लग्नापेक्षा प्रेम आणि बंधनापेक्षा स्वातंत्र्य प्रिय मानणारी एलोइज ही केवळ रोमँटिसिझमचं उदाहरण नव्हे; स्त्रीवादाचीही अग्रदूत ठरते…‘I preferred love to wedlock, freedom to a bond.’ – Héloï se इतिहासात माणसांचं प्रोग्रामिंग करून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अनेक प्रयोग झालेले आहेत, होताहेत आणि होत राहतील. पण इतिहास साक्ष आहे की माणूस कुठल्याही एकजिनसी धार्मिक, नैतिक, सामाजिक चौकटीत बंदिस्त होणारी वस्तू नाही. दिक्कालात आढळणारी विविधता मानवी स्वातंत्र्याचं प्रतिबिंब आहे. माणसांसाठी बाह्य अवकाश मुक्तिदायी नसतो तेव्हा ते स्टोइकांसारखे फक्त अंतरंगात स्वातंत्र्याचे प्रयोग करतात. पण कॅथोलिक चर्च वा अन्य कुठली पारलौकिक चौकट अंतरंगाचाही ताबा घेऊ पाहते तेव्हा मात्र मनुष्याच्या स्वातंत्र्याचं दमन, विकृतीकरण होऊन माणसं परात्मतेत जगू लागतात. अशा परात्मवादी वातावरणात स्वातंत्र्याचं दमन आणि विकृतीकरण होतं. स्वातंत्र्य मरत नाही! कारण प्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ ज्याँ पॉल सार्त्र म्हणतो त्याप्रमाणे ‘आपल्याला स्वातंत्र्याचा शाप आहे’. जाणिवेत नाही तर नेणिवेत स्वातंत्र्याचा भार सहन करावाच लागतो. थोडक्यात, माणसं स्वातंत्र्याला मारक ठरणाऱ्या चौकटींचं कधी उघडपणे तर कधी भूमिगत राहून उल्लंघन करत आली आहेत. मध्ययुगात मानवी प्रेमाला मध्यवर्ती स्थान देणारी ट्रिस्टन आणि इझल्टची काल्पनिक प्रेमकथा चर्चच्या चौकटीचं सतत उल्लंघन करताना दिसते. खरंतर हे उल्लंघन फक्त काल्पनिकतेपुरतं मर्यादित न राहता वास्तवातही अभिव्यक्त होताना दिसून येतं. उदाहरणार्थ, १२व्या शतकातल्या एलोइज या विलक्षण बुद्धिमत्ता आणि व्यासंग असलेल्या महिलेचं जीवन आणि तिचे स्वातंत्र्य, प्रेम, मैत्री, विवाहसंस्था, धर्म इत्यादी विषयांवरले प्रखर विचार मध्ययुगाविषयीच्या पारंपरिक एकजिनसी धारणेचा पुनर्विचार करायला भाग पाडतात.

एलोइज आणि आबेलार यांच्या अजरामर प्रेमाची सत्यघटनेवर आधारित कहाणी सर्वश्रुत आहे. विशेष म्हणजे एलोइज आणि पिएर (इंग्रजीत पीटर) आबेलार हे जोडपं तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्रांमध्ये पारंगत असल्यानं त्यांचं विद्रोही जीवन आणि विचार चर्चच्या आवारात आणि चर्चच्या विरोधातील विद्रोह ठरतो. त्या दृष्टीनं त्यांची जाणीवपूर्वक कृती आधुनिकतेची ठिणगी समजली जाते. त्यातही, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एरवी सत्तारूढ वर्गातील पुरुषांचाच आवाज ध्वनित होतो. स्त्रिया आणि कष्टकरी बहुसंख्य लोक तत्त्वज्ञानाच्या परिघाबाहेरच आढळतात. मात्र १२व्या शतकात उमराव वर्गात जन्मलेली एलोइज ही महिला अधिकारवाणीने तत्त्वज्ञानात तिचे विचार मांडताना दिसते. ही दुर्मीळ घटना आधुनिकतेची नांदी मानली जाते. मध्ययुगातली आधुनिकतेची ही नांदी समजून घेण्यासाठी प्रस्तुत लेखात एलोइज आणि आबेलार यांच्याविषयी चर्चा करू.

ज्ञानव्यवहारातलं स्थित्यंतर

पाश्चात्त्य जगात १२व्या शतकापासून नागरीकरणाच्या प्रक्रियेला गती प्राप्त होते. तत्कालीन समाजात सगळ्या पातळींवर मूलभूत बदल घडतात. वाढत्या गरजांबरोबर व्यवसायांची संख्या वाढते. जॅक ल गोफ या लेखकानं ‘मध्ययुगातील बुद्धिजीवी’ (१९५७) या पुस्तकात दाखवून दिल्याप्रमाणे १२व्या शतकात ज्ञानव्यवहार चर्चची चौकट ओलांडून खासगी व्यवसाय म्हणून उदयाला येतो. ११व्या शतकापर्यंत चर्चच्या आवारात सेमिनारीज अर्थात धर्मशिक्षण-शाळा होत्या. तिथं धर्मक्षेत्राला जीवन वाहून देणाऱ्यांसाठी मोफत धार्मिक शिक्षण दिलं जाई. १२व्या शतकापासून मात्र उमराव वर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. त्यासाठी ‘लिबरल आर्ट्स’च्या, सेक्युलर समजले जाणारे सात विषय शिकवणाऱ्या नवीन प्रकारच्या शिक्षकांची संख्याही वाढते. अनेक शिक्षक धार्मिक शिक्षणाबरोबरच उमराव वर्गातल्या विद्यार्थ्यांना खासगीरीत्या लिबरल आर्ट्स शिकवत असत. पिएर आबेलार हा या दुहेरी ज्ञानव्यवहाराचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

पिएर आबेलार (१०७९ – ११४२) हा प्रसिद्ध फ्रेंच धर्मशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ नोत्र दाम कॅथेड्रलमध्ये धर्मशास्त्राचं अध्यापन करत असे. आबेलारला पहिला आधुनिक तत्त्वज्ञ समजलं जातं. कारण त्याआधी धर्मसूत्रांवर फक्त भाष्य करणं अभिप्रेत होतं. आबेलार मात्र धर्मशास्त्राच्या मूलभूत चौकटीलाच प्रश्नांकित करतो. त्यामुळे त्याचा उल्लेख ‘१२व्या शतकातला देकार्त’ असादेखील केला जातो. प्रसिद्ध फ्रेंच लेखक मिशले त्याचं वर्णन ‘बौद्धिक स्वातंत्र्याचा अग्रदूत’ असंदेखील करतो. धर्मशास्त्रांची स्वतंत्रपणे चिकित्सा करून आबेलारनं ‘Theologia Summi Bonni’ हा प्रबंध लिहिला, म्हणून चर्चनं त्याला बहिष्कृत केलं होतं. खरंतर अशा प्रखर बुद्धिवादामुळे आबेलार दोनदा बहिष्कृत झाला आहे. त्यानं प्रतिपादित केलेला नॉमिनलिझमचा सिद्धांत चर्चसाठी अडचणीचा ठरला, कारण हा सिद्धांत शब्दप्रामाण्य आणि एकूणच चिद्वादाला सुरुंग लावून आधुनिकतेचा निर्देश करणारा ठरतो.

