सरकारची धोरणे जर माणसामाणसांमध्ये भेदभाव करणारी असतील, काही विशिष्ट समूहातल्या नागरिकांवर निव्वळ ‘ते या विशिष्ट समूहात जन्मले’ एवढ्या एकाच कारणासाठी अन्याय करणारी असतील, तर आपण या धोरणांना विरोधच करायचा. सरकार सर्वोच्च म्हणून त्याचे ऐकण्यापेक्षा, अन्याय समोर दिसत असेल तर आपल्या विवेकबुद्धीचेच ऐकायचे आणि सरकारला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करायचे… वाचायला किंवा बोलायलाही सोपा असा हा संदेश ब्रेटेन ब्रेटेनबाख प्रत्यक्ष जगले. मग ‘धोकादायक अतिरेकी’ असा शिक्का त्यांच्यावर दक्षिण आफ्रिकेच्या तत्कालीन वर्णभेदी सरकारने मारला. त्यांना नऊ वर्षांच्या कैदेची शिक्षा फर्मावून तुरुंगात टाकले. पण विचार आणि जगणे यांच्यात तफावत असू नये ही मनोभूमिका कवीच्या संवेदनशीलतेने ब्रेटेन ब्रेटेनबाख जपत राहिले. त्यासाठी परागंदा होऊन फ्रान्समध्ये राहू लागले. २४ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले तेव्हा, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा या दोघांनीही त्यांना आदरांजली वाहिली.

भोवतालाबद्दलची कवीची अस्वस्थता ब्रेटेन यांच्यात पुरेपूर होती. आफ्रिकेच्या वसाहती देशांमध्ये ‘आफ्रिकान्स’ ही गोऱ्या शासकांची भाषा, तर शासित बहुजन समूह आपापल्या टोळीच्या बोलीमध्ये बोलणारे, अशी विभागणी असायची. गोरे आणि काळे असा वर्णभेद तर ठिकठिकाणी होताच. अशा जगण्याला ब्रेटेन ब्रेटेनबाख यांनी ठाम नकार दिला. इंग्रजी अथवा फ्रेंच भाषेत काव्यलेखन करण्याची प्रज्ञा स्वत:कडे असूनही त्यांनी आफ्रिकान्स भाषेतच वंचितांची दु:खे मांडली आणि ही भाषा दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वांचीच आहे- असायला हवी- असा आग्रह या कृतीतून मांडला. १९३९ साली जन्मलेले ब्रेटेन तसे सुखवस्तू कुटुंबातले, त्यामुळे चित्रकला-शिक्षण घेण्यासाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी पॅरिसला जाण्याची चैन ते करू शकले हेही खरे. पण पॅरिसमध्ये व्हिएतनामहून आलेली योलांडे एन्गो थि होन लीन ही तरुणी त्यांची मैत्रीण, प्रेयसी आणि नंतर पत्नी झाली. दक्षिण आफ्रिकेतल्या ‘काळे-गोरे’ वर्णभेदापुढे पेच निर्माण करील, अशी ही सोयरीक ब्रेटेन यांनी केली. पण सरकार बधले नाही. गोऱ्यांनी कोणत्याही अन्य वंशीयांशी लग्नसंबंध करू नयेत, असाच आमच्या नियमांचा अर्थ असल्याचे त्या सरकारने बजावले आणि ब्रेटेन यांना सपत्नीक मायदेशी परतण्यास मज्जाव केला. ही गोष्ट १९६२ सालची.

या अशा सरकारला उलथून टाकण्यासाठी शक्य असेल ते सारे करायचे, अशा निर्धारानेच काही वर्षांनी ब्रेटेन परतले- तेही बनावट नावाने, खोट्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पासपोर्टसह. इथे ‘ओखेला’ ही – काळ्यांच्या संघर्षात त्यांना मदत करणाऱ्या गोऱ्यांची- संघटना स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. नेल्सन मंडेला आदींच्या ‘आफ्रिकन नॅशनल काँग्रेस’ची गौरवर्णीय शाखा म्हणून काम करण्यास ‘ओखेला’ तयार होती. पण काही काळातच ब्रेटेन पकडले गेले, ‘धोकादायक अतिरेकी’ ठरले आणि सलग सात वर्षे त्यांनी कैदेत काढली. याच काळात ‘कन्फेशन्स ऑफ अॅन अल्बिनो टेररिस्ट’ (१९८०) हे आत्मपर, पण प्रेरक पुस्तक त्यांनी लिहिले. सुटकेनंतर १९८५ पासून पुन्हा पॅरिसवासी झालेले आणि फ्रान्सचे नागरिकत्वही घेतलेले ब्रेटेन गप्प बसले नव्हते. स्वत:च्या कविता व गद्यालेखनाखेरीज त्यांनी पॅलेस्टिनी कवी मेहमूद दरविश यांच्या कवितांचे अनुवादही केले. मानवमुक्तीचे काव्य जगणारा कवी त्यांच्या निधनाने हरपला आहे.