‘पोलिसांच्या बदल्या वारंवार करू नका, त्यांना नवनवे प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त करा, दर आठवडय़ाला कामाच्या वेळा बदलताना त्यांना साप्ताहिक सुटी द्या आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यात, स्थानिक निरीक्षक नेमा..’ अशा सूचना अर्थशास्त्राचे ‘नोबेल’मानकरी अभिजीत बॅनर्जी व एस्थर डफ्लो यांच्यासह अन्य दोघा तज्ज्ञांनी राजस्थान पोलिसांना २०१२ मध्ये केल्या, तो अभ्यास राजस्थानच्या पोलीस महानिरीक्षक या नात्याने नीना सिंह यांनी करवून घेतला होताच, पण या अभ्यासनिबंधाच्या पाचव्या तज्ज्ञ म्हणून त्या स्वत: सहभागी झाल्या होत्या. समिती नेमण्याचा उपचार पार पाडण्याऐवजी हा नवा मार्ग सिंह यांनी निवडला होता. या नीना सिंह आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ- सेंट्रल इंडस्ट्रिअल पोलीस फोर्स) पहिल्या महिला प्रमुख झाल्या आहेत. भारतीय पोलीस सेवेतील १९८९ च्या तुकडीतून त्या जेव्हा राजस्थानात आल्या, तेव्हाही राजस्थानात कर्तव्यावर आलेल्या पहिल्याच महिला आयपीएस म्हणून त्यांचे कौतुक झाले होते.
पण नीना यांना रुखरुख होती ती, पती आणि ‘बॅचमेट’ रोहितकुमार सिंह यांच्याप्रमाणे आपणही मणिपूर व त्रिपुरा केडर मागितले असताना निव्वळ ‘अशांत राज्यात महिला पोलीस उच्चपदस्थ नको’ म्हणून राजस्थानात पाठवण्यात आल्याची! न्यायाधिकरणापर्यंत हा प्रश्न नेऊन अखेर, १९९२ मध्ये त्यांनी राजस्थान केडर स्वीकारले आणि २०१३ पर्यंत त्या या राज्यातच राहिल्या. सीबीआयमध्ये सह-संचालक पदी त्यांची नेमणूक २०१३ मध्ये झाली. पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि नीरव मोदी पलायन यांसारख्या प्रकरणांचा तपास सीबीआयमध्ये त्यांच्याकडे होता असे म्हटले जाते, तेथे २०१८ पर्यंत कार्यरत राहून त्या ‘सीआयएसएफ’मध्ये आल्या. ‘विशेष महासंचालक- सीआयएसएफ’ हे पद आतापर्यंत त्या सांभाळत होत्या. त्या नात्याने, १३ डिसेंबरच्या संसद- सुरक्षाभंगाची चौकशी करणाऱ्या पथकाचे प्रमुखपद त्यांच्याकडे आहे.
‘सीआयएसएफ’कडे भारत सरकारच्या औद्योगिक आस्थापनांसह संसदेच्या तसेच सर्व भारतीय विमानतळ आणि ‘दिल्ली मेट्रो’च्या संरक्षणाची जबाबदारी असते. पाटण्यात शिकून उच्चशिक्षणासाठी दिल्लीच्या ‘जेएनयू’त आणि पुढे ‘हार्वर्ड विद्यापीठा’तूनही पदवी मिळवणाऱ्या नीना सिंह या महिलांच्या प्रश्नांमध्ये लक्ष जरूर घालतात, परंतु तेथेच अडकून न राहाता अन्य तातडीच्या प्रश्नांचीही जाण ठेवतात. या चतुरस्र वृत्तीचा लाभ आता ‘सीआयएसएफ’ला होऊ शकतो.