‘‘टिळकांच्या निष्ठेला अपवाद नाही. इतरांच्या लेखनात हे अपवाद मधूनमधून आढळतात. टिळकांच्या लेखांत लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य केव्हाही खाली जात नाही. परकीय पारतंत्र्याच्या विरुद्ध लढण्याचा बाणा कोठेही वाकत नाही. अंतिम स्वार्थत्यागाची प्रतिज्ञा कोठेही सुटत नाही वा मर्यादित होत नाही. याच्या उलट इतरांच्या लेखनात असे क्वचितच घडलेले दिसते. टिळकांची स्वराज्याची प्रतिज्ञा ही भीष्मप्रतिज्ञा आहे, या प्रतिज्ञेने स्वत:चे मरण डोळ्याने पाहिले आहे. त्यामुळे टिळकांचे लेखन हे भारताच्या उद्याोगपर्वापर्यंतच्या स्वातंत्र्ययुद्धाचे गद्या महाकाव्य बनले आहे.’’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘लोकमान्य टिळक लेखसंग्रह’च्या ६१ पानी दीर्घ प्रस्तावनेचा समारोप करताना काढलेले हे उद्गार म्हणजे या लेखसंग्रहातील लोकमान्य टिळकांच्या लेखनातून त्यांना उमजलेले टिळकांचे व्यक्तिमत्त्वच! या लेखसंग्रहात तर्कतीर्थांनी ‘केसरी’मधील निवडक लेखन संपादित करून सादर केले आहे. हा लेखसंग्रह साहित्य अकादमीने संपादित करून घेऊन प्रकाशित केला होता.

सदर लेखसंग्रह संपादित करताना तर्कतीर्थांनी जे सात विषय विभाग पाडले आहेत, त्याआधारे ते विषय पुढीलप्रमाणे होते – लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’तील लेखनाची चिकित्सा केली आहे. (१) आधी सामाजिक की राजकीय, (२) स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क, (३) काँग्रेस अर्थात् राष्ट्रीय सभा, (४) हिंदू-मुस्लीम संबंध, (५) परतंत्र भारताच्या आर्थिक समस्या-शेती, स्वदेशी व बहिष्कार, ६) शैक्षणिक प्रश्न व राष्ट्रीय शिक्षण, ७) संकीर्ण- (अ) शिवाजी उत्सव, गणेशोत्सव व राष्ट्रीय उत्सवांची आवश्यकता, (ब) धर्म व तत्त्वज्ञान, (क) कै. महादेव गोविंद रानडे, स्वामी विवेकानंद, आगरकर व गोखले. या सात विभागांत ‘केसरी’मधील टिळकलिखित ८० लेखांचा समावेश या लेखसंग्रहात केला आहे. तर्कतीर्थांनी या लेखांचा विस्ताराने परामर्ष घेतला आहे. टिळक युगात चार विचारधारा भारताच्या राजकीय पटलावर सक्रिय होत्या- (१) क्रांतिकारी, (२) समाजसुधारणावादी, (३) सामाजिक व राजकीय सुधारणा समांतर करू इच्छिणारी, (४) भारतीय अधोगतीस परकीय सत्ता जबाबदार मानणारी. लोकमान्य टिळक चौथ्या विचारधारेचे प्रतिनिधी होते. तरी त्यांना सशस्त्र क्रांतीचे समर्थक मानले जाई. तर्कतीर्थांनी लेखसंग्रहाच्या आपल्या या प्रस्तावनेत टिळक चरित्रकार धनंजय कीर, प्रा. य. दि. फडके तथा पगडी प्रभृतींच्या मतांचे खंडन करून लोकमान्य टिळकांना गांधीमार्गाचे पहिले उपासक सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर टिळक युगातूनच गांधीयुगाचा प्रारंभ झाला, हे स्पष्ट केले आहे. ‘मी जे लिहीन ते कायद्याच्या सीमेत राहून लिहीन,’ हा टिळकांचा बाणा अधोरेखित केला आहे. तर्कतीर्थांनी अन्य एका ठिकाणी महात्मा गांधी नि लोकमान्य टिळक यांच्यातील फरक सांगत म्हटले आहे की, ‘लोकमान्य कायदा मानत, तर महात्मा गांधी कायदेभंगाची स्वीकृती व समर्थन करीत.’

‘लोकमान्य टिळक लेखसंग्रहामध्ये लोकमान्यांच्या लेखनाच्या विशेष अनुभूतीची शुद्धता सांगून ती प्रा. बा. सी. मर्ढेकर वर्णित ‘वाङ्मयीन महात्मता’ असल्याचे नमूद केले आहे. ही महात्मता महात्मा गांधींच्या लेखनातही दिसते, हे सांगण्यास तर्कतीर्थ विसरत नाहीत. लेखसंग्रहातील मोठा हिस्सा तर्कतीर्थांनी लोकमान्यांच्या राजकीय भूमिकेच्या विश्लेषणावर खर्च केला आहे. तो तात्त्विक व तार्किक आहे, परंतु संकीर्णमधील लेखनाच्या समीक्षेत लोकमान्यांची सामाजिक बांधिलकी स्पष्ट होते. त्यामुळे लोकमान्यांचे सर्वंकष व्यक्तिमत्त्व या लेखसंग्रहातून उभे राहते. लोकमान्य आणि राष्ट्रीय काँग्रेस, लोकमान्य व ब्रिटिश, लोकमान्य व गांधी, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, हर्बर्ट स्पेन्सर, स्वामी विवेकानंद असा अनुबंधही यातून प्रतिबिंबित होतो. समग्रत: हा लेखसंग्रह व त्याची प्रस्तावना म्हणजे लोकमान्यांची संयमित व संतुलित चिकित्सा होय. ती टिळक चरित्राचे नवे पैलू वाचकांसमोर मांडते.

बालपणी साप्ताहिक ‘केसरी’च्या सार्वजनिक प्रगट वाचनातून तर्कतीर्थांवर झालेला प्रभाव इतका होता की, लक्ष्मणशास्त्री जोशी ‘तर्कतीर्थ’ पदवी धारण करण्यासाठी काशीस निघाले होते, तेव्हा प्रथम त्यांनी पुण्याच्या गायकवाड वाड्यात जाऊन लोकमान्यांचे आशीर्वाद घेतले.

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com