वात मोठी संघटना जी काँग्रेस आहे तीही गांधीजींनीच वाढविलेली आहे. सर्वोदयवाले रचनात्मक कार्यकर्ते तर गांधी विचारांचे बिरुद मिरवणारे आहेत. हिंदूस्थानचे समाजवादीदेखील गांधीजींचीच प्रजा आहेत. आणि या देशात सत्याग्रही समाजवाद स्थापन करण्याची त्यांची घोषणा आहे.

हे दोघे, तिघे, चौघे सारे एकवटून आपापल्या शक्तीनुसार, आपापल्या वळणास धरून, पण सहविचाराने जनतेच्या सेवेस भिडले तर दैन्य, दारिद्रय़, दु:ख कुठे तोंड दाखवू शकेल? पण आज या चौघांनी चार वाटा धरल्या

आहेत. आणि तो पाचवा धावून येत आहे. कोण तो पाचवा?

उपनिषदांच्या भाषेत ‘मृर्त्यु धावति पंचम:’ एक म्हणतो ‘माणसे अक्षरश: उपाशी मरू लागली.’ दुसरा उत्तर देतो ‘उपाशी नाही मरत ती, काही तरी रोगानेच मरत आहेत.’ उपाशांनाही मरणापूर्वी कोणता तरी रोग गाठतो! पण म्हणून मी कोणाला दोषही देत नाही आणि निराशही होत नाही; दोष एवढय़ासाठी देत नाही की देश मोठाच आहे. त्याचे प्रश्नही मोठे आहेत तर मतभेद मोठे असल्यास नवल नाही. निराशही होत नाही. माझ्या हाती कुदळी असताना मी निराश का होईन!’

विनोबा निराश नाहीत कारण त्यांच्या हातात कुदळी आहेत. या कुदळी म्हणजे काय? एका प्रसंगी ते म्हणाले होते की माझ्यानंतर जो येईल तो कुदळ हातात घेईल. याला व्यापक संदर्भ आहे.

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave lectures on peace zws
First published on: 07-07-2022 at 01:04 IST