दुसऱ्या बाजूला, उच्चभ्रू उमराव वर्गात जन्मलेली एलोइज (११०० -११६३) एका प्रतिष्ठित कॉन्व्हेन्टमधील शिक्षण इ. स. १११५ च्या सुमारास पूर्ण करते. तिच्या विधवा आईनं स्वत:ला धार्मिक कार्याला वाहून घेतल्यामुळे एलोइज तिचा मामा फुलबेरकडे लहानाची मोठी झालेली असते. एलोइज लॅटिन, ग्रीक, फ्रेंच आणि काही प्रमाणात हिब्रू भाषेतही पारंगत होती. तत्कालीन लिबरल आर्ट्सच्या Trivium आणि Quadrivium मध्ये प्रावीण्य अवगत केल्यामुळे पॅरिसमध्ये एलोइजला फार कमी वयात ख्याती प्राप्त झाली होती. तत्कालीन दस्तऐवजांमध्ये तिचा उल्लेख ‘nominatissima’ अर्थात नामवंत म्हणून केलेला आढळतो. एलोइजच्या ठायी उत्कट ज्ञानलालसा असली तरी तिला अधिकृतपणे परंपरेनुसार उच्चशिक्षण घेणं शक्य नव्हतं. एकेदिवशी कॅथेड्रलमध्ये प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि विद्यार्थीप्रिय प्रोफेसर पिएर आबेलारचं व्याख्यान ऐकल्यावर फुलबेर १६- १७ वर्षांच्या एलोइजच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवतो.

फुलबेर पॅरिसमध्ये महत्त्वाच्या प्रशासकीय पदावर होता. तो आबेलारची राहण्याची व्यवस्था नोत्र दाम कॅथेड्रलच्या शेजारी स्वत:च्या घरी करतो. एलोइज चिकित्सक बुद्धी आणि विचारस्वातंत्र्य जागृत ठेवून तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचं अध्ययन करते. मात्र कालौघात हळूहळू १७ वर्षांची एलोइज आणि ३६ वर्षांचा आबेलार यांच्यामध्ये एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होऊन उत्कट प्रेमकथेला सुरुवात होते. आबेलार फक्त पादरी, तत्त्वज्ञ आणि प्रोफेसर नसून उत्कृष्ट कवी आणि गायकही असतो. एलोइज- आबेलार यांच्यातलं प्रेम फक्त प्लेटॉनिक नव्हतं. त्यांच्या प्रांजळ पत्रांतून लक्षात येतं की त्यांनी प्रेमाच्या सगळ्या संभाव्य छटा अनुभवल्या होत्या. त्याच दरम्यान एलोइजला दिवस जातात. पॅरिसमध्ये ही बातमी कानोकानी होण्याआधी आबेलार तिला त्याच्या बहिणीकडे ब्रिटनी प्रांतात रवाना करतो. फुलबेर आबेलारवर अपहरणाचा आरोप करतो, तेव्हा आबेलार फुलबेरला वस्तुस्थिती कळवतो. फुलबेरसाठी हा घराण्याच्या इभ्रतीचा प्रश्न असल्यानं तो आबेलारला एलोइजशी लग्न करायला सांगतो. आबेलार पादरी असल्यानं विवाह करू शकत नव्हता. म्हणून तो गुप्तविवाहाचा मधला मार्ग सुचवतो.

मात्र एलोइज दोन पुरुषांनी तिच्या विवाहाविषयी घेतलेल्या निर्णयाला सपशेल नकार देते. खरंतर ती विवाहसंस्थेलाच दमनकारी ठरवते. तिच्या पत्रात ती स्पष्ट करते की तिनं लग्न, प्रतिष्ठा, संपत्तीसाठी आबेलारशी प्रेम केलेलं नाही. विवाह तर ती प्रेम या भावनेला मारक ठरवते. एलोइज स्पष्ट शब्दात कळवते की, तिला लग्नापेक्षा प्रेम आणि बंधनापेक्षा स्वातंत्र्य प्रिय आहे! स्त्रीस्वातंत्र्याच्या या कृतिशील पुरस्कारामुळे एलोइज पाश्चात्त्य विश्वात स्त्रीवादाचीदेखील अग्रदूत ठरते.

