‘बिहारचे तरुण कल्पक असून आमच्या सरकारने इंटरनेट स्वस्त केल्याचा फायदा घेत अनेकांनी ‘रिळ’ बनवून कोट्यवधींची कमाई सुरू केली आहे. यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे’ विश्वगुरूंच्या या भाषणाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याचे बघून पक्षाच्या दिल्ली मुख्यालयात खलबते सुरू झाली. दीर्घ चर्चेनंतर या भाषणाचा तरुणांवर नेमका काय प्रभाव पडला याची पाहणी करण्यासाठी ‘मर्जीतल्या’ पत्रकारांचा एक गट राज्याच्या दौऱ्यावर पाठवण्याचे ठरले.
हा गट पाटण्याच्या विमानतळावर पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. त्यातले पत्रकार (?) पाहणीसाठी बाहेर पडले तेव्हा पहाटेचे दोन वाजले असूनही रस्त्यांवर वाहनांची नाही तर तरुणांची गर्दी होती. त्यातला प्रत्येकजण सुचेल त्या विषयावर रिळ बनवण्यात व्यग्र होता. त्यातले अनेक तरुण मनाप्रमाणे रिळ बनवून झाली की ‘विश्वगुरू की जय’ असे नारे देत होते. हे बघून सुखावलेल्या पत्रकारांच्या गटाने त्यातील काहींना बोलते केले. ‘आम्ही आता रिळच बनवणार, उगीच कामधंद्यासाठी परराज्यात जाणार नाही. यात प्रचंड पैसा आहे हे विश्वगुरूंनीच सांगितल्यामुळे व आमचा त्यांच्यावर कमालीचा विश्वास असल्यामुळे दिवसातून चार रिळ असे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.’
एका तरुणाच्या या वक्तव्यावर पत्रकाराने विचारले ‘इतके विषय तुम्हाला सुचतात कसे?’ त्यावर ‘बिहारची संस्कृती, लिट्टी-चोखा, आलू, गंगामैय्या असे अनेक विषय आहेत’ असे उत्तर मिळाले. मग दुसरा पत्रकार वदला, ‘पण प्रत्येक रिळ चालेलच व पैसे मिळतील असे नाही. त्याचेही काही नियम आहेत.’ यावर सारे तरुण एकजात म्हणाले. ‘विश्वगुरूंनी सांगितले ना! मग बस. आम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार.’ त्यावर थोडा बाजूला उभा असलेला एक तरुण म्हणाला. ‘या पैशाचे १५ लाखांच्या जुमल्याप्रमाणे झाले नाही म्हणजे मिळवली.’ हे ऐकताच तरुणांनी त्यालाच बडवायला सुरुवात केली. ज्यांचे हात पोहचत नाहीत त्यांनी लगेच मारहाणीची रिळ बनवणे सुरू केले.
हे बघून पत्रकारांनी काढता पाय घेतला. मग हा गट राज्यभर फिरला तेव्हा स्वस्त मोबाइलच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे त्यांना आढळून आले. विरोधकांच्या ‘महागठबंधन’ने सासारामला एक बेरोजगारांची रॅली ठेवली होती. तिथे मोठ्या संख्येत तरुण जमले, रॅली सुरू झाल्यावर त्यांनी घोषणा देण्याऐवजी रिळासाठी चित्रीकरण करणे सुरू केले. त्यामुळे रॅलीचा बार फुसका ठरला. सरकारविरुद्धचा जोश त्यात कुठे दिसलाच नाही. विरोधकांच्या प्रचार सभेला येतो पण चांगला स्मार्ट फोन हवा अशी मागणी तरुणांकडून येऊ लागल्याने तेजस्वीसुद्धा चिंतेत पडल्याचे काहींनी या पत्रकारांना सांगितले. मग हा गट ग्रामीण भागात गेला.
तिथे तर रिळचे वेड दुप्पट वेगाने पसरल्याचे त्यांना दिसले. ‘थ्रील है तो रिल है’ असे नारे देत तरुण कधी रेल्वेरुळांवर आडवे झोपून तर कधी कोसी नदीच्या पात्रात खोलवर पाण्यात जात चित्रीकरण करू लागल्याचे त्यांना ठिकठिकाणी दिसले. मग या गटाने राज्याचा गुन्हे अहवाल तपासला तर रिळच्या नादात २५ पेक्षा जास्त तरुणांना जीव गमवावा लागल्याचे आढळले. आश्चर्य म्हणजे एक-दोन विरोधक वगळता कुणीही हा वेडाचार थांबवा अशी मागणी केली नाही. तृप्त मनाने हा गट दिल्लीला पोहोचला व त्यांनी अहवाल मुख्यालयात सादर केला.
‘बिहारमधील तरुणाई बेरोजगारी, शिक्षण सरकारी नोकरी, अन्याय हे आपल्या विरोधात जाणारे सारे मुद्दे विसरली असून रिळच्या नव्या व्यवसायात व्यग्र झाली आहे. केवळ एका भाषणामुळे पक्षाचा विजय पक्का झाला आहे’ अहवालातील हे निरीक्षण वाचून अख्खे मुख्यालय कमालीचे सुखावले.
