१४० कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अपघाताची इतकी चर्चा का होते हे माझ्यासारख्या अल्पवयीनाच्या आकलनापलीकडे आहे. रस्त्यावर प्रचंड गर्दी असताना अपघात तर होणारच. माझ्यापुरते म्हणाल तर मी लहानपणापासून अशा दुर्घटना नेहमी बघत आलो. मी माझ्या प्रिय पप्पांसोबत प्रवास करताना अनेकजण आमच्या कारला येऊन धडकायचे. महागडय़ा कारचे नुकसान झाल्यामुळे संतप्त झालेले पप्पा खाली उतरून त्या धडक देणाऱ्याला आधी ठोकायचे. मग पोलीस यायचे. ते पप्पांची समजूत काढून गर्दीतून आमच्या कारला वाट मोकळी करून द्यायचे. त्यामुळे अशा अपघातात कारचालकाचा दोष नसतोच अशी माझी ठाम धारणा आहे. पप्पा मला सांगायचे. ‘बेटा, कार चलाना है तो पुरे स्पीड से चलाओ. तभी तुम प्रगती कर सकोगे.’ त्यापासून प्रेरित होऊन मी बाराव्या वर्षांपासूनच कार चालवायला सुरुवात केली.

शाळेत मला सांगण्यात आले की वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच कार चालवावी. माझ्या मनाला हे कधीच पटले नाही. श्रीमंतांना परवान्यासाठीचे वय १२ करायला हवे. आम्ही बाहेर पडू, पैसा खर्च करू तरच आर्थिक उलाढाल वाढेल. त्याचा समाजातील सर्व घटकांना फायदा होईल. सरकार ही गोष्ट कधी लक्षात घेईल कुणास ठाऊक. कार बनवणाऱ्या कंपन्यांनी वेग वाढविण्याची सुविधा दिलेली असताना तिचा फायदा आम्ही घेतला तर काहीही गैर नाही. पप्पांसारखे श्रीमंत भरपूर कर भरतात. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष सवलतीसुद्धा असायला हव्यात. श्रीमंतांच्या वाहनांसाठी वेगळे व निर्मनुष्य रस्ते हवेत. त्यावर कोणत्याही गरिबाला चालण्याची वा दुचाकी हाकण्याची परवानगी नको. यावर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र पोलीस हवेत. त्यामुळे अपघात होणार नाहीत.

शेवटी श्रीमंतांनी केलेल्या संपत्तीनिर्मितीवरच देश चालतो. माझे पप्पा बिल्डर असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी व राजकारण्यांसाठी घरी होणाऱ्या पाटर्य़ा व त्यात असणारी दारू मी लहानपणापासूनच बघत आलो. त्यामुळे दारूची नव्हाळी मला कधी नव्हतीच. ती पिण्यासाठी परवाना लागतो हेही मला या घटनेनंतर कळले. आमच्यासारख्या तरुणांसाठी या परवान्याची अटसुद्धा नकोच. आम्ही दारूच्या निमित्ताने चार लोकांमध्ये मिसळू तेव्हाच व्यवसायाच्या नवनव्या कल्पना सुचतील व भविष्यात त्याला आकार येईल. दारू कुणी किती घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यामुळे मला दारू दिल्यामुळे कोठडीत जावे लागलेल्या सर्व हॉटेलचालक व मालकांविषयी मला सहानुभूती आहे. त्यांच्या पाठीशी माझे कुटुंबीय खंबीरपणे उभे राहतीलच. याशिवाय पब व हॉटेलमध्ये ज्यांच्याकडे आलिशान कार्स आहेत अशांनाच प्रवेश देण्याचा नियम सरकारने करावा. त्यामुळे मोठय़ांकडून लहानांच्या (म्हणजे दुचाकी) अपघाताचा मुद्दा आपोआप निकालात निघेल.

माझे पप्पा श्रीमंत असल्यामुळेच त्यांना टार्गेट केले जात आहे. हे अपघाताचे राजकारण आहे. त्यामुळे सरकारने मोठय़ा करदात्यांसाठी विशेष सोयीसवलतींचा विचार करून असे प्रसंग टाळावेत. सर्वात शेवटी पोलीस ठाण्यात मला पिझ्झा व बर्गर देणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी आभार व्यक्त करतो.

(पुण्यातील अल्पवयीन कारचालकाने शिक्षा म्हणून लिहिलेला हा निबंध..)

Story img Loader