अगदी मन लावून देशाच्या अर्थकारणाचा गाडा हाकणाऱ्या आपल्या निर्मलाताई खरंच खूप प्रामाणिक आहेत हो! पैसे नाहीत म्हणून लोकसभा लढणार नाही असे स्पष्ट सांगायची हिंमत त्यांनी दाखवली. काय म्हणता? पक्षाजवळ इतका पैसा असताना त्या असे कसे म्हणू शकतात? अरे बाबा, तो पक्षाचा पैसा आहे, त्यांचा नाही. भलेही त्यांच्या अखत्यारीत असलेल्या ईडी व आयकर खात्याने श्रीमंतांच्या दारावर टकटक केल्यावर रोख्याच्या माध्यमातून तो जमा झाला असेल. तसेही ताई विकासासाठी आवश्यक असलेल्या आकडय़ांची जुळवाजुळव करण्यात इतक्या गर्क असतात की त्यांनी निवडणूक रोख्याशी संबंधित एकही बातमी कदाचित वाचली नसेल. त्यामुळे स्वत:कडे पैसे नसले तरी पक्ष खर्च करू शकतो याची त्यांना कल्पना नसेल. तेव्हा त्यांच्या  प्रामाणिक विधानावर चर्वितचर्वण करण्याआधी या शक्यतांवर विचार करा.

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे झेपावत असताना अर्थमंत्री इतक्या गरीब कशा, असले फालतू प्रश्न तर अजिबात नकोत. साधी राहणी व उच्च विचारसरणी हेच ताईंच्या आयुष्याचे ध्येय राहिले आहे. नेमके त्याचेच प्रतििबब त्यांच्या विधानातून उमटले. त्यामुळे इतरांना पोटशूळ उठण्याचे काही कारण नाही. त्यांच्या या विधानामुळे निवडणूक लढायला खूप पैसा लागतो हे सत्य अधोरेखित झाले, असा तर्क काढायचीही गरज नाही. हे वक्तव्य करताना त्यांच्यासमोर आयोगाने खर्चमर्यादेसाठी निश्चित केलेला ९५ लाख हाच आकडा होता. अगदी बालाजीची शपथ!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma economics lok sabha election economy finance minister nirmala sitharaman amy
First published on: 29-03-2024 at 00:08 IST