‘समाजशास्त्रज्ञाचा प्रत्यक्ष समाजकारणाशी संबंध असायला हवा’ या मताला जागणारे, कोलंबिया विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील सुप्रतिष्ठ प्राध्यापक हर्बर्ट जे. गान्स २१ एप्रिल रोजी निवर्तले. अभ्यासक म्हणून त्यांचा संबंध अमेरिकेबाहेरच्या समाजकारणाशी नव्हता- तो अमेरिकेपुरताच होता- हे खरे असले तरी, समाजशास्त्रज्ञ आणि समाज यांचे नाते कसे असू शकते याचा वस्तुपाठ त्यांनी जगभरासाठी मागे ठेवला आहे. ‘समाजशास्त्रज्ञ आणि माध्यम अभ्यासक’ अशी त्यांची ओळख त्यांच्या मृत्यूनंतर आवर्जून दिली जात असली- आणि ‘डिसायडिंग व्हॉट्स न्यूज’ (१९७९) किंवा ‘डेमॉक्रसी अॅण्ड द न्यूज’ (२००३) या पुस्तकांनी ही ओळख सार्थही केली असली- तरी गान्स यांनी माध्यम-अभ्यास हा समाजाच्या अभ्यासाचाच महत्त्वाचा भाग मानला होता.

नाझी जर्मनीतून आईवडिलांसह १९३९ मध्ये इंग्लंडला, तिथून १९४० मध्ये अमेरिकेला हर्बर्ट गान्स पोहोचले, तेव्हा त्यांचे वय होते १३ वर्षांचे. पुढल्या पाचच वर्षांत त्यांना अमेरिकी नागरिकत्वही मिळाले, पण दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या ‘घरघरी’त त्यांनाही अमेरिकी सैन्यात सामील व्हावेच लागले. यानंतर मात्र ते समाजशास्त्राची पदव्युत्तर पदवी मिळवून, कोलंबिया विद्यापीठाच्याच ‘शालेय शिक्षक प्रशिक्षणालया’त समाजशास्त्र हा विषय शिकवू लागले. एकंदर बरे चालले असतानाही, आपल्या भोवतालाकडे आपण समाजशास्त्रज्ञ या नात्याने पाहतो की नाही, हा प्रश्न त्यांना छळू लागला आणि शहराच्या ‘मुख्य’ भागापासून, करमणुकीच्या ‘चांगल्या’ साधनांपासून दूर- आपल्याच शेजारीपाजारी- राहणारे उपनगरवासी लोक फावल्या वेळात जीव कसा रमवतात, याबद्दलच्या त्यांच्या निरीक्षणांना शास्त्रीय बैठक मिळून ‘रिक्रिएशन प्लॅनिंग फॉर लीझर बिहेवियर’ हा नगर-रचनाकारांना समाजशास्त्रीय सल्ला देणाऱ्या प्रबंधावर गान्स यांनी ‘पीएच.डी.’ मिळवली. अभ्यासाच्या नवनव्या प्रयोगांचे स्वागत करणाऱ्या ‘मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये ते शिकवू लागले आणि काही वर्षांनी ‘कोलंबिया’मधील प्राध्यापकपद त्यांना मिळाले, ते तहहयात.

या ९७ वर्षांच्या हयातीत त्यांनी १२ पुस्तके लिहिली आणि आणखी दोन पुस्तकांचे संपादन केले. कैक अप्रकाशित निबंध त्यांच्या नावावर आहेतच आणि १९४४ पासूनचे हे सारे अभ्यासकी लिखाण आता ‘कोलंबिया विद्यापीठ ग्रंथालया’त संग्रहित आहे. अर्थात, त्यात गान्स यांनी कधीमधी वर्तमानपत्रांमध्ये वाचक-पत्रे लिहिण्याचा क्रमही सुरूच ठेवला होता, ती पत्रे बहुधा या संग्रहात नसावीत- ‘सुपरमॅन’ने अंगावर झूल नसताना ‘पत्रकार लुईस लेन’ म्हणून वावरणे खूप झाले- आता या लुईस लेनने संपादक व्हावे आणि अग्रलेख लिहावेत, अशा गमतीच्या सुरात लिहिलेल्या कुणा लेखावर ‘‘अहो त्याने लिहिलेले अग्रलेख जर, सुपरमॅन म्हणून ज्यांच्याविरुद्ध तो लढतो त्यांच्याविरुद्ध असतील, तर तुमचे मालक त्याला नोकरीवर ठेवतील काय?’’ असे गमतीतलेच, पण घणाघाती पत्र त्यांनी पाठवल्याची आठवण ‘न्यू यॉर्क टाइम्स’ला अद्यापही आहे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९६७ सालात काळे विरुद्ध गोरे असा हिंसक संघर्ष वाढत असताना ‘अनेक राज्यांतली भेदभावकारी धोरणे संपवली नाहीत तर या देशात फूट पडेल’ अशा अर्थाचा स्पष्ट इशारा देणारा त्यांचा अहवाल, हा सामाजिक धोरणाला दिशा देणारा ठरला होता. ‘गरीब गरीबच का राहतात’, ‘कामगार वस्त्या पाडून तिथे ‘चांगली’ घरे बांधण्याचे कारणच काय’ किंवा ‘संस्कृतीसुद्धा पैशात मोजावी का’ यासारखे त्यांनी अभ्यासलेले प्रश्न आजही सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत.