‘‘साहित्य म्हणजे ललित असा ग्रह करून घेणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांना हे लक्षात येत नाही की, वैचारिकता आणि लालित्य यांचे जेथे सामरस्य असते, असे वाङ्मय विश्ववाङ्मयात उच्चतम मानले जाते,’’ या गोष्टीकडे लक्ष वेधत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेले एक भाषण उल्लेखनीय ठरते. हे भाषण त्यांनी दक्षिण मराठी साहित्य संमेलन, मिरजमधील एका परिसंवादात केले होते. हे संमेलन २७ व २८ डिसेंबर, १९५४ला संपन्न झाले होते.

तर्कतीर्थांच्या मतानुसार, ‘‘ललित वाङ्मय व वैचारिक वाङ्मय यांच्या सीमारेषा एकमेकांपासून विलग दाखविणाऱ्या सापडणे फार कठीण आहे. ‘ज्ञानेश्वरी’ याचे उत्तम उदाहरण होय. नैतिक व आध्यात्मिक विचारांचे उच्चतम सुवर्णशिखर म्हणून मी मराठी भाषेच्या या आद्या व वंद्या विजयस्तंभास प्रणाम करतो. विश्वसाहित्यात ‘बायबल’, डांटेकृत ‘दिव्य सुखात्मिका’ (डिव्हाईन कॉमेडी), अॅरिस्टॉटलची ‘काव्यमीमांसा’सारख्या साहित्यकृती ललित व वैचारिकतेचा मिलाफ म्हणून श्रेष्ठ ठरतात.

ललित साहित्यात भावनेचे महत्त्व असते, तर वैचारिक साहित्यात बुद्धीचे. ललित साहित्य सुंदर भावना निर्माण करते, तर वैचारिक साहित्य तर्क. भावना व तर्क दोन्हींची माणसास गरज असते; पण जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते ते विविध ज्ञान-विज्ञानांनी. पदार्थविज्ञान, समाजविज्ञान, जीवविज्ञान, मानवविज्ञान या भौतिक विद्या होत. यांचा अंतर्भाव वैचारिक साहित्यात केला जातो. आज अशा साहित्याची आपणास अधिक गरज आहे.’’

वर्डस्वर्थने काव्याचे वर्णन ‘ज्ञानाचे विमलतर चैतन्य’ (फाइनर स्पिरिट ऑफ नॉलेज) असे केले आहे. ते केवळ ललित साहित्याचे नाही. वैचारिक साहित्य कृतीपण तितक्याच श्रेष्ठ असतात, हे लक्षात घेऊन मराठी साहित्याने वैचारिक साहित्यनिर्मिती व त्याच्या समृद्धीकडे लक्ष पुरविले पाहिजे.

‘‘भावना (इमोशन) हा मनुष्य व मनुष्येतर पशुसृष्टी यांचा एक सर्वसाधारण असा लघुत्तम धर्म आहे. विचार किंवा बुद्धिप्रधानता हा मानवाचा असाधारण धर्म होय. मनुष्यास विश्व सतत बदलण्याची व त्यात नवनिर्मिती करण्याची गरज आहे. त्याशिवाय त्याला जगण्याचा अधिकार नाही. शब्दसंकेत व अन्य प्रकारचे संकेत निर्माण करूनच विचार करणे माणसाला शक्य झाले आहे. मानवी मेंदू हा संकेत निर्माण करणारा कारखाना आहे. जीवन व विश्व नित्य गतिशील व परिवर्तनशील आहे. त्यांचे सतत बदलणारे सांधे जुळविण्याची क्रिया करण्यातील यश या संकेताश्रित विचाराने (डिस्कर्सिव्ह थॉट) प्राप्त होते. ज्ञानसाधनेचे कार्य शब्दसंकेताच्या आश्रयाने माणसास यशस्वी रीतीने करता येऊ लागले; वर्तमान व भूतकाळातील अनुभव व ज्ञान यांचा संचय शब्दसंकेताच्या योगाने सुलभ रीतीने करता येऊ लागला व अंधकारमय भविष्यकाळाचा ठाव घेणारी मशाल (टॉर्च-लाइट) या नात्याने विचार हा शब्द संकेतांद्वारे समर्थ झाला. विचारार्थ निर्माण झालेले शब्दसंकेत भावनांचा वा वासनांचा अर्थ सांगण्यास उपयुक्त झाले. शब्दांनी भावही आणि विचारही व्यक्त होतो. भाव व विचार यांची भाषेत सरमिसळ झालेली असते. भावना (इमोशन) व इच्छाशक्ती (विल) यांना सोडून विलग असा विचार राहू शकत नाही. परंतु, भाषारूपाने व्यक्त झालेली भावना व इच्छाशक्ती ही विचारावाचून पृथक् असू शकते.

परंतु भाषा जेव्हा वाङ्मयाचा आकार (फॉर्म) घेते, तेव्हा वाङ्मयाला वैविध्यही प्राप्त होते. वस्तूचे शुद्ध व मोकळे, म्हणजे भावनामय व इच्छामय नसलेले रूप जाणण्याची माणसाला गरज असते. इच्छाशक्ती व भावना यांना पार्श्वभूमीत बाजूस सारून केवळ ज्ञानालाच महत्त्व देण्याची आवश्यकता असते. विचार हाच जेथे प्राधान्याने अभिप्रेत असतो, असे वाङ्मय म्हणजे वैचारिक वाङ्मय होय. अशा अवस्थेत शब्द हा स्वत:मध्ये असलेले मनातील वासनांचे व भावनेचे रंग वस्तूला लागणार नाहीत. वस्तू जशीच्या तशी प्रतीत होईल, याची काळजी घेतो. स्वत:चा स्पर्श होऊ न देता अलिप्तपणे वस्तुदर्शन घडवितो. अशा स्थितीतही जे वैचारिक वाङ्मय किंवा शास्त्र निर्माण होते, त्यासही अलौकिक सौंदर्य लाभू शकते, हे मात्र येथे ध्यानात घेतले पाहिजे.’’ तर्कतीर्थांचे हे विचार समाजोन्नतीसाठी महत्त्वाचे ठरतात.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com