गालिब लिहीत होता तो काळ खडतर होताच पण त्या काळात गालिबचं मोल नीट जोखलं गेलं नाही हेही खरं आहे. व्यक्तिगत आयुष्यात अखेरच्या क्षणी असंख्य अडचणी होत्या, अभावही होते. डोक्यावर कर्जही होतं, पण या सर्वांवर मात करून गालिब नावाचा सर्जनशील कोंब सतत लवलवत राहिला.
दिल्लीच्या चांदणी चौकात गजबजलेल्या वातावरणातून माग काढत बल्लीमारान भागात आल्यानंतर जुन्याच भिंतीवर एक कोरीव दगडावरचा तपशील दिसतो. ‘हवेली मिर्झा गालिब’! रस्त्यात काही क्षण निवांत उभं राहून संपूर्ण मजकूर वाचताही येत नाही, एवढी वर्दळ त्या ठिकाणी असते. गल्लीतल्या चिंचोळ्या रस्त्यावर मोठी वाहनं अजिबात येऊ शकत नाहीत. पण पायी चालणाऱ्यांची गर्दी, या गर्दीतून वाट काढत जाणाऱ्या सायकल रिक्षा, असा सगळा कलकलाट आजूबाजूला असतो. या कथित हवेलीच्या दर्शनी भागावर लक्ष वेधून घेईल असं आकर्षक काहीच नाही. दगड आणि विटांचे बांधकाम असलेल्या कमानी प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दिसतात रंग उडालेल्या भिंती. एखाद्या जुन्या जादूई वास्तूसारखं मंतरलेलं वातावरण. छताला टांगलेल्या रंगीबेरंगी दिव्यांमधून झरणारा मंद प्रकाश. याच भिंतींवर डकवलेले काही शेर, गालिबची चित्रं, थोडीफार माहिती.
उग रहा दर ओ दिवार पे सब्जा गालिब
हम बयाबाँ में है और घर में बहार आई है
भिंतीतून हिरवळ उगवत आहे. आम्ही सुनसान जंगलात आहोत आणि घरात बहार आली आहे. असं कधीकाळी या कवीने लिहून ठेवलेलं. गालिबचं या घरातलं वास्तव्य १८६० ते १८६९ या काळातलं. तसा हा त्यांच्या आयुष्याचा अखेरचा काळ. १८६२ साली दिल्लीत अतिवृष्टीने सगळीकडे वाताहत झालेली. अनेकांचे संसार वाहून गेले. गालिब यांच्या घरालाही या पडझडीची भीती होतीच. त्याच वर्षी एका नातेवाईकाला त्यांनी जे पत्र लिहिलं. त्यात म्हटलं होतं, ‘‘मी या इथं खूप त्रासात आहे. भिंती खचल्या आहेत. न्हाणीघराचीही तीच गत. छत सारखं गळत आहे. दिवाणखाण्याची अवस्था तर आणखीच वाईट. छताची जणू चाळणी झाली आहे. दोन तास जर पाऊस पडला तर चार तास छत गळत राहतं.’’ तेच हे घर पाहताना गालिबच्या शायरीचा अमल मनावर असतोच.
खरं तर या जागेचा पांग अगदी दीड दोन दशकांपूर्वी फिटलेला आहे. त्याआधी तिथं लाकडांचे ढिगारे आणि कोळशांची वखार होती. हा शोध घेतला गीतकार गुलजार यांनी. ‘असदुल्ला खान गालिब का पता मिलता है’ ही त्यांची कविता प्रसिद्ध आहे. ‘बल्ली मारान के महल्लो की वो पेचीदा दलीलों की सी गलियां’ अशी त्या कवितेची सुरुवात. वर उल्लेख केलेल्या त्या घराच्या छताचा संदर्भ. जे दोन तासांच्या पावसानंतर चार तास गळत राहतं. ‘उसी छलनी सी छत की अब मरम्मत हो रही है/सदी से कुछ ज्यादा वक्त आने में लगा अफसोस है मुझको/असल में घर के बाहर कोयलों के टाल की स्याही लगी थी वो मिटाने थी/उसी में बस कई सरकारें बदली हैं तुम्हारे घर पहुंचने तक’ … याच वास्तूत आता गुलजार यांनी दिलेला गालिबचा अर्धाकृती पुतळा आहे. भगवान रामपुरे हे त्याचे शिल्पकार…आता देशभरातून गालिबच्या कवितेवर प्रेम असणारा कुणी ना कुणी त्या ठिकाणी येऊन जातो.
गालिब त्याच्या शायरीतून आठवत जातो. त्याच्या वेगळेपणाबद्दल खुद्द त्यानंच लिहून ठेवलंय. हैं और भी दुनिया में सु़खन-वर बहुत अच्छे / कहते हैं कि ‘़गालिब’ का है अंदाज़-ए-बयाँ और… किंवा स्वत:बद्दलच सांगताना ‘पूछते हैं वो कि ‘़गालिब’ कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाएँ क्या’ अशा ओळींमधून गालिबचं स्वत्व झळकत राहतं. त्याच वेळी मीरचा त्यांच्यावर असलेला प्रभावही बरंच काही सांगून जातो. ‘रेखता के तुम ही उस्ताद नही गालिब, कहते है अगले जमाने में कोई मीर भी था’ या त्यांच्या ओळींमधून मीरबद्दलचा आदरभाव प्रकट होतो. ज्या काळात गालिब लिहीत होता तो काळ खडतर होताच पण त्या काळात गालिबचं मोल नीट जोखलं गेलं नाही हेही खरं आहे. व्यक्तिगत आयुष्यात अखेरच्या क्षणी असंख्य अडचणी होत्या, अभावही होते. डोक्यावर कर्जही होतं पण या सर्वांवर मात करून गालिब नावाचा सर्जनशील कोंब सतत लवलवत राहिला. ही कविता दुर्बोध आहे, समजायला सोपी नाही म्हणून त्यांच्या काळातल्या समकालीनांनी या कवितेवर काही प्रश्नचिन्ह उभे केले. ज्या काळात ही कविता लिहिली जात होती त्या काळात त्या कवितेचं मूल्यमापनही नीट झालं नाही पण नव्या पिढ्यांनी ते मोल केलं. कविता हा केवळ भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार नाही तर त्यात एखादा विचारही प्रकाशमान होतो याची जाणीव गालिबच्या लेखनातून होत राहते. हे लेखन वाचकाला नवी दृष्टी देतं. ही शायरी वाचताना एक नवाच पैलू गवसतो. खुद्द गालिबला झपाटून टाकणाऱ्या असंख्य गोष्टी होत्या. ‘हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले / बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले’ हे शब्द केवळ गालिबचे राहत नाहीत तर ते झपाटलेल्या सगळ्यांचेच होतात. जणू आपल्याच मनातल्या भावना इथं व्यक्त झाल्या आहेत. हे आपल्यालाच सांगायचं होतं पण ते नेमक्या शब्दांत ते इथं उमटलं आहे. असं प्रत्येकालाच चांगल्या कवितेबद्दल वाटत असतं. ‘उन के देखे से जो आ जाती है मुँह पर रौऩक / वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है’ या ओळीसुद्धा म्हणूनच प्रत्येकाला आपल्या वाटतात.
गालिब यांचा जन्म झाला आग्रा इथं. वडिलांचे निधन झाले तेव्हा ते केवळ चार वर्षांचे होते. वयाची नऊ वर्षेही पूर्ण झाली नव्हती तर गालिब यांनी फारसीमध्ये कविता लिहायला सुरुवात केली होती. १३ वर्षे पूर्ण होण्याआधी गालिब यांचं लग्न नवाब इलाही बक्ष यांच्या उमराव बेगम या मुलीशी झालं. काही काळानंतर त्यांनी आग्रा सोडलं, ते दिल्लीत राहायला आले. उत्तर प्रदेशातलं रामपूर, बनारस, कोलकाता अशा अनेक शहरांमधील त्यांचं वास्तव्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करणारं होतं. जीवनाचा असा एखादाही पैलू नसेल ज्यावर गालिब यांच्या शायरीने भाष्य केलं नाही.
आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना आजारपणाने ग्रासले. आहारही कमी झाला. अंगाला थरथर सुटली. अशक्तपणा आला. हात कापत होते. नजर मंद झाली होती. शेवटच्या काळात पत्रलेखन थांबले. अन्य कुणाकडून ते पत्र लिहून घेत असत. शेवटी त्यांनी जाहीर केले, आता सगळीकडून पत्राची उत्तरे मागितली जात आहेत. दुरुस्तीसाठी काही रचनाही येत आहेत. मलाच अगतिक वाटते. मी आता निराश झालो आहे. मी वृद्ध आणि दुबळा ठरू लागलो आहे. बिछान्याला खिळून आहे. कानाने ठार बहिरा, डोळ्यांनी आंधळा झालो आहे. त्याकाळी अनेक जण गालिब यांच्याकडे दुरुस्तीसाठी आपल्या रचना पाठवत असत. अवलोकनासाठी किंवा अभिप्रायासाठी आलेल्या कविता कुठे ठेवल्या हेही त्यांना शेवटच्या काळात आठवत नसायचे. स्मरणशक्ती क्षीण झाली होती. भेटायला येणाऱ्यांना ते म्हणत ‘माझे हाल मला काय विचारता, एक-दोन दिवसांनी माझ्या शेजाऱ्यांना विचारा.’ मृत्यूची भीती नव्हती. उलट मृत्यूसंबंधी चिंतन करणाऱ्या त्यांच्या काही रचना या आध्यात्मिक पातळीवर जाणाऱ्या आहेत. १८६९ च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. निजामुद्दीन औलिया दर्ग्याजवळच्या कब्रस्तानात त्यांना दफन करण्यात आले. साहित्यातला भारतीयता हा विशेष समजून घ्यायचा असेल तर गालिब यांची शायरी अनुभवणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
गालिबच्या सगळ्याच रचनांचा अगदी सहज अर्थ लागतो असे नाही. पण जगातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याची शायरी वाचली जाते. गुलजार यांच्याच रचनेतील ही ओळ आहे… ‘जमाना हर जुबान में पढ रहा है अब तुम्हारे सब सुखन गालिब, समझते कितना है, ये तो वही समझे या तुम समझो’
