संजय उपाख्य भाऊ काणे. नागपुरातील स्टेट बँकेत आकडय़ांशी खेळणारे कर्मचारी. पण आकडय़ांशी खेळता खेळता त्यांना मैदानातील खेळही खुणावत होते. ते वाणिज्य शाखेचे विद्यार्थी. त्यामुळे गणिताची आकडेमोड शिकत असतानाच त्यातली पाच सूत्रे अंगीकारली. अंदाज, नियोजन, संघटन, समन्वय आणि नियंत्रण. पुढे स्वेच्छानिवृत्ती घेऊन,  खेळाडू घडवताना याच पाच सूत्रांची त्यांना मोठी मदत झाली. आधुनिक क्रीडा साधनाची चौफेर टंचाई असतानाही अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भाऊ काणे यांनी निरंतर एका उत्तम, आदर्श प्रशिक्षकाची भूमिका वठवली. परिणाम असा झाला की, आंतरराष्ट्रीय धावपटू चारुलता नायगावकर, अपर्णा भोयर, अर्चना पोटे, संगीता सातपुते, रश्मी भोयर, गायत्री बेदरकर, धनश्री चावजीसारखे अ‍ॅथलिट नावारूपास येऊ लागले.

भाऊंचा जन्म १४ मे १९४९ चा. रामटेकजवळ बोर्डा गावातला. ते राहायचे नागपूरच्या महालातील कोठी रोडच्या एका निमुळत्या गल्लीत. पण, गल्लीत राहणाऱ्या या कार्यकुशल प्रशिक्षकाची स्वप्ने कायमच आकाशाला स्पर्श करीत असायची. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि क्रीडा संघटक म्हणून काम करताना आपल्या आयुष्याची साडेचार दशके दिली. लांब पल्ल्याचे धावपटू तयार करणे सोपे काम नाही. तसेही भाऊंना सोपी कामे मान्यच नव्हती. मैदानात पाय रोवून असलेला माणूसच मैदान गाजवणारे खेळाडू घडवू शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आपल्या कर्तृत्वातून त्यांनी हा विश्वास खरा करून दाखवला. भाऊंनी आपल्या ७५ वर्षांच्या प्रवासात अनेक अ‍ॅथलिट घडवले. त्यासाठी २००९ मध्ये बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाची स्थापना केली. पूर्णवेळ प्रशिक्षकपद स्वीकारले. खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. खेळाच्या माध्यमातूनही समाजाचे ऋण फेडता येते, असे ते नेहमी सांगायचे. त्यांचे खेळाप्रति असलेले हे समर्पण व त्यांनी घडवलेल्या खेळाडूंची कीर्ती बघून १९९२ मध्ये त्यांना राज्य शासनाच्या दादोजी कोंडदेव पुरस्काराने गौरवण्यात आले. नागपूरच्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवात भाऊंना ‘क्रीडामहर्षी’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांचे या क्षेत्रातील योगदान व अनुभव लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. नागपुरातील ३०० पेक्षा अधिक मैदानांचा खेळाडूंसाठी योग्य उपयोग व्हावा, त्या मैदानांवर सराव करून जागतिक कीर्तीचे खेळाडू तयार व्हावे, यासाठी गडकरींनी खास भाऊ काणे यांना निवडले होते. परंतु, नियतीला ते मान्य नसावे. ही मैदाने प्रत्यक्ष आकार घेण्याआधीच भाऊंना आयुष्याचे मैदान सोडावे लागले. ७५ वर्षांचे खेळाप्रति समर्पित असे शानदार आयुष्य जगून भाऊंनी हे जग सोडले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh sanjay kane state bank nagpur amy
First published on: 25-03-2024 at 03:39 IST