मूळ बातमी – कराडच्या प्रीतिसंगमावर अजितदादा व रोहित पवारांची अचानक भेट झाली. ‘ढाण्या थोडक्यात वाचलास. मी एक सभा घेतली असती तर तुझा पराभव निश्चित होता. आता काकाच्या पाया पड’ असे दादांनी सुनावताच रोहित त्यांच्या पाया पडले व आशीर्वाद घेतले.

बित्तंबातमी क्रमांक एक – यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर दादा गाडीत बसले तशी त्यांच्या मनात विचारांची गर्दी होऊ लागली. ‘त्याला बघताक्षणी असा राग आला. वाटले बोलूच नये पण राजकारणात सुसंस्कृतपणा जपा असे सांगणाऱ्या नेत्याच्या स्मृतिस्थळी आहोत, हे लक्षात येताच स्वत:ला आवरले. तरीही ‘ढाण्या’ म्हणत टोला लगावलाच. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा असतो हेच ठाऊक नाही आजच्या पिढीला. सोबत आला असता तर मंत्री केले असते. आता बसेल पुन्हा ईडीची पीडा सहन करत. सत्तेचे महत्त्व नव्या पोरांना समजतच नाही. चौकशीचा ससेमिरा नसला की अगदी शांत मनाने जनतेची सेवा करता येते. या अनुभवापर्यंत पोहोचायला वेळ लागेल या पिढीला. मारे, ८०० किलोमीटर पायी काय फिरला? काय मिळाले त्यातून तर निसटता विजय. एक सभा घ्यायलाच हवी होती कर्जत जामखेडला. पडला असता तर पार्थचा मार्ग आणखी मोकळा झाला असता. यांना वाटले सुप्रिया निवडून आली म्हणजे संपला दादा. अरे, घरातला ज्येष्ठ पुतण्या आहे मी. बोलण्यात असेन फटकळ पण राजकारण जमते मला. आता दिसलेच ना! तत्त्व, विचाराचे राजकारण आता बाद. एका हाताने द्या व दुसऱ्या हाताने काढून घ्या हाच सध्याचा नियम. इंग्रजी पेपर वाचणाऱ्या या पिढीला हे कळायचे नाही. पाच महिने स्वभावाला मुरड घालत खूप सहन केले. आता शांत बसायचे नाही. काकांची भेट थोडक्यात हुकली. भेटतीलच कधीतरी. तो राम शिंदे काहीही ओरडू दे. या साऱ्यांना आता पाणी पाजायचेच. दादा म्हणतात मला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बित्तंबातमी क्रमांक दोन – संगमावरून गाडी बाहेर पडून जामखेडच्या दिशेने धावू लागली तसे रोहितच्या मनात विचारचक्र सुरू झाले. ‘भेटल्यावर शिव्या घालतील की काय असेच वाटले पण ‘ढाण्या’ म्हटले. त्यांचा अधिकार आहेच पण एका पराभवाने कुणाला चूक किंवा बरोबर ठरवणे योग्य नाही. काका ऊर्फ दादांना वाटते आपल्यामुळेच यश मिळाले. अहो, हे भाजपच्या परिश्रमाचे यश. दुसऱ्याच्या पालखीचे भोई का होता? आजोबा ३६व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. तुम्ही साठीला आलात, तरी अजून उपमुख्यच. याला प्रगती म्हणणार का? तुम्ही दिली तत्त्वाला तिलांजली पण मला वैचारिक वारसदार व्हायचे आहे घराण्याचे. उलट तुम्ही सभा घेतली असती तर जास्त फरकाने निवडून आलो असतो. लाडक्या बहिणींचे गोडवे गाता. स्वत:च्या बहिणीसोबत कसे वागलात? लहान असलो म्हणून कुणीही यावे व टपली मारून जावे हे सहन करणाऱ्यातला मी नाही. इतकी वर्षे काकांच्या सावलीत राहूनही वैचारिक उंची का वाढली नाही यावर विचार करा जरा. सत्ता हेच अंतिम ध्येय असे मानणाऱ्यातला मी नाही. भाजपशी जवळीक साधून तुम्ही विस्तवाला जवळ केले. एक दिवस खड्यासारखे फेकून देतील ते. तेव्हा तुम्हाला काका आठवतील. उतारवयात जाणत्यांचे बोट सोडायचे नसते हे संस्कार शिल्लक आहेत आमच्यात. मीही दादा पण भावी पिढीचा. लक्षात ठेवा.’