त्याची ‘कर्मकहाणी’; तिची दृढ इच्छा…

एका बाजूला फुलबेरचा वाढता क्रोध; तर दुसऱ्या बाजूला आबेलारचं करिअर आणि प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. वाढत्या दबावामुळे शेवटी एलोइज गुप्तपणे विवाह करून पॅरिसला परत येते. फुलबेर मात्र दिलेला शब्द पाळत नाही. तो तिच्या विवाहाची बातमी सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतो तेव्हा एलोइज विरोध करते. तिला फुलबेरकडून मारहाण होते. फुलबेर तेवढ्यावर न थांबता आबेलारलाच धडा शिकवण्यासाठी पॅरिसमधल्या खाटकांना सुपारी देतो. आबेलारच्या नोकराला लाच देऊन रात्रीच्या वेळी ते मारेकरी आबेलारला त्याच्या खोलीत एकटं गाठून क्रूरपणे त्याचं गुप्तांग छाटून काढतात. या ऑनर किलिंगच्या क्रूर घटनेतून आबेलारला वाचवण्यात येतं. पण वयाच्या ४०व्या वर्षी घडलेल्या या क्रूर घटनेनंतर एलोइज आणि आबेलार त्यांच्या प्रेमकहाणीला पूर्णविराम देऊन धर्मक्षेत्रात प्रवेश करतात. आबेलारला त्याच्या बिशप होण्याच्या स्वप्नावर पाणी सोडून तब्बल २० वर्षं वेगवेगळ्या मठांमध्ये एकाकी जीवन जगावं लागतं. त्यादरम्यान एका बाजूला तो धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञानावर स्वतंत्रपणे मूलगामी चिंतन करतो. दुसरीकडे भूतकाळाविषयी प्रायश्चित्तही करतो. या घटनाक्रमाचा तपशीलवार वृतान्त आबेलारनं त्याच्या ‘ The Story of My Misfortunes’ या प्रायश्चित्तपर स्वकथनात दिला आहे.

मात्र एलोइज शेवटपर्यंत तिच्या प्रेमावर ठाम राहिली. उपरोक्त घटनेनंतर त्यांच्यात वीस वर्षं पत्रव्यवहार चालू होता. त्यांच्या पत्रांमध्ये आबेलारचं दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व आणि एलोइजमधली बंडखोरी नजरेस पडते. तिच्या लिखाणात पावलोपावली सामाजिक बंधनांचं ओझं जाणवतं. पश्चात्तापाचा लवलेशही जाणवत नाही. हे मात्र तितकंच खरं की आबेलारवर झालेल्या अत्याचारानं आणि मानखंडनेनं तिला फार वेदना होतात. आबेलारच्या मृत्यूनंतर ती त्याच्या अंत्यविधीची काळजी घेते. तिच्या मृत्यूनंतर तिला आबेलारच्या सोबतच पुरण्यात यावं अशी इच्छा व्यक्त करते. त्यामुळे आबेलारच्या मृत्यूपश्चात वीस वर्षांनतर तिचा मृत्यू होतो तेव्हा तिला आबेलारच्या शवपेटीतच पुरण्यात येतं. मध्ययुगात आधुनिकतेची मशाल ठरलेल्या या अजरामर जोडप्याचं थडगं पॅरिसच्या पेर-ला-शेज या प्रख्यात दफनभूमीत आहे.

लक्षणीय बाब म्हणजे हृदयाचा आदेश अंतिम मानून त्यावर ठाम राहिल्यानं एलोइज अठराव्या शतकातल्या रोमॅन्टिसिझमचा जनक रूसो याच्यासाठी महत्त्वाची प्रेरणास्राोत ठरते. एलोइजच्या जीवनाला प्रेरणा मानून रूसोनं ‘Nouvelle Héloïse’ नावाची जगविख्यात कादंबरी लिहिली आहे.

लेखासोबतची प्रतिमा : ज्याँबाप्टिस्ट गोये यांचे ‘एलोइज व आबेलार’ तांब्याच्या पत्र्यावर तैलरंग (१८२९); विकिपीडियावरून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sharadcrosshuma@gmail.com