‘ते लोक तसलेच’ अशी अवमानकारक टिप्पणी करून केनियाचे माजी पंतप्रधान राइला ओडिंगांच्या अंत्यदर्शनावेळी पोलिसांना गोळीबार करावा लागल्याची बातमी नजरेआड करता येणार नाही… ‘बाबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राइला ओडिंगा यांचा मृतदेह केरळमधून केनियात पोहोचेस्तोवर शोकाकुल केनियन नागरिकांचा जनसागर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उसळला होता. हे सारे लोक ओडिंगांच्या निधनाने आतून उन्मळले होते, त्यांपैकी अनेकांना अश्रू अनावर होत होते. लोकांच्या या भावव्याकुळ लाटांना आवरण्यासाठी अखेर सुरक्षा यंत्रणांना गोळीबार करावा लागला; इतकी जनमान्यता ओडिंगा यांना कशामुळे लाभली असेल?
ओडिंगा केनियाची लोकशाही टिकावी, भक्कम व्हावी, यासाठी प्रसंगी लढाऊ भूमिका घेणारे नेते होते. पण सनदशीर मार्गावर विश्वास आणि संवादावर भर देऊन लोककल्याणाचे राजकारण ही मूल्ये त्यांनी जपली. केनियातल्या लुओ जमातीत त्यांचा जन्म १९४५ मध्ये झाला. वडील जारामोगी ओडिंगा हे केनियाच्या स्वातंत्र्यलढ्यात होते, पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून (१९६३) राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचीच राजवट झाली. केन्याटा यांच्याजागी १९७८ पासून त्यांचेच सहकारी डॅनिएल अराप मोई आले, पण राजवट एकपक्षीय आणि एकारलेलीच राहिली. मधल्या काळात ओडिंगा हे तेव्हाच्या पूर्व जर्मनीला जाऊन, मेकॅनिकल अभियांत्रिकी शिकले होते. मायदेशात १९७० मध्ये परतून त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर बनवण्याचा अवघड व्यवसाय सुरू केला होता आणि त्यांच्या उत्तम अभियांत्रिकी गुणांमुळेच, १९७४ पासून त्यांना केनियाच्या ‘मानक विभागा’त देशातील औद्याोगिक उत्पादनांची गुणवत्ता तपासण्याची सरकारी नोकरीही मिळाली. पण ‘ही खरी लोकशाही नाही’ असे १९७५ ते ७८ या काळात (भारतातही याच काळात राजकीय मंथन सुरू असताना) केनियातील लोकशाहीवादी तरुणांप्रमाणेच ओडिंगांनाही वाटत होते.
केनियातले हे लोकशाहीवादी तरुण १९७८ नंतर एकमेकांशी संपर्कात येऊ लागले. चळवळीच्या त्या पहिल्या पावलांतून ओडिंगांचे नेतृत्वगुणही दिसू लागले. राष्ट्राध्यक्षांकडे सर्वाधिकार देणारी राज्यघटना बदलून पंतप्रधानांच्या लोकनियुक्त मंत्रिमंडळाकडे अधिकार यावेत, हे त्या वेळचे ध्येय होते. पण हा बदल घडणार कसा आणि घडवणार कोण? अखेर १९८२ मध्ये केनियाच्या हवाई दलप्रमुखांकडून मोई यांची अध्यक्षीय राजवट उलथवण्याचा प्रयत्न झाला. पण मोई यांनी तो हाणून पाडला. अधिकाऱ्यांवर कारवाई करतानाच, लोकशाहीवादी चळवळ उभारणाऱ्या नेत्यांनाही लक्ष्य केले. पुढले दशकभर ओडिंगांनी छळ सोसला. आरोपांविना तुरुंगात डांबण्याचे प्रकार तर घडलेच; पण १९९१ मध्ये देश सोडून ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या मध्यस्थीमुळे नॉर्वेत आश्रय घ्यावा लागला. वडिलांच्या ‘फोरम फॉर द रिस्टोरेशन ऑफ डेमॉक्रसी’चे नेते म्हणून ते सहा महिन्यांत परतले. लोकशाहीवादी गटांच्या आघाडीतर्फे १९९३ ची निवडणूक जिंकले, २००१ ते २००५ या काळात मंत्रिपदी काम करताना राष्ट्राध्यक्षांच्या पक्षाशी लोकशाहीवादी आघाडीचा संवाद वाढवून नवी राज्यघटनाही आणू पाहिली. २००८ ते २०१३ या काळात ते केनियाचे पंतप्रधान झाले. २०१७ ची अध्यक्षीय निवडणूक हरल्यावरही त्यांना ‘लोकांचे अध्यक्ष’ जाहीर करण्यात आले , याचा धसका घेऊनच ‘आफ्रिकन राष्ट्र संघा’तील उच्चपदे ओडिंगांना देण्याची खेळी उहुरू केन्याटा (जोमोंचे पुत्र, नवे राष्ट्राध्यक्ष) यांनी केली होती.