नवरा बायकोला का मारत असेल हा प्रश्न विचारला तर त्याची हजार कारणं हिरिरीने सांगितली जातील. पण बायको नवऱ्याला मारत असेल तर त्याचं एक तरी पटेल असं कारण सांगता येईल का? सगळ्या जगासमोर पत्नीकडून श्रीमुखात पटकावणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना, इमॅन्युएल माक्राँ यांना ते सांगता आलं आहे आणि एकजात सगळ्या पुरुषांना ते पटलंही आहे म्हणतात.
झालं असं की व्हिएतनामधील हनोईच्या दौऱ्यावर असलेले इमॅन्युएल माक्राँ विमानातून खाली उतरण्याच्या तयारीत विमानाच्या दारात उभे होतेआणि दाराच्या चौकटीच्या आतल्या बाजूने एक हात आला आणि माक्राँ यांच्या गालावर फटका बसला. एरवी बातम्यांच्या जगात वावरणाऱ्यांच्या दृष्टीने हे मोठे घबाडच. कारण कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ते मात्र स्कूप असं शिकतच ते मोठे झालेले असतात. आणि इथे तर एका राष्ट्राध्यक्षाच्या बायकोने सगळ्यांसमोर नवऱ्याच्या श्रीमुखात दिली होती. त्यानंतर परीटघडीच्या चेहऱ्याने अध्यक्ष महोदय पायऱ्या उतरायला सरसावले, तेवढ्यात ब्रिजिट माक्राँ पुढे आल्या आणि नवऱ्याने पुढे केलेला हात झिडकारून पायऱ्या उतरायला लागल्या.
जगातील तमाम नवरोबांचे दिल गार्डन गार्डन झाले म्हणे हे दृश्य बघून. त्यातले कित्येकजण मनातल्या मनात म्हणालेसुद्धा की म्हणजे हा जगासमोर मोठा फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष म्हणून (नसलेल्या) मिशीला तूप लावून फिरतो, पण यालाही बायकोच्या तालावर नाचावंच लागतं की. आम्हाला कधीतरी घरात एखादी श्रीमुखात बसत असेल तर याला विमानात. आमच्यापेक्षा काही फार वेगळी नाही याची परिस्थिती. हा आमच्यातलाच. फक्त आमचं आपलं घरातल्या घरात मिटतं, याचा बिचाऱ्याचा जगभर बोभाटा…
पण काही भोचकरावांना मात्र ब्रिजिटबाईंनी इमॅन्युएलरावांच्या श्रीमुखात का लगावली असेल, नेमकं काय घडलं असेल याची भारी उत्सुकता लागून राहिली. त्यांनी आपापल्या परीने शोधलीही कारणं… कुणाला समजलं की हनोईमध्ये शॉपिंग करायचं नाही म्हणजे नाही, अशी ब्रिजिटबाईंना तंबी दिली गेली होती म्हणजे इमॅन्युएलरावांकडून. विमानातून उतरायच्या आधी त्यांनी त्याची आठवण करून दिली. कुणाच्या मते ब्रिजिटबाईंना अजिबात व्हिएतनाममध्ये वगैरे यायचं नव्हतं. पण आपल्या कामात बायकोचं पर्यटन उरकून टाकायची इमॅन्युएलरावांची चलाखी शेवटच्या क्षणी ब्रिजिटबाईंना समजली आणि त्यांनी तिची तिथल्या तिथे परतफेड करून टाकली.
काही भोचकराव आणखी खोलात गेले तर त्यांना या भांडणामागे इमॅन्युएलराव आणि ब्रिजिटबाई यांची आगळीवेगळी ‘लव्हस्टोरी’ असल्याचं लक्षात आलं. इमॅन्युएलराव १५ वर्षांचे होते आणि फ्रेंच शिकत होते तेव्हा ब्रिजिटबाईंचं वय होतं ४० वर्षे आणि त्या इमॅन्युएलरावांच्या शिक्षिका होत्या. दोघंही प्रेमात पडले आणि पुढे विवाहबद्ध झाले. काहींच्या मते त्या काळात इमॅन्युएलरावांनी न केलेला गृहपाठ, अधूनमधून मारलेली दांडी, वर्गात केलेला दंगा हे सगळं आठवलं की ब्रिजिटबाईंमधली शिक्षिका जागी होते आणि मग बसतात फटके. पण जगातल्या सगळ्या नवरोबांना काहीही वाटो… इमॅन्युएलरावांनी मात्र ती सगळी गंमतजंमत चालली होती, बायकोने मला लाडाने फटका दिला असं एकदम शहाण्या नवऱ्यासारखं स्पष्टीकरण देऊन टाकलं आहे.