पक्षाकडून काही ‘वाईट’ निर्देश आले तर प्रकृती ठीक नाही म्हणून झोपले आहेत, असे सांग अशी सूचना सहायकाला देत व तो ‘रमी’वाला फोन स्वीच ऑफ करत माणिकराव खोलीत शिरले. तिथे त्यांचे चार विश्वासू सहकारी आधीच बसलेले होते. कुणाचाच फोन सुरू नाही याची खातरजमा केल्यावर दाबून ठेवलेला राग उफाळून आला. ‘‘माझ्यासारख्या एका ‘साध्या व सज्जन’ माणसाला बदनाम करण्याचे षडयंत्र जाणीवपूर्वक रचले जात आहे. मी मात्र याला पुरून उरणार म्हणजे उरणार. काय तर म्हणे आता ‘रम-रमा-राम’च्या ऐवजी ‘रम-रमा-रमी’. अरे कशाला असले उद्योग करता? त्या दि. रामराव आदिकांच्या पंगतीत मला कशाला बसवता? मी ना ‘रम’वाला आहे ना ‘रमा’वाला. हो खेळलो रमी.
जुगार खेळणे ही मानवामध्ये आढळणारी निसर्गदत्त भावना आहे. आखाड सुरू झाला व पोळ्याचे वेध लागले की सर्वजण खेळतात. त्यात गैर काय? काय पैसे लावून खेळलो काय? त्या रमीची जाहिरात करणारा अन्नू कपूर मला खूप आवडतो. दिसतोही माझ्याच सारखा. म्हणून कधीमधी खेळत असतो मी. जुगार खेळणाऱ्या माणसाचा मेंदू स्थिर राहतो. विविध कल्पना सुचतात. चांगल्या वाईटाचा विचार करण्यास मेंदूची ही स्थिती उत्तम मानली जाते. आरोप करणाऱ्यांना हे मेंदूचे मानसशास्त्र कसे कळणार? काय तर म्हणे मोराचा केका मंजूळ आणि यांचा ‘कोका’ कर्कश. अशी वाईट विधाने यांना सुचतातच कशी? अरे, माझ्याइतका सभ्य कृषिमंत्री तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.
मी नेहमी खरे तेच बोलतो. कृषीकर्जाचे पैसे शेतकरी लग्नासाठी खर्च करत नाही काय? करतातच ना! आजकाल शेतीत काहीच पिकत नाही. मग काय ढेकळाचा पंचनामा करणार का असे मी उद्वेगाने म्हणालो ते शेतकऱ्यांची भावना व्यक्त व्हावी यासाठीच. तरीही माझ्यावर टीका कशासाठी? एक रुपया भिकारीही घेत नाही, आम्ही विमा दिला यात गैर काय? ही वस्तुस्थिती मांडणे शेतकऱ्यांचा अपमान कसे ठरू शकते? मी ग्रामीण भागाचा प्रतिनिधी आहे. माझे बोलणेही त्याच ढंगाचे असणार हे माध्यमे समजून का घेत नाही? आजकाल शेती करणे हाच मोठा जुगार झालाय. शेतीत कशाची म्हणजे कशाचीच हमी देता येत नाही. जुगारात जसे लोक हरतात तशीच शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
जिंकणारे शेतकरी फार थोडे. जुगारात जिंकण्याचे कौशल्य आत्मसात केले तर शेतीत त्याचा फायदा होईल अशी आशा बाळगून हा खेळ खेळला तर त्यात वाईट काय? त्यावरून एवढा गहजब कशासाठी? शेतीच्या समस्येचे उत्तर अलीकडे कुणालाच मिळेनासे झाले आहे. मग त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून बघितले तर त्यात अडचण काय?’’ बोलता बोलता माणिकरावांना धाप लागली. मग पाण्याचा एक घोट घेऊन ते शांत झाले. हीच संधी साधून त्यांचा एक सहकारी म्हणाला.
‘‘बरे झाले तुम्ही किमान आमच्यासमोर तरी खरे बोललात. हे बदनामीचे शुक्लकाष्ठ टाळायचे असेल तर एक उपाय आहे’’ हे ऐकताच त्यांच्यासह सारेच सरसावून बसले. मग तो म्हणाला ‘‘आपल्याला पूर्वासुरींच्या अतृप्त आत्म्यांचा त्रास भोगावा लागतोय. म्हणून या अडचणी निर्माण होताहेत. अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे याआधीच्या कृषिमंत्र्यांना वादातून घरी जावे लागले. यावर मात करायची असेल तर नारायणनागबळीची पूजा करायला हवी. तेव्हाच आत्मे शांत होतील.’’ हे ऐकताच साऱ्यांचे डोळे चमकले. मग माणिकराव व त्यांचे विश्वासू तातडीने त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले.