प्रिय शिक्षणमंत्री महोदय, तुम्ही जाहीर केलेल्या पेहरावाच्या निकषाबाबत खरे तर प्रत्यक्ष भेटून चर्चा करायची होती. पण लगेच आचारसंहिता लागल्याने तुम्ही प्रचारात व आम्ही निवडणुकीच्या घाण्याला जुंपलो गेल्याने निवेदन पाठवत आहोत. या गणवेश सक्तीमुळे आम्ही शाळेत शिकवायला जातो की शिकायला असा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यभरात बहुतांश शिक्षक झब्बा, सफारी किंवा पांढरा शर्टपँट घालूनच शाळेत जातात. आता त्यांना शर्ट व पँट वेगवेगळय़ा रंगाचे वापरावे लागतील. ते रंग शाळा व्यवस्थापन ठरवणार असल्याने त्यांचे लागेबांधे असलेल्या दुकानातून निकृष्ट दर्जाचे पण महागडे कपडे शिक्षकांना घ्यावे लागतील. हा आर्थिक भुर्दंड का सहन करायचा?
आधीच आमच्या वेतनातील बरीच रक्कम शासकीय योजनांची माहिती दारोदार फिरून गोळा करताना खर्च होते. आजही ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये सर्वाना गांधीटोपी अनिवार्य आहे. या टोपीचे काय करायचे याचा विचार तुम्ही केलेला दिसत नाही. स्वत:चा नामोल्लेख करताना ‘टीआर’ लिहा ही सूचना अन्यायकारक आहे. अनेक शिक्षक मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांनी ‘शि’ लिहिले तर आणखी गोंधळ उडेल. लोक दक्षिणेतील नावांच्या शैलीनुसार टी. सोनकर, टी. गायकवाड असा पुकारा करून आमची टर उडवतील. ग्रामीण भागात हे लघुरूप ट्रॅक्टर व ट्रकसाठी वापरले जाते. आजकाल तशीही आमची ओळख योजनांचे ओझे वाहणारे अशी झालेली. अनेक शिक्षक हे शिकवण्याचे ‘पवित्र’ काम संपले की भूखंड खरेदी विक्री, बचत व विमा एजंट म्हणून काम करून खर्चाचा मेळ जुळवतात. ही कामे करताना आता ओळख दडवता येणार नाही. सायंकाळी कुठे मेजवानीला जायचे असेल तर ‘टीआर’ लिहिलेला शर्ट बदलावा लागेल. यापेक्षा वकील व डॉक्टरांच्या ओळखीसाठी जसे चिन्ह आहे तसे आमच्यासाठीही निर्माण करा अशी आमची विनंती आहे.
सध्या शाळांमध्ये पदे रिक्त असल्यामुळे आम्ही शिक्षित बेरोजगारांना भाडेतत्त्वावर वर्ग घेण्यासाठी ठेवले आहे. एक शिक्षक आठवडय़ाला ३० तासांपेक्षा जास्त वेळ शिकवू शकत नाही म्हणून ही व्यवस्था. आता त्यांच्याही गणवेशाचा खर्च आम्हाला करावा लागेल. राज्यातील अनेक शाळांमध्ये चिखल तुडवत, नदीनाले पार करत जावे लागते. अशा वेळी तुमच्या आदेशाप्रमाणे बूट वापरले व ते खराब झाले तर त्याची भरपाई कोण देणार हे तुम्ही स्पष्ट केलेले नाही. अनेक शिक्षकांना जेवणानंतर ठेल्यावर जाऊन पान खाण्याची सवय आहे. आता ते गणवेशात जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना पाठवतील. यातून अनर्थ घडेल. एकूणच या सक्तीमुळे शिक्षकांची आधीच खराब झालेली प्रतिमा आणखी खालावण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा निर्णय तुम्ही तात्काळ मागे घ्यावा. पाहिजे तर आणखी काही योजनांचे ओझे आमच्या खांद्यावर टाका. पण गणवेश व गुणवत्ता या नाजूक मुद्दय़ांना हात लावू नका अशी विनंती समस्त शिक्षक बांधवांतर्फे तुम्हाला करीत आहोत.