तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे असे श्रीमंतांच्या घरातील मुलांसंदर्भात म्हणतो. संगीत सिवन यांच्या बाबतीत ते हातात कॅमेरा घेऊनच जन्माला आले, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. संगीत सिवन यांचे वडील सिवन हे प्रथितयश छायाचित्रकार आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यामुळे संगीत आणि त्यांचे दोन्ही बंधू संतोष, संजीव तिघेही लहानपणापासून आजूबाजूला असलेल्या कॅमेऱ्यांच्या विश्वातच वावरले. फार लहान वयात त्यांनी कॅमेरा आपलासा केला. संगीत यांनी त्याहीपुढे एक पाऊल जात वेगवेगळ्या शैलींत चित्रपट हाताळण्यावर, पटकथा लेखनावर अधिक भर दिला.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील घराणेशाही ही वेगळ्या अर्थाने फार जुनी आणि परिचित आहे. त्या घराणेशाहीचा वारसा अर्थात सिवन बंधूंकडेही आला. मात्र संगीत यांचा चित्रपट क्षेत्रातला प्रवास छायाचित्रणकार म्हणूनही झाला नाही की दिग्दर्शक म्हणूनही झाला नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी ‘राख’ या त्यांच्या चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता म्हणून संगीत यांच्यावर जबाबदारी सोपवली. आमिर खान, पंकज कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा निर्माता म्हणून पुढे आलेल्या संगीत यांनी त्यानंतर वर्षभराच्या आतच लेखक-दिग्दर्शक म्हणून आपला पहिला मल्याळम चित्रपट ‘व्यूहम’ प्रदर्शित केला.

चित्रपट या माध्यमाची तांत्रिक बाराखडी पक्की असली तरी त्याच्या आशय-विषयाशी खेळण्याची वा त्यात प्रयोग करून पाहण्याची वृत्ती अंगी असावी लागते. ती सहजवृत्ती आणि प्रतिभा दोन्ही संगीत यांच्याकडे होते. त्यामुळे पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षांनी १९९२ मध्ये त्यांनी अभिनेते मोहनलाल यांना घेऊन ‘योद्धा’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली, आजही ‘कल्ट’ चित्रपटांच्या यादीत त्याची गणना होते. रहस्यमय शैलीतील चित्रपटांवर त्यांचा अधिक भर होता. कधी प्रेमकथेला रहस्याची फोडणी तर कधी गुन्हेगारी कथेची रहस्यमय उकल अशा पद्धतीचे त्यांचे ‘गंधर्वम’ आणि ‘निर्णयम’ हे दोन्ही मल्याळम चित्रपट गाजले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दशकभर मल्याळम चित्रपट केल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपट दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला. ‘जोर’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. प्रथितयश कलाकारांच्या मागे न पळता सशक्त कथामांडणी आणि प्रयोगशील दिग्दर्शन याकडे त्यांचा कल अधिक होता. त्यामुळे हिंदीत त्यांनी रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, तुषार कपूर अशा तुलनेने नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट केले. ‘क्या कूल है हम’, ‘क्लिक’, ‘अपना सपना मनी मनी’सारखे विनोदी, भयपट अशा विविध शैलींतील चित्रपट केले. भारंभार चित्रपटांपेक्षा सतत नव्याचा ध्यास घेत प्रयोगशील वृत्तीने चित्रपट करणारा चोखंदळ चित्रपटकर्मी म्हणून संगीत सिवन मल्याळम आणि हिंदी चित्रपटक्षेत्रातही लोकप्रिय ठरले.