काय देश आहे हा? स्वातंत्र्याला ७५ वर्षे लोटली, मद्यपानाला ‘सामाजिक मद्यप्राशन’ अशा दर्जेदार नावाने मान्यता मिळाली तरी निवडणुकीच्या प्रचारात दारू राहतेच कशी? म्हणे ते संभाजीनगरहून लढणारे भुमरे दारूवाले. अरे, असतील ते. म्हणून काय वाईट ठरतात का? सरकारचे धोरणच आहे की. दारूविक्रीतून बक्कळ महसूल कमावण्याचे. त्याच धोरणाला अत्यंत नैतिकतेने पुढे नेणारे म्हणून भर प्रचारसभेत भुमरेंचा सत्कार व्हायला हवा. ते सोडून त्यांची बदनामी करण्याचे कारण काय? दारूविक्रेते वाईट, गुटखाविक्रेते त्याहून वाईट. मग चांगले कोण? मोठमोठय़ा कंत्राटात टेबलाखालून भरभक्कम कमिशन घेणारे, राजकारणात नीतिमत्तेचा टेंभा मिरवत गडगंज संपत्ती कमावणारे, त्याचे प्रदर्शन करणारे. असले भ्रष्ट िरगणात असले तरी हरकत नाही पण दारूवाला नको. ही निवडक नैतिकता कधी त्यागणार आपण? बिचारे भुमरे! अहोरात्र झटून केलेला विकास जनतेला सांगायचे सोडून दुकाने किती, महसूल किती याची उत्तरे देत फिरत आहेत. हा अन्याय नाही का ? नाइलाजाने त्यांनाही खैरेंचे ‘पाणी’ काढावे लागले. कमिशनखोरीचा आरोप करावा लागला. हे किती वाईट!
दारू व पाण्याची तुलना झाली असेल अनेक चित्रपटगीतांमध्ये. पण वास्तवात ते शक्य आहे का? भरपूर लोक म्हणतात पाणी हे जीवन आहे पण काही मोजके म्हणतातच की दारू हेच जीवन म्हणून. निवडणुकीत या दोघांचाही सन्मान राखायचा असतो. तो सोडून हा वाद कशाला? पूर्वी विरोधक सत्तेत असलेल्या काँग्रेसवाल्यांवर दारू वाटण्याचा आरोप करायचे. तेव्हा एक ‘चपटी’ एका मतासाठी पुरेशी ठरायची. नंतर काळाच्या ओघात सारे बदलले. हे वाटप सर्वपक्षीय झाले. आता तर सुज्ञ मतदारांनासुद्धा हे वाटप नकोसे झालेले. त्यांना ‘रोकडा’ हवा असतो. पैसे मोजा, कोणती प्यायची ते आम्ही ठरवू असा सरळ हिशेब. त्यामुळे दारू ही प्रचारातून हद्दपार झालेली. भलेही ती विषारी असेल पण समाजाची त्याकडे बघण्याची दृष्टी विषारी राहिली नाही. हे वास्तव खैरे ध्यानात घेणार की नाही? अगदी पाचच वर्षांपूर्वी त्या विदर्भातल्या चंद्रपुरात भर निवडणुकीत धानोरकर व अहीर यांच्यातला सामना दारूवाला विरुद्ध दूधवाला असा रंगवण्यात आला. शेवटी झाले काय? तर दूधवाला पडला व दारूवाला निवडून आला. त्यामुळे दारू भलेही मद्यपीला फिरवत असेल पण ती प्रचार फिरवणारी राहिली नाही हे समस्त संभाजीनगरकरांनी लक्षात ठेवावे.
भुमरेंनी सुद्धा फार स्पष्टीकरणे न देता गेल्या दोन वर्षांत केलेल्या ‘प्रचंड’ विकासाचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे. दारूवाला पराभूत होण्याचे दिवस गेलेत आता हे मनी असू द्यावे. दारूच्या विक्रीतून पाण्यासारखा पैसा मिळतो हे खरे, पण पाण्याची विक्री न करता केवळ योजना राबवून विनासायास पैसा मिळतो त्याचे काय? ‘पिणारा’ दिसतो पण ‘खाणारा’ दिसत नाही असेच ना हे! किमान भारतात तरी दारू-पाणी यांच्यात वैर उभे केले जाऊ शकत नाही. हे दोन्ही शब्द एकमेकांना पूरक म्हणून टेबलावर वावरत असतात. अनेकदा या दोहोंच्या दिमतीला फसफसणारा ‘सोडा’ असतो. त्यामुळे ते पाणी असो वा दारू, तोंडाला प्याला लावणारे सगळे सारखेच या पद्धतीने दोघांनी प्रचार करावा. राज व समाजमान्यता मिळालेल्या दारूला उगीच बदनाम करू नये. आता दारूचे जनतेशी ‘वैर’ राहिले नाही असा प्रचार भुमरेंनी सुरू केला तर खैरेंची काही ‘खैर’ नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे.