‘हो झालो, कानामागून येऊन तिखट झालो. उठाव करण्याची धमक होती म्हणून राज्याचे सर्वोच्च पदही मिळवले. त्यासाठी अंगी धाडस असावे लागते. नुसते वचावचा बोलून होत नाही. यातला एकही गुण अंगी नाही आणि निघाले आव्हान द्यायला. आता यांना जागा दाखवायचीच’ असा विचार करत एकनाथराव दिवाणखान्यात आले. तेवढ्यात नरेश मस्के आले. ‘आता त्या नवी मुंबईतल्या गणेशाचे विसर्जन करायचेच. काय वाटेल तो राडा झाला तरी चालेल पण धडा शिकवायचाच.’ एकनाथरावांचे हे संतापयुक्त उद्गार ऐकून नरेशभाऊ आनंदले व नाईकांच्या वक्तव्याचा कसा प्रतिवाद केला ते सांगू लागले. हे ऐकून न ऐकल्यासारखे करत एकनाथराव पुन्हा बोलू लागले.

‘अरे, मुख्यमंत्री पद गेले म्हणून मला काय कमजोर समजायला लागलेत का हे लोक. भलेही दुसऱ्या नंबरवर असलो तरी भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात अजून तेवढीच इज्जत आहे माझी. चाणक्यांच्या दरबारात आजही सहज प्रवेश मिळतो मला. या नवी मुंबईवाल्यांना चाणक्य ओळखतात तरी का? म्हणे, लॉटरी लागली. अरे महाभागा, कष्टाने बंड करून मी सारे काही मिळवले. आयते काहीच नाही मिळाले. योग्य शब्दही धड वापरता येत नाही व निघाले टीका करायला? मी आघाडीतून बाहेर पडलो नसतो तर सत्ताच आली नसती व यांना मंत्रीपदसुद्धा मिळाले नसते. हे साधे वास्तव न कळणारे काय कामाचे? आता पालिकांचे घोडामैदान जवळच आहे.

दाखवतोच यांना शिंदे काय चीज आहे ते. मला आव्हान देण्याची हिंमतच मग करणार नाही कुणी. युतीच्या वाईटावर टपलेल्या त्या संजयला तर मोकळे रानच मिळाले. आपण विरोधकांच्या हाती कोलीत देतोय हे कळत नसेल तर तू म्हणालास तसे त्यांच्या ‘बुद्धीची नाठी’च झालेली. मात्र यापुढे असे म्हणू नको. मीही साठीचा झालो हे लक्षात असू दे. (मस्के चमकतात) भलेही माझे पद गेले असेल पण उपद्रवमूल्य अजिबात कमी झालेले नाही. चाणक्यांनी शांत बसायला सांगितले म्हणून चूप आहे. नाही तर थेटच अंगावर घेतले असते. यांच्या मागे कुणाचा आशीर्वाद आहे ते ठाऊक आहे मला. थोडी ग्रहदशा बरोबर झाली की दाखवतोच एकेकाला.

माझी कमाई काढतो काय? म्हणे, कसे कमावले किती कमावले व किती टिकवले? अरे जे काही कमावतो ते अनीतीने नाही तर नीतीने. अधिकृतपणे व्यवसाय करून. आणि कमावलेले वाटतोसुद्धा! म्हणून तर अल्पावधीत पक्ष नंबरवन झाला. तुम्हाला तर ‘वाटणे’ ठाऊकच नाही. तुमची कमाईची तऱ्हा वेगळी. जे काही कमावतो ते बघू दे ना जनतेला. काय भीतो की काय? माझ्या लाखो लाडक्या बहिणींना ठाऊक आहे सगळे. म्हणून तर विश्वास टाकला माझ्या नेतृत्वावर. ‘मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर’ असे आज दिसत असले तरी भविष्य उज्ज्वल आहे माझे. एकदा का माझी पुनर्स्थापना झाली की मग असे बोलण्याची हिंमत तर होणारच नाही.

उलट येतील लाळ घोटत. अरे, छप्पन लोक एकट्याच्या बळावर निवडून आणले. स्वत:च्या मुलाला, तेही दुसऱ्या पक्षातून निवडून आणता आले नाही आणि चालले मला अक्कल शिकवायला.’ तेवढ्यात फोन वाजला. पलीकडे चाणक्य आहे हे कळताच एकनाथराव आत गेले. कुणी काहीही बोलले तरी तुम्ही उत्तर द्यायचे नाही असा संदेश मिळाल्यावर ते पुन्हा बाहेर आले व मस्केंना म्हणाले ‘सध्या तरी त्यांच्या नादी लागू नको.’ मस्के जाताच त्यांना प्रश्न पडला. ‘श्रेष्ठी नेमके आहेत तरी कोणाच्या बाजूने